मुखवटे सोलताना – ‘भय इथले संपत नाही…’

>> मलिका अमरशेख

आपण एकटं राहायला का घाबरतो? हा एक खूप गहन प्रश्न वाटतो. वास्तविक जन्मतःच नाळ तुटल्यापासून आपण एकटे होतो. सगळे चेहरे नंतर ओळखीचे होतात, पण जन्मताच आपण अगदी आदिमानवाइतकेच आदिम नग्न अन् एकटे असतो… त्याच्या इतकंच आपण आवाजांना दचकतो.. साध्या पाण्यानं भुकेनं वेदनेनं घाबरून रडतो… तर मग आता या एकटेपणात आपण खरं तर सुजाणपणे स्वतःला सामोरं जायला काय हरकत आहे?

प्रत्यक्ष युद्ध लढताना वाटणाऱया मरणभयापेक्षा डोक्यावर केसानं टांगलेल्या तलवारीचं मरणभय जास्त भयावह असतं! समोर शत्रू असतो – दिसत असतो. आपण त्याच्याही आधी वेगानं व अचूक प्रहार करून मारायचं धाडस संधी आपल्याला असते… पण टांगलेल्या तलवारीचं काय? ती कधीही पडू शकते…

कोरोना! न दिसणारा शत्रू… कधी आपल्यावर झडप घालेल सांगता येत नाही. विलगीकरण हा बऱयाचजणांसाठी मोठं संकट असतं… एकटं राहायचं! स्वतःचे श्वास मोजत… घरातल्या भिंती अन् खिडकीबाहेरचं एकच एक चित्र बघत! चमचाभरच दिसणारं आकाश… समोरची इमारत… एखादं झाड… दिवस-रात्रीचे बदलणारे रंग एवढाच काय तो बदल! कुटुंबातल्या लोकांना होऊ नये म्हणून त्यांच्यापासून दूर राहायचं… आपली भांडी वेगळी… कपडेपण वेगळे धुवायचे… पूर्वी चौथ्या वर्णाला काय वाटत असे हे आता सगळय़ांनाच अनुभवायला येतंय! सावली पडली तरी विटाळ! वरून पाणी द्यायचं… गावाबाहेरच्या वस्तीत राहायचं…

थुंकीसुद्धा रस्त्यावर पडू नये म्हणून गळय़ात मडकं अन् पायानं जमीन अपवित्र होऊ नये म्हणून मागं खराटा बांधून जगणं मरताना हरेकक्षण अशा कितीतरी पिढय़ांनी हे भयावह वाळीत टाकणं, बहिष्कृत होणं जन्मापासून मरेपर्यंत अनुभवलंय… आता तोच अनुभव कोरोना सगळय़ांना देतोय. त्याच्या लेखी सर्व समान – त्याच्यासमोर सगळेच चौथा वर्ण झालेत!

पण या विलगीकरणाचा अँगल जरा बदलून पाहय़ला तर आपल्या मुखवटय़ामागचा खरा चेहरा शोधायलापण मदत होईल!

आपण एकटं राहायला का घाबरतो? हा एक खूप गहन प्रश्न वाटतो. वास्तविक जन्मतःच नाळ तुटल्यापासून आपण एकटे होतो. सगळे चेहरे नंतर ओळखीचे होतात, पण जन्मताच आपण अगदी आदिमानवाइतकेच आदिम नग्न अन् एकटे असतो… त्याच्या इतकंच आपण आवाजांना दचकतो.. साध्या पाण्यानं भुकेनं वेदनेनं घाबरून रडतो… तर मग आता या एकटेपणात आपण खरं तर सुजाणपणे स्वतःला सामोरं जायला काय हरकत आहे? भिंतीपलीकडे चार पावलांवर आत्मीय आहेत… डोक्यावर छप्पर पायाखाली जमीन आहे… खायला अन्न अन् अंगावर वस्त्र आहे. मूलभूत गरजा तर भागल्या जातायत्! अन् सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवंत तर आहोत!

एरवी 9.25 ची ट्रेन पकडताना… बसमागे धावताना पैसे आणि स्वप्नं यांची सांगड घालताना घडय़ाळाच्या काटय़ावर जगताना आपण कधीच भेटलेलो नसतो स्वतःला! विचारा ना या विलगीकरणात स्वतःला काही प्रश्न! काय बरं आवडतं मला? मला जे पाहिजे होतं ते मिळालंय का? त्यासाठी मी काय केलंय? ज्यांनी मला जन्म दिला त्यांना मी सुखात आनंदात ठेवलंय का? की जे माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यांच्यासाठी मी काही केलंय का?

मी आता त्यांच्यासाठी काय करू शकतो? अन् मी मला बरं वाटावं यासाठी काय करू शकतो?

मृत्यू अगदी डोळय़ासमोर असला की आपल्याला भराभर आठवायला लागतं काय काय राहय़लंय ते! आपल्याला वाटतं आपण असेच धडधाकट राहणार आहोत… करू उद्या परवा…
मृत्युपत्र करायचं राहून गेलं… जग हिंडायचं राहून गेलं… परवा सुपरमून होता आकाशात तो पण बघायचं राहून गेलं… मुलीला झाडावर बसलेला भारद्वाज पक्षी दाखवायचा होता… आईला आपल्या हातचं जेवण बनवून खायला द्यायचं होतं अन् मग तिच्या चेहऱयावरचं चांदणं फुललेलं… ते बघायचं होतं… खूप कडक ऊन आहे… बाहेर… पक्ष्यांना तहान लागत असेल तर त्यासाठी पाण्यानं भांडं भरून गॅलरीत ठेवायला हवंय… कुमारचं सहेला रे… लताबाईंच्या विराण्या… ‘शामे गम की कसम’मधला तलतचा दर्दभरा कंपित स्वर काळजाला कापत जाणारा… मन्नादांचा घनगंभीर तर किशोरचा अवखळ कधी आयुष्य मेंदू उलथापालत करणारा स्वर… ‘कोई होता मुझको अपना’ नाहीतर ‘हवाओंपे लिखदो’ म्हणणारा… ‘जिंदगी कैसी है पहेली’ अन् ‘वो शाम कुछा अजीब थी’ व्याकुळ स्वर… वहिदाचं सर्पनृत्य… देवआनंदचा ‘सिर्फ मैं सिर्फ मैं…’ म्हणणारा अंतरिम संवाद…

त्यातलं त्याचं सर्वात गूढगंभीर अन् सुंदर वाक्य आहे…

मरणाच्या दारात उभा असलेला राजू गाईड… तेजस्वी भगवी वस्त्रं घातलेला आत्मतेजानं झळाळून उठणारं त्याचं दिव्य उदात्त व्यक्तिमत्त्व… साक्षात्कारानं चमकणारे डोळे… तो म्हणतो, ‘‘आज.. असं वाटतंय… माझ्या सगळय़ा ईच्छा पूर्ण होतील! आणि पहा,… आता कसलीच इच्छाच होत नाहीय!’’

मला वाटतंय या विलगीकरणाच्या काळात मरणभयासमोर प्रत्येकानं स्वतःलाच भेटावं… मग पहा… कसलीच इच्छा होणार नाही… आपण जिवंत आहोत अन् स्वतःला भेटतोय हे कसलं भन्नाट अवर्णनीय सुखशांतीमय आहे!!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या