सिरियलवाला…!!!

217

>> मिलिंद शिंदे

राजू सावंत. हाडाचा दिग्दर्शक. कला माध्यमांची बांधील नसते. ती बहरते… खुलते कल्पनाशक्तीवर… प्रामाणिकपणावर…

एक नवसमाज आला आहे मनोरंजन क्षेत्रात, ज्यांना साक्षात्कार झाला आहे की, तेच फक्त उजवे आहेत आणि बाकी… बाकी काही नाहीतच. कुठल्यातरी चिंचोळय़ा गल्लीतला एक छोटासा कोर्स त्यांनी केलेला असतो आणि जणू काही ज्ञानप्राप्ती झाल्याच्या आविर्भावात ते बोलत असतात (कारण नामांकित संस्थेतून शिकलेले कधीही कुठल्याही कलेचा, कलाकाराचा अनादर करीत नाहीत) आणि ते सोडून बाकी या जगतावर ओझं असल्याचा त्यांना शोध लागलेला असतो.

‘‘अरे तो सीरियलवाला आहे.’’

‘‘हे काय सीरियलसारखं चाललंय?’’

‘‘ही काय सीरियल आहे काय? ही फिल्म आहे यार…’’

इ.इ. सीरियलला कमी लेखणारी भाषा त्यांच्याकडून बोलली जाते. कुणी अधिकाराने बोलले तर ठीक आहे, पण अज्ञानातून बोलत असेल तर? तर त्याचं बुद्धिमापन व्हावं आणि त्याचा समाचारही घ्यावा. चर्चेतून, सामोपचारातून सीरियलला कमी लेखणाऱया लोकांचा राजू सावंतला राग येतो. तो त्यावर कळकळीने बोलतो. सिनेमासाठी तुम्ही कधी कधी वर्षभर तयारी करता, कधी महिनोन्महिने तयारी करता. आम्हा सीरियलवाल्याचा ट्रक किंवा पुढच्या आठवडय़ात काय घडणार आहे हे आम्हाला सात दिवस आधी कळतं. तरीही आम्ही प्रेक्षकांना (स्वयंपाक करणाऱया महिलांना, लहान मुलांना सीरियल पाहायचीय म्हणून घाईत घरी पोहोचणाऱया नोकरदारांना) ठेवतोच ना बांधून? चालवतोच ना वर्ष वर्ष सीरियल? तुम्ही वर्षभर तयारी करून जर चित्रपट सात दिवस चालणार नसेल तर काय करायचं?

राजू सावंत चिंतीत होतो. कलेकलेत उच्चनीच का? दुजाभाव का? अंतर का? राजू आज आघाडीचा मालिका दिग्दर्शक आहे आणि आता रसिकांची आवडती मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ ही त्याचीच कलाकृती.

एक्स-रे लॅबमध्ये काम करायचा तो. बदलापूरच्या. म्हणजे जसं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरातल्या मुलांना आता काहीतरी कमवावं लागणार, त्यातून त्यानं ती नोकरी धरली होती. जिथे शिक्षण झालं त्याच ठाण्यात तो राहायचा. तिथेच सुषमाची ओळख झाली आणि गोष्ट लग्नापर्यंत गेली. ती लग्नगाठ आजही आनंदाने दोघांचा संसार पाहतेय, पाहत राहील… तर नोकरी धरली खरी, पण नोकरीवर जायचा अमाप कंटाळा. कधी हे कारण तर कधी ते कारण करत राजू दांडय़ा मारू लागला. सुषमानं हे हेरलं आणि विचारलं की, ‘‘तुला काय करायचं आहे, जिथे तू मन लावून काम करशील, रोज कामावर जाशील?’’ राजू तातडीने उद्गारला ‘कला, सिनेमा, सीरियल… काहीही पण ही बदलापूरची नोकरी नको. मला कंटाळा येतो.’’ सुषमाच्या चाणाक्ष नजरेनं त्याची आवड आधीच हेरली होती, पण तिला त्याच्याकडून ऐकायचं होतं. ते ऐकलं आणि राजूला आकाश मिळालं, त्याच्या पद्धतीने आयुष्य कोरायचं.

सुषमानं बळ दिलं, पण जग तयार नव्हतं राजूचे स्वागत करायला. वर्षभर काही काम नाही. सुषमाच्या जीवावर घर चाललं होतं (तोवर ती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, टीएमसीमध्ये आरोग्य विभागात एका महत्त्वाच्या पदावर रुजू झाली होती) आणि राजू कामाच्या शोधात भटकत होता. या क्षेत्रात संधीसाधू मंडळींची कमी नसल्याने काहींनी राजूला नाव न देण्याच्या अटीवर काम दिलं. पैसे मिळत होते. सुरुवात हवी होती म्हणून राजूने ते घोस्ट डायरेक्शन पत्करलं आणि पुन्हा वाट शोधू लागला. हाती काही लागत नव्हतं, पण घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्तापही होत नव्हता. सृजनाच्या वाटेवर त्याला गजेंद्र अहिरेसारखा सखा भेटला. तो गजासोबत काम करू लागला. दोघांचं जमलं. आजही राजू गजेंद्रला गुरू मानतो. त्याच्या आताच्या राजू सावंत असण्यामध्ये गजेंद्रचा खूप मोठा वाटा असल्याचे राजू मनापासून कबूल करतो.

‘‘मुंडी काट के निचे रखो, शॉट मिल जाएगा।’’ तोवर प्रमुख सहायक दिग्दर्शक या पदावर पोहोचलेला राजू अनाहूतपणे, उत्साहाच्या भरात बोलून गेला आणि गजेंद्र अहिरेचा एक कटाक्ष त्याला जागेवर जखडून गेला. शॉट ‘मुंडी काट के’ (म्हणजे कॅमेरा फक्त, बाकी काही नाही) असाच करण्यात आला. शूटिंग संपलं. गजेंद्र आणि राजू दोघेही मुलुंडचे, परतीला सोबत निघाले. शांत असलेला गजा शांतता छेदत म्हणाला, ‘‘अजून वर्षभरानं तू माझ्यासोबत काम करणार नाहीस.’’ ‘‘का?’’ राजू.

‘‘कारण तुला आता माध्यमभान यायला लागलंय.’’ संवाद संपला.

‘‘तुम्हाला लोक शिव्या घालतायत पप्पा.’’ राजूची मुलगी राजूला सांगू लागली. राजूला कळेना काय ते. ‘‘का?’’ राजूचा प्रश्न. ‘माध्यमात स्त्र्ााrचं स्थान’ यावर आमच्या कॉलेजमध्ये परिसंवाद होता. त्यात तुमच्या सीरियलची उदाहरणं सांगून लोक तुमच्यावर आगपाखड करीत होते. हेच तर हवं होतं राजूला. कारण ती मालिका आपण स्त्रीचा सन्मान व्हावा, तिचा आदर करणं आपण शिकायला हवं, जनमानसात फक्त ते मनोरंजन म्हणून न घेता त्यावर चर्चा व्हावी असं वाटत होते. ते झालं. राजू सुखावला, तो मनोमन विचार करू लागला, मी योग्य मार्गाने वाटचाल करत आहे, एका जबाबदारीने.

सुषमाचं स्थान राजू अनन्यसाधारण मानतो. केवळ आणि केवळ तिच्यामुळेच राजूला त्याला हवं ते करता आलं. अशा अनेक सुषमा जन्माव्यात, जेणेकरून एक्स-रेमध्ये जे दिसत नाही तेही आपल्या जोडीदारानं वाचावं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या