सर्जनाच्या मुशीत घडलेला…

185

>> मिलिंद शिंदे, [email protected]

रवी करमरकर. काही व्यक्तिमत्त्वं खूप शांत… संयत असतात. पण त्यांचे काम मात्र त्यांची सारी शांतता बोलकी करून टाकते.

गोष्ट पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा बसने प्रवास करीत असे. कल्याणमार्गे मुंबईत प्रवेश करायचो. तिकीटही स्वस्त आणि नगर-कल्याण गाडय़ाही मुबलक. जागाही मिळायची. मोबाईलचं महागडं असणं सरून सामान्यांच्या हातातलं खेळणं सुरू झालं होतं, पण या मनोऱयांच्या (towers) झेपेपलीकडे काही ठिकाणं होती त्यातलं नगर-कल्याण महामार्ग हे निरूपण का आहे? हे पुढल्या काही वाक्यात कळेलच. जसा मी मोबाईल मनोऱयांच्या कक्षेत आलो तसे मला मेसेजेस मिळू लागले. प्लीज कॉल किती? दहा-बारा. तेव्हा मिस्ड कॉल ऍलर्ट युग अवतरायचं होतं. दुसऱया दिवशी शूटिंग म्हणून रवी करमरकर हा मला कॉल टाइम द्यायला संपर्क साधत होता आणि माझा फोन लागत नव्हता, पण यादरम्यान रवीनं जवळपास माझ्या सगळय़ा परिचितांना फोन करून माझा तपास लावण्याचा प्रयत्न केला. आणखी संपर्क क्रमांक आहे का? घरचा काही नंबर? शेजारी कोण राहतं? तेव्हा मी मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आश्रयाला होतो. त्यामुळे मोबाईल सोडून माझ्याकडं काहीच संपर्क माध्यम नव्हते. इथपर्यंत ठीक होतं. नंतर ज्यांच्या ज्यांच्याकडे रवीने फोन केले होते ते सगळे मला फोन करून सांगायला लागले, ‘‘अरे, रवी तुला शोधतोय. त्याला फोन कर.’’ उद्या शूटिंग, नटाला (?)कॉल टाइम द्यायचाय, पण त्याचा फोन लागत नाही म्हटल्यावर कुठल्याही असोसिएट डिरेक्टरच्या मनात कोलाहल माजणारच. शेवटी संपर्क झाला. दुसऱया दिवशी शूटिंगही पार पडलं.

रवी करमरकर म्हटलं की, जसा मला उपरोल्लेखित प्रसंग आठवतो तसा आणखीही एक आहे. जो अतिशिस्तीचा, अनाठायी वागण्याचा. रवी दिग्दर्शक आणि मी नट. एका प्रोजेक्टवर काम करीत होतो. जशी मोठय़ा घरात एखादी सून येते आणि त्या नवीन सुनेला नव्या खानदानाचा व्यवहार जसा दटावून सांगितला जातो तसं दर पाच-दहा मिनिटांनी रिवाज सांगायला एकजण येत असे. हसायचं नाही, मोठय़ाने बोलायचं नाही इ.इ… दुपारीच माझं ठरलं. हे आपण नाही करायचं, कशीबशी संध्याकाळ झाली. सुटलो. फोन करून सांगितलं, मला नाही जमणार. मी एका दिवसात रजा घेतली. रवीच्या सहिष्णू स्वभावामुळे त्याला काही दिवस लागले. मग तोही रजेवर गेला.

ठाण्याच्या ज्ञानसाधनाच्या मांडवाखालून रवी मुंबईत दाखल झाला. ‘शून्यभार’ एकांकिकेच्या निमित्तानं. रवी यात अभिनय करीत होता आणि सोबतीला उदय सबनीस (सॅबी) आणि एकनाथ शिंदे. नट म्हणून प्रवास सुरू झाला. विनय आपटेंच्या ऑडिक्टमध्ये दाखल झाला आणि खुलू लागला. विनय आपटेंनी समज दिली, समजावूनही सांगितलं, प्रोत्साहितही केलं, धाडस दिलं, स्वतंत्र विचार करायला शिकवलं, छातीत बळ दिलं. अंमळ हुशारी आल्यासारखं वाटलं. ‘आभाळमाया’ मालिका होती ती. मालिकेनं इतिहास घडवला. डेली सोपमधली पायोनियर मालिका होती ती. आजही तिचा ठसा आहेच. रवीला त्या मालिकेसाठी चार दिग्दर्शकांसोबत काम करावं लागे. मंदार देवस्थळी, श्याम मळेकर, भालचंद्र आणि खुद्द गब्बर विनयजी. मोठी शिकवणीच होती ती. ‘आभाळमाया’तून ‘झोका’मध्ये प्रवेश झाला आणि रवीमध्ये आमुलाग्र बदल व्हायला लागला. कारण होतं प्रतिमा कुलकर्णी. रवी म्हणतो, त्या जे बोलतात, समजावून सांगतात, वेळ देतात, घेतात आणि अख्खं अवकाशच तुमच्या पुढे उभे करतात आणि प्रत्येकजण त्या अवकाशातली स्वतःची भूमिका वेचतो आणि सादर करतो. रवीच्या मनात प्रतिमा कुलकर्णी यांच्याबद्दल नितांत आदर आहे. तो जाणवतोही त्यांच्याविषयी भारावून बोलताना. रवी तीन माणसांना खूप आदरानं पाहतो. तो त्यांना या क्षेत्रातले त्याचे गुरूच मानतो. प्रतिमा कुलकर्णी, मंदार देवस्थळी आणि राकेश सारंग.

रवी मालिका परिवारात दाखल झाला. रमलाही आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेनं त्याचं दिग्दर्शक म्हणून सोलो क्रेडिट लागलं. स्थिरावलाच जणू. मालिका सुरूच होत्या, पण त्यांचा एक सवंगडी आणि कल्पक दिग्दर्शक अभिजित पानसेच्या मनात एक कथानक जन्म घेत होतं. जोडीला रवी. जेव्हा तो सिनेमा पडद्यावर आला तेव्हा काहीतरी आपण उत्तम पाहिल्याचं प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं. त्यातलं एक डोकं माझंही होतं. एक पापणी जरी लवली तरी तुम्हाला पुढचा सिनेमा समजावून द्यायला अवघड होतं. तो सिनेमा म्हणजे ‘रेगे’. मी दोनदा पाहिलाय. केवळ अप्रतिम कलाकृती. मग पुन्हा अभिजितसोबतच बंधू संजय राऊत यांनी निर्मिती केलेला चित्रपट आला ‘ठाकरे’. रवी या सिनेमाचा असोसिएट डिरेक्टर. रुळला आता या क्षेत्रात.

सिद्धिरूपा (बाबरेकर) करमरकर रवीची पत्नी. तिने रवीला ‘रवी’ असल्यापासून ते दिग्दर्शक रवी करमरकर होताना पाहिलंय. रवीही कबूल करतो की, तिची खूप साथ लाभली या सगळय़ा प्रवासात ती ठाम आहे, ती खंबीर आहे. भान देते, पुन्हा प्रयत्न करायला लावते. सोबतही असतेच सदैव.

रवी, पंधरा वर्षांपूर्वी केवळ मोबाईल मनोऱयांच्या अभावापायी तो एक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत होतास. तुझे इथून पुढचे सगळे सृजन, सर्जन मेसेज तुझ्या रसिकांपर्यंत पोहोचोत…

मित्रा, तू मुलखाचा शांत आणि संयमी आहेस.

आपली प्रतिक्रिया द्या