
>> मलिका अमरशेख
सर्कसमधल्या विदूषकाचा मुखवटा हसरा असतो, पण त्यामागं कसलं दुःख, वेदना, किती जखमा झाकलेल्या असतात ते त्यालाच माहीत! आपण सगळेच एका अर्थी जगाच्या सर्कशीतले विदूषक आहोत! प्रत्येकाच्या वेगळय़ा जखमा, वेगळय़ा वेदना – हसऱया मुखवटय़ामागे सगळेच अश्वत्थामा! भळभळणाऱया दुःखाचं रक्त पुसत गुपचूप हसरे मुखवटे सावरत सावरत प्रश्नांच्या जखमेवर हात धरत उत्तराचं तेल मागत हिंडणारे अश्वत्थामा आपण सारेच! त्यावर हास्याचं मलम देणारे देवदूत असतात, पण जगात! भेटतील कधी ना कधी!
नाटय़ जगाची दोन प्रतीकचित्रे! एक रडवेला, एक हास्य…
‘‘या जगात फक्त माणूसच हसतो.’’
‘‘या जगात फक्त माणूसच दुसऱयाला हसतो वा हसवतो.’’
या जगात फक्त माणूसच हास्यास्पद प्राणी आहे!’’
या सगळय़ाच गोष्टी सार्थ आहेत!
शंभर वर्षांपूर्वी चार्ली चॅप्लिननं मूकपटाद्वारे अख्ख्या जगाला हसवल न् अजून तेच हसू कायम आहे! बेस्टर किटन, लॉरेल हार्डी, मार्क्स ब्रदर, आपल्याकडे चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे असे दिग्गज लेखक ज्यांनी मराठी माणसाला आठय़ा पुसून न् आसवं पुसून हसायला शिकवलं! नपेक्षा ‘टवाळा आवडे विनोद’ म्हणून असंच आपणाकडे जास्त उपरोधानं पाहय़लं गेलं.
पूर्वीचे फोटो पहा. फोटोत पण जगाचं ओझं दिल्यागत गंभीर चेहरे! एकजण प्रसन्न हसेल तर शप्पथ!
प्रश्न, संकटं, व्याधी सर्वांनाच असतात; पण अरे, किमान पह्टोसाठी क्षणभर हसायला काय घ्याल? पूर्वीचे पह्टोग्राफर म्हणूनच बजावायचे, विनवायचे ‘स्माईल प्लीज’… हसलेला चेहरा आपोआप सुंदर दिसतो. एक सुभाषित आहे…
‘‘हसा, सारं जग तुमच्याबरोबर हसेल…
रडा, तुम्ही एकटेच रडाल!’’
हास्य हा एक अनमोल दागिना आहे, निसर्गानं दिलेला… हसण्यानं शरीराचे 56 स्नायू का, किती ते हलतात न् आपल्या शरीरासाठी ते चांगलं अस्तय म्हणून हास्य क्लब उघडले जातायत! कुठेतरी दूर जाऊन वेडय़ासारखं खोटंखोटं हसण्याऐवजी कुटुंबामध्येच विनोद-गप्पागोष्टी-गमतीदार किस्से आठवणी काढून खरं खरं नाही हसू शकत आपण? हसण्यानं डोपामाईन की काय ते मेंदूतलं पेंद्र जागृत होतं न् त्या संवेदना सुखदपणे शरीरभर पसरल्यावर आपण टवटवीत, ताजेतवाने होतो…
सगळय़ांनाच तणाव-तणावातच जगतो. तणावानं, प्रश्नानं आपण ग्रासलोय…थकलोय. तणाव… मनस्ताप यानं वृद्धत्व लवकर येतं… आजारपण येतं. हृदयविकार, ब्लडप्रेशर सगळे विकार तणावानं येतात. आपण आपल्या शरीराला ‘सॉरी’ म्हणत नाही… थँक्यू पण म्हणत नाही. गृहित धरतो. मन, शरीर किती काळ साथ देणार? मन, मेंदू निमूट संकेत देत राहतात. आपण दुर्लक्ष करतो न् हळूहळू याचं रूपांतर आजारात होतं. फक्त एकच करायचं…शरीराची हानी, मेंदूला त्रास… खिशाला खर्च, डॉक्टरांच्या वाऱया. त्याऐवजी फक्त एकच करायचं. मनापासून हसायचं. संकटात शांत राहायचं… कृष्णासारखं स्थितप्रज्ञ!
लहानपणी रशियन लोककथेतला इवान चेटकिणींकडे जाणार असतो. तो चिंतेत. आई त्याला म्हणते, ‘‘झोप शांत बाळ इवान, रात्रीतून नक्की काही मार्ग सापडेल’’ आणि खरंच रात्रीतून मार्ग निघायचा. संकट आलं की दोनच प्रकार असतात. काही संकटांना दार असतं! बंद दार ते उघडावं लागतं. बुद्धीच्या चावीनं… तर काही संकटे मात्र जाम जहांबाज असतात. जाम दाद लागू देत नाहीत. तर मग मात्र ही हसण्याची युक्ती. शांतपणे हसायचं फक्त. काळच तो प्रश्न सोडवतो. वेळकाळ हे सर्वात सोपं औषध! आणि हास्य… तुम्ही हसलात की अर्धी लढाई जिंकलात!
प्रेमात पण हसलात की अर्धी लढाई जिंकलात. हास्य तुम्हाला सुंदर बनवते… हास्य आयुष्याला सुंदर बनवते. लहान तान्हं मूल पहा – त्याचे डोळे पण हसत असतात. कारण दुनियेच्या विकारापासून ते दूर असते. त्याच्या दृष्टीनं जग फक्त आणि फक्त सुंदर असते. लोकांना रडवणं सोपं असतं! हसवणे कठीण! दुसुऱ्यांवर हसणे आणि सोपं! लेखक – चित्रकार – नर्तक – गीतकार – गायक – फिल्मकार – नाटय़कार यांना विचारा कुठला प्रकार कठीण ते! विनोदाला न हसणारा प्रेक्षक लेखकाच्या डोळय़ांत पाणी आणतो. विनोदातही अनेक प्रकार, हसण्यातही अनेक प्रकार! पिंचित स्मितहास्य, औपरोधिक हास्य, खळखळून हसणं, दात विचकून हास्य, सातमजली हास्य, गडगडाटी हास्य… इ. इ. हास्य हा असा अलंकार आहे, जो कोणत्याही चेहऱयावर खुलून दिसतो. हल्लीचे विनोद ऐकून हसावं की रडावं कळत नाही… अभिजात विनोद जवळपास नाहीच. आ. अत्रे यांनी लिहिलेले ‘मोरूची मावशी’, ‘ब्रह्मचारी’, ‘विडंबन काव्य’, चिं. वि. जोशींचे चिमणराव, पुलंचा गटणे, मिरासदारांची कथापात्रं, सर्वच हास्यविनोदाचा उत्तम नमुना! शि. द. फडणीसांची हास्यचित्रं, व्यंगचित्रं, अर्कचित्रं यांनीही विनोद हास्य जगात स्वतःची हसरी खूण उमटवलेली.
जगात काही माणसं कायम वैतागलेली असतात, तर काही कायम खेळकर. धडक बसली एकाची दुसऱयाला तर ‘‘काय डोळे फुटलेत का?’’ अस एकजण बोलेल तर त्याच प्रसंगात कायम खेळकर दृष्टीनं आयुष्याकडे पाहणारा बोलेल, ‘‘चष्म्याचा नंबर बदला बरं का’’! हास्य आपल्याला निकोप दृष्टीनं जगाकडे, आयुष्याकडे बघायला शिकवतं. केळय़ाच्या सालीवरून घसरून पडणाऱयाला सगळेच हसतात, पण स्वतःच्या पडण्यावर, चुकांवर, फजितीवर हसायला वेगळंच मन लागतं!
सर्कसमधल्या विदूषकाचा मुखवटा हसरा असतो, पण त्यामागं कसलं दुःख, वेदना, किती जखमा झाकलेल्या असतात ते त्यालाच माहीत! आपण सगळेच एका अर्थी जगाच्या सर्कशीतले विदूषक आहोत! प्रत्येकाच्या वेगळय़ा जखमा, वेगळय़ा वेदना – हसऱया मुखवटय़ामागे सगळेच अश्वत्थामा! भळभळणाऱया दुःखाचं रक्त पुसत गुपचूप हसरे मुखवटे सावरत सावरत प्रश्नांच्या जखमेवर हात धरत उत्तराचं तेल मागत हिंडणारे अश्वत्थामा आपण सारेच!
खरं सांगा, आतल्या आत
मन कुढत रडत असतं
तेव्हा कुठल्या चेहऱयावर
हसू कुठे फुलत असतं?
खोल जखम जिव्हारी
अंतरंग चिरत असतं
तेव्हा कुठे डोळय़ामध्ये
आनंदाचं गीत असतं?
खिन्न सांजवेळेला कुणी
बुडून जात असतं
तेव्हा कुठल्या पावलांना पुढे
कुठेच जायचं नसतं
खरं सांगा, आतल्या आत मन
कुढत रडत असतं
तेव्हा कुठल्या चेहऱयावर
हसू कुठे फुलत असतं?
त्यावर हास्याचं मलम देणारे देवदूत असतात, पण जगात! भेटतील कधी ना कधी!






























































