
>>मिलिंद शिंदे
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि दिग्दर्शक अशोक राणे. चित्रपटांचा एनसायक्लोपिडिया त्यांच्या मेंदूत नेहमीच मौजुद असतो.
‘दादाभाई नवरोजी, राम गणेश गडकरी आणि अशोक राणे या तीन महान विभूतींचा जन्म गुजरातमधल्या नवसारीमध्ये झाला आहे’’ असं अशोक राणे गमतीने सांगतात.
‘कथा तिच्या लग्नाची’ या ते दिग्दर्शित करत असलेल्या सिनेमाच्या निमित्ताने आमची भेट झाली. स्क्रिप्टपासून ते कोणता शॉट ते कसा चित्रित करणार हे सगळं इत्थंभूत तयार. शिस्त, दिग्दर्शकीय दृष्टिकोन आणि त्यांच्या ठायी असलेला प्रचंड सिनेमा या माध्यमाचा अभ्यास हे त्यांच्यासोबत काम करताना पदोपदी जाणवतं. ते दिखावा करीत नाहीत ज्ञानाचा ते आपल्याला आकर्षित करतं. आपली सिनेमाविषयक भूक भागवतं त्यांचं ज्ञान… आणि मग पुन्हा भूक जागवतं. अशोक राणेंसारख्या सर्जनशील आणि सृजनशील दिग्दर्शकासोबत काम करणं म्हणजे उत्तम पर्वणीच की… मी विषय काढून काढून त्यांच्याकडून माहिती मिळवत असे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या इतका सिनेमाचा अभ्यास असलेला माणूस विरळाच. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून त्यांचं ज्ञान तर जाणवतंच, पण ते वल्ली अवलिया आहेत. त्यांच्या मनस्वी असण्याचा हा किस्सा पाहा…
दुपारी तीन वाजता मॅथेमॅटिक्सचा पेपर, साधारणतः कुठलाही परीक्षार्थी अभ्यास करतो ना, पण नाही… अशोक राणे सकाळी साडेअकराचा सिनेमाचा शो पाहायला गेले. कुठलंही पुस्तक सोबत न घेता. पूर्ण अडीच तासांचा सिनेमा पाहून ते तडक परीक्षा केंद्रावर गेले. पेपर लिहिला. जेव्हा निकाल लागला तेव्हा त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते. हे सिनेमाचं आकर्षण त्यांना जगभर घेऊन गेलं. अजूनही ते वर्षातले सहा ते सात महिने विविध चित्रपट महोत्सवांतून आमंत्रित म्हणून तर कधी परीक्षक म्हणून हजेरी लावतात. मी त्यांना या मुलाखतीच्या निमित्ताने फोन केला तेव्हाही ते बर्लिनला होते चित्रपट महोत्सवासाठी…
तथापि जगभर सिनेसोहळय़ाला हजेरी लावणाऱया या मनोज्ञ व्यक्तीचा प्रवास छबिलदासच्या आणि आविष्काराच्या मांडवाखालून झाला हे ते अगदी नम्रतेने कबूल करतात आणि तो जो रंगसंस्कार त्यांच्यावर झाला त्याबद्दल ते अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.छबिलदास, आविष्कारच्या माध्यमातून एक दृष्टिकोन तयार झालेल्या अशोक राणेंच्या वाटेत प्रभात चित्र मंडळ आलं आणि अशोक राणे आणखी श्रीमंत होऊ लागले. जणू काही याचाच शोध होता आणि त्या सिनेविश्वात ते सामावून गेले.
अशोकजी मागची 42 वर्षें सिनेमा माध्यमाविषयी सातत्यानं लेखन करत आहेत आणि सिनेमाविषयक लिहिणाऱया माणसाला सिनेमा करावा, लिहावासा वाटणं हे ओघानं आलंच. त्यांनी काही सिनेमे लिहिले, पण दुर्दैवानं त्या कथांनी, पटकथांनी सिनेमाचा पडदा पाहिलाच नाही. का असं होतं ते उमगत नाही म्हणूनच तर ही मायानगरी आहे.पण त्यांना काहीतरी सांगायचे होतं, व्यक्त व्हायचं होतं, मांडायचं होतं, अधोरेखित करायचं होतं. त्यांनी मग शॉर्ट फिल्मस् आणि डॉक्युमेंटरीज यांना जवळ केलं आणि मग एक अभियान सुरू झालं. वेगळं, अनोखं काहीतरी सांगायचं आणि यातून जन्म घेतला अनेक हरवलेल्या, दुर्लक्षित राहिलेल्या, अनुल्लेख झालेल्या गोष्टींनी… व्यक्तींनी…
‘दशावतार’ ही त्यांची डॉक्युमेंटरी (माहितीपट) अतिशय लक्षवेधी ठरली. काही माहीत नसलेल्या किंवा अनुल्लेखित गोष्टी समजल्या. जसं ‘नमनखेळे’ या त्यांच्या माहितीपटातून समजलं की, रत्नागिरी, कोकणात हा नमनखेळे प्रकार प्रचलित आहे. तोच नृत्यप्रकार मराठी रंगभूमीवरचा मानदंड ठरलेल्या सन्माननीय जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात मानवी भिंत म्हणून फार कौशल्यानं वापरलाय. पं. तुळशीदास बोरकर हा विषय त्यांनी माहितीपटातून खुबीनं वापरलाय. हे तर अगदीच मला आवडलेलं आणि भावलेलं. ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपुर संसार’ या सत्यजित रे यांच्या गाजलेल्या जगद्विख्यात ‘अपुर ट्रिलाजी’वर अशोक राणे यांनी त्या तिन्ही सिनेमांतील महत्त्वाचं पात्र असलेल्या ‘अपु’ या पात्राचा गाभा धरून एक माहितीपट बेतला. ‘Beng with Apu’ गाजलेल्या तीन सिनेमांतील एक पात्र धरून त्याचं स्वभावचित्र उभं करणं हे सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं. ते अघटित साकारलं अशोक राणे यांच्या कल्पनेतून.
‘दत्तूठेका’ हे बिरुद ज्यांना लाभलं असे दत्ताराम यांच्यावर (ढोलकवादक) ‘मस्ती भरा है समा’ हा माहितीपट अशोक राणेंच्या संगीत रसिकतेची दाद आहे. ‘ऍन्थनी गोन्साल्विस’ हा त्यांचा अतिशय वेधक असा माहितीपट. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीत द्वयींमधले प्यारेलाल ज्यांच्याकडून व्हायोलिन हे वाद्य शिकले त्या ऍन्थनी गोन्साल्विस यांच्यावरचा हा माहितीपट खरंच रसग्रहण करण्यासारखा आहे. त्यांच्या ‘Singing in Cinema’ या त्यांच्या संशोधनपर माहितीपटाबद्दल जेव्हा समजलं तर मी हबकूनच गेलो. ‘हिंदुस्थानी सिनेमात गाणी का आहेत?’ अशा पाश्चिमात्य जगाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर राणे यांनी त्यांना या माहितीपटातून सोदाहरण दिलं. त्यासाठी त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानी सिनेसंगीताचा संगीताचा अभ्यास करून त्याचं सिनेमात असणं किती अपरिहार्य आहे हे दाखवलं. निवडक पाचशे गाण्यांचा अभ्यास करून हिंदुस्थानी सिनेमात फक्त 26 (सव्वीस) प्रकारची गाणी असतात हे सप्रमाण सिद्ध केलं. कविता महाजन यांच्या ‘ब्र’ कादंबरीवर आधारित ‘बाईमाणूस’ हा वेगळय़ा वळणाचा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही याची त्यांना मनोमन खंत वाटते.
साधारण पाच दशकांच्या त्यांच्या सिने-नाटय़ प्रवासात त्यांनी विपुल सिनेलेखन, वृत्तपत्र लेखन केलं. त्यांना त्या कामाची पावतीही मिळाली. लोकदरबारी आणि शासनदरबारीही. 1996 साली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘जागतिक सिनेमाची चित्तरकथा’ या कलाकृतीला 2003 साली समीक्षक म्हणून पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार. ‘मस्ती भरा है समा’ ऍन्थनी गोन्साल्विस यांनी राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवलं.
अशोक सर, तुमचं कौतुक करावं इतका मोठा मी नाही. होणारही नाही. पण ज्यानं जगभर सिनेमासाठी सफर केली त्या अशोक राणे यांच्याकडून नवीन सिनेमाची वाट पाहतो आहे. माझ्यासाठी तुम्ही कायमच आदरणीय आहात. कारण माझ्यासाठी तुम्ही ‘सर अशोक राणे’ आहात…
जय सिनेमा सर…

























































