मुखवटे सोलताना – नैनं छिदन्ति शस्त्राणि

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

आत्मा म्हणजे नेमकं काय? मन म्हणजे नेमकं काय? आत्मा म्हणजेच मनाचा गाभा की आत्मा कुंडलिनीत असतो? पुराण म्हणतो आत्मा अविनाशी अमर… विश्वाचं कोडं उलगडणारा… बिग बँगचं सिनिएचर पृथ्वीवर तयार करणारा… चंद्र, मंगळाला गवसणी घालणारा माणूस अजून त्याला स्वतःचं शरीर, मन सर्वंकषपणं माहीत नाही!

प्रत्येक माणसात किमान पन्नास माणसं आत दडून असतात! कितीतरी आपलेच चेहरे आपल्याला माहीत नसतात. नवरस शांत, वीर, क्रोध, बीभत्स, शृंगार, भयानक, मृदू, रौद्र, अद्भुत, हास्य हे सारं आपल्यात सामावलेलं. आयुष्यात सुख-दुःख विविध घटना. समोरच्या माणसाचा वावर-वर्तन यानुसार आपला एकेक मुखवटा समोर येतो! कधी कधी तर आपलंच आपल्याला नवल वाटतं. अरे आपण असं वागलो?

शास्त्र्ाज्ञांच्या मते आपल्या मेंदूतला 20 टक्के भाग आपण वापरलाच नाहीय अन् नेमकं मेंदूचं कार्य कसं चालतं याबद्दल आपण 50 टक्केच ज्ञान प्राप्त केलंय…!

मोठीच गंमत… विश्वाचं कोडं उलगडणारा… बिग बँगचं सिनिएचर पृथ्वीवर तयार करणारा… चंद्र, मंगळाला गवसणी घालणारा माणूस अजून त्याला स्वतःचं शरीर, मन सर्वंकषपणं माहीत नाही!

आत्मा म्हणजे नेमकं काय? मन म्हणजे नेमकं काय? ‘माझ्या मनात…’ हा शब्द बोलताना नकळत आपण हात हृदयावर ठेवतो! पण मन तिथं कुठं असतं? तिथं फक्त रक्त शुद्ध करून सर्वत्र पाठवून आपण जिवंत राहू यासाठीचा केंद्रबिंदू… म्हणजे शरीर कारखान्याचं हेडऑफिसच! मग मन कुठं असतं? मेंदूत? मग आत्मा म्हणजेच मनाचा गाभा की आत्मा कुंडलिनीत असतो? पुराण म्हणतो आत्मा अविनाशी अमर…

‘‘नैनं छिदन्ति शस्त्र्ााणि
नैनं दहति पावकः’’

तर मग मृत्यूनंतर एवढय़ा लोकांचे आत्मे कुठं बरं तरळत तरंगत असतील? केवढी गर्दी होणार मग अवकाशात! कोट्यवधी वर्षांपासूनचे अब्जावधी आत्मे! बरं… आत्मा माणसांप्रमाणेच जनावरांना पण असतो का? मग तर बघायलाच नको…

जनावरं पशू-पक्षी यांना जर पुनरुत्पादन, संघटन, निसर्गनियम आणि भावना असतात तर आत्माही असलाच पाहिजे.

काय गंमत पहा – मृत्यूनंतर ठराविक दिवसांनंतर जे लोक पिंडदान करून कावळय़ाला बोलावतात, पण कावळय़ांच्या जमातीत मात्र मनुष्यप्राणी भयानक अपशकुनी समजला जात असावा! कारण की माणसानं कावळय़ाच्या पिलाला चुपून जरी हात लावला तरी ते त्याला टोचून टोचून मारून टाकतात! किती अघोरी…

तर जनावरांनाही माणसांबद्दलच्या भावना काही समजत असाव्यात… फक्त आपण मुखवटे दडवून वावरतो तसं ते वावरत नाहीत! स्वसंरक्षण – पिलांचे अन् कुटुंबाचे संरक्षण संगोपन. प्रतिकार आणि भक्ष्य किंवा खाद्य मिळवणे हे त्यांना निसर्गानं दिलेलं कार्य ते चोख बजावतात… विशेष म्हणजे आपण एक असतो अन् दर्शवतो वेगळंच… म्हणजे स्वभाव कृपण असला किंवा घाबरट असला तरी आपण थोडंच सांगतो. आपण दायित्व व वीरत्वाचा आभासच काय दाखलेच देतो… पशू-पक्ष्यांमध्ये वर्तन पारदर्शी असते, पण निसर्गानेच त्यांना वेगळय़ा प्रकारे मुखवटे दिलेत अन् त्यातच त्यांचे संरक्षणपण होईल, असे पाहिले…

पहा… सरडे… झाडावरच्या खोडाचा रंग – गवताचा हिरवा.. लाल फुलांवर लाल लगेच रंग बदलतात… फुलपाखरे… एखाद्या मोठय़ा जनावराचे डोळे असावेत, असे नाजूक पंखांवरले रंग… की त्याला पकडणाऱया भक्ष्यकाची फसगत व्हावी! माणूस आणि प्राण्यानंतर तिसरा अन् शेवटचा दुय्यम सजीव घेऊया… झाडं! झाडं मानवाइतकीच संवेदनाक्षम असतात. आपल्याला माहीत असलेले उदाहरण म्हणजे लाजाळू! पूर्वीचे लोक म्हणायचे – ‘रात्री झाडाची पाने तोडू नये’ इतकं ते झाडांना जपायचे… यामागे झाडं रात्री झोपेत असतील या इतकेच रात्री झाडांजवळ जाणे साप विंचुकाटय़ाचे भयही असावं… पण निसर्गानं झाडांनाही मुखवटे दिलेच की! घटपर्णी! रचना किती छान एखादा हिरवा छोटा बुधला असावा तसा… अन् वर झाकण पण… पण एखादा किडा त्याच्या रंगाला व वासाला भुलून आत गेला की गेलाच! मृत्यूसापळाच तो! लगेच झाकण बंद होतं अन् तो किडा आतमधल्या रसात बुडून मरतो! अशा अनेक वनस्पती आहेत… चपटय़ा झाकणासारख्या रंगीत… सुगंधी… पण आतल्या विषारी काटय़ांमध्ये किटक फसल्यावर ते झाकण बंद होतं…!

तर मानवापासून जनावरं पश्-पक्षी अन् झाडं यामध्येपण हे असं मुखवटे धारण करण्याचे कसब!

– तरीही माणसापेक्षा हे जीव जास्त सुखी…!
आपलं काय होणार? याचा ते विचार करत नाही.
आत्मा आहे का किंवा तो नंतर कुठे जातो याचा ते विचार करत नाही.

माणसांपासून सर्व प्राण्यांपर्यंत संघटन, वर्चस्व, स्वतःच्या जागेची स्वामित्वभावना हे असतेच असते.

माणसापासून वाघ, सिंह हे सर्व आपल्या अधिवासात दुसऱयाचे आलेले अस्तित्व खपवून घेत नाहीत. तर झाडे त्यांना एकाच ठिकाणी स्थिर असल्याने ते तसे ‘स्वयंभू’ असतात.
माणूस हा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत आलाय, पण उद्या काय होणार हे त्याला कधीच समजू शकत नाही; तेच हत्ती व सरपटणारे प्राणी यांना व कावळय़ांना आपले मरण आधीच कळते व ते विवक्षित ठिकाण शोधून मरणाची वाट पहातात. तर काही पुत्र्यांना संकट कळते… हे मात्र ऐकीव माहिती नाही.

सोसायटीतला एक कुत्रा सतत रडायचा. सलग आठ दिवस… त्यानंतर भूकंप झाला! अर्थात याला पण शास्त्रीय कारण आहेच; जमिनीलगत राहणारे, झोपणारे प्राणी त्यांची कर्णेंद्रिय, घ्राणेंद्रिय अति तीक्ष्ण असल्याने ते जमिनीखालची स्पंदने सहज जाणू शकतात! आपल्याला यंत्रांची मदत घ्यावी लागते.

ते पण निश्चित नाही…

पण आपला अहंकार वाढतच असतो… तोही एक मुखवटाच! आपल्याला बोलता येते म्हणून आपण आपले किती सांगतो हे बाकीचे लोक (पशू, पक्षी, झाडे) न बोलताही सांगतात… न त्यांचे मुखवटे, त्यांचे संरक्षण अन् अन्न मिळविण्यासाठी असतात… पण आपले मुखवटे मात्र क्षुद्र अहंकारासाठी असतात!

[email protected]