शोध पंचमहाभूतांचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

आपण खरंच शोध घेतो का मनाचा? दुसऱयाच्याच काय स्वत:च्या मनाचाही काही वेळा थांगपत्ता लागत नाही. प्रत्येकाच्या मनात, हातात स्वतŠचा कॅलिडोस्कोप असतो. त्या प्रत्येकाचे कोन वेगळे… त्यातल्या काचा वेगळ्या अन् रंही वेगळे… अगदी स्वतŠलाही ओळखू न येणारे. त्या हजार प्रतिमांमधून नक्की आपली खरी प्रतिमा कोणती? नाही ना ओळखू येत…

‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ असं म्हणतात. पण ज्याप्रमाणे द्रौपदीच्या थाळीत सर्व जेवून झाल्यावर पण एक भाताचं शीत राहिलं होतं न् ते खाऊन कृष्ण तृप्त झालेला. त्याप्रमाणे किंवा त्याउलट व्यासानं सर्व जग उष्टावलं तरीही पंचमहाभूतांपैकी अनेक भूतांचा शोध घ्यायचा शिल्लकच आहे! मन-शरीर न् पृथ्वी पंचमहाभूतानंच बनलेली…

आपण कुठं शोध घेतलाय मनाचा? शरीराचा? पृथ्वीचा?- दुसऱयाच्याच काय पण स्वतःच्या मनाचाही काहीवेळा थांगपत्ता लागत नाही. चंद्र मंगळावर यान पोहोचून तिथले दगड माती आणून शोधतोय आपण. पण शरीरात होणारा कॅन्सर नेमका कशामुळे होतो न् कशामुळे बरा होईल हे ठामपणे नाही सांगू शकतंय…

संपूर्ण भारतवर्षाची भूमी अत्यंत सुपीक, समृद्ध… जैविक निसर्ग औषधी, प्र्राणी, कीटक, वनस्पतीनं बहरलेली… आपण कुठं त्याचा अभ्यास केलाय? परदेशात मासे-कीटक यांचा बारकाईनं अभ्यास करतात. शासनाने योजना नाही राबवल्या तरी खिशाला चाट लावून कुठल्याही नफा-प्र्राप्ती नसतानाही ते अभ्यास करतात यामागची जिज्ञासा, उत्सुकता निसर्गातली सौंदर्यसृष्टी… गूढ… विविध जैविक संपत्ती पाठीमागली कारणमीमांसा- जनावरं किटकांची जीवनशैली शोधण्याची आपली वृत्ती का नष्ट झाली असावी? याबद्दल माझीच एक कविता आहे छोटीशी-

‘भाषा आणि काही प्राणी
काही पक्षी
काही कीटक
काही वनस्पती
कालौघात नष्ट झाले असं म्हणतात…
माणसांबद्दल माझं नेमकं हेच मत आहे…’

तर सरळच आहे दुसरी बाजू-भाषा, प्राणी, पक्षी आपण वाचवू शकलो असतो पण आपण दुर्लक्ष केलं…एक अक्षम्य हेळसांड.

ऍमेझॉन जंगलखोऱयापेक्षा आपलं दक्षिणेकडचं जंगल निबिड न् समृद्ध आहे, पण वीरप्पन सोडता तिथं कुणी गेलं नाही. अंदमानपेक्षा विविध जलचर आपल्याही समुद्रात सापडतील, तिन्ही बाजूंना तीन महाकाय समुद्र एवढी श्रीमंती मिळून चंगळ चैन म्हणून आपल्याकडले गुलछबू हौशी तरुण-तरुणी स्कूबा डायव्हिंग करतील. पण आपल्याकडची जलसंपत्ती कितीय याची मोजदाद कुठं आपण केलीय? आपण फक्त बँकांनी आपल्याला किती कोटीला फसवलंय… सायबरवर किती लाखांना लोकांनी लुबाडलं, तिरुपती- अंबाबाई न् साई संस्थानला किती कोटी या वर्षी मिळाले याचीच मोजदाद करतो…

नाही म्हणायला श्रीकृष्णाची द्वारका…तिथे अवशेष मिळाल्याची चुटपुटती बातमी आली. पण ती तीच याबद्दल ठाम पुरावे-माहिती- सविस्तर अजून आली नाही. थोडक्यात आपण शुद्ध मराठीत कर्मदरिद्री व कपाळकरंटे आहोत किंवा झाले आहोत.

प्रकाशन संस्था बंद पडतायत. लायब्ररी, नगर वाचनालय बंद होतायत. दुसऱया भाषेत कोणी काय लिहिलंय याचा पत्ता लागत नाही. इतकंच नव्हे तर पीएचडी मिळविण्यासाठी इतकी वर्षे मराठीत जे लोक वेगवेगळय़ा विषयांचा अभ्यास करून प्रबंध लिहितात ते चार डोकी सोडून कुणालाही माहीत नसतात. तर वाचणं तर दूरच.

लग्न, सण, समारंभ यापुरतेच आपण इतरांना भेटतो. ज्याला कधीच पाहय़लं नाही तो ‘तो’ आहे की ‘ती’ हेही कळत नाही. तरीपण फेसबुकवर गप्पा मारण्यात या पिढीला समाधान वाटतंय.

पशुपक्ष्यांची वेगळी भाषा आहे म्हणतात. माणसांनाही ऐकू न येणारे आवाज हत्ती काढून दूरच्या हत्तींशी संवाद साधतात. डॉल्फिनही बोलतात. झाडे लाजतात-घाबरतात. या सगळय़ा गोष्टींत आपल्याला किंवा आताच्या पिढीला जराही इंटरेस्टिंग वाटत नाही ही काळजीची गोष्ट आहे.
एकमेकांची मनं दुखावण्यात आपण पटाईत झालोत. किंबहुना ते आपल्याला आवडूही लागलंय. वेग… जगण्याचा वेग… आपण बदलाच्या मेरी गो राउंwडमध्ये बसलोय. आणि आता हे चक्र आपल्याला थांबवता येत नाही. आयुष्य जग आपल्याला जायंट व्हील किंवा एस्सेल वर्ल्ड किंवा जत्रा वाटतीय.
प्रत्येकाच्या हातात स्वतःचा कॅलिडोस्कोप… प्रत्येकाच्या कॅलिडोस्कोपचे कोन वेगळे – त्यातल्या काचा वेगळय़ा – रंग वेगळे-खरे जग तर खूपच वेगळे. ते कोण कधी बघणार? परत या भारतवर्षात व्यास निर्माण होणार का? की महाभारत भाग 2 रा चालू होणाराय? कोण जाणे!
प्रत्येकाचं व्हिजन वेगळं-दृष्टिकोन वेगळा असता – असणार हे समजू शकतो. पण आज प्रत्येकाच्याच हातात शून्य आहे. जर माणसं वेगळी, प्रश्न वेगळे, स्थळ-काल परिस्थिती वेगळी तर मग उत्तर सारखंच कसं?

माणसानं चाकाचा शोध ज्या काळात लावला तेवढंच शून्य भरीव अर्थपूर्ण निघालं… नंतर घडय़ाळाचा शोध लागला-काळाचा शोध लागला. काळ काम वेगाचा शोध लागला. त्यानंतर आपण भयानक वेगानं धावू लागलो ते पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन थांबणार आहोत काय? Back to Pavalian म्हणतात तसं- आपण मानव बुद्धिमान आहोत इतर सजीवांपेक्षा, त्यामुळे आपण असंतुष्ट आहोत. काय आहे आणि काय असावं याचा प्रत्येकजण विचार करतो. मग तरीपण आपण आदिमानव-माकड-हत्ती-मासा-पक्षी यापेक्षा दुःखी कसे? की सुखी होण्याचे हजार पर्याय-मार्ग आपण शोधून काढले, पण आपण आपल्यातली पंचमहाभूतं शोधून त्यांना शांत नाही करू शकलो म्हणून आपण दुःखी आहोत? आपण विकासाच्या चरमसीमेपर्यंत पोहोचलेलो माणूस आहोत की एक पोकळ शून्य? अर्थहीन! अपरिहार्यपणे…

[email protected]