दुर्दम्य इच्छाशक्तीला साथ दत्त महाराजांची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मोहन कुलकर्णी

सिद्धभूमी गिरनार म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान. या ठिकाणी जाण्याची ओढ प्रत्येक दत्तभक्ताला असते. 10,000 पायऱया चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असतं. अशाच कसोटीच्या क्षणांची आठवण करून देणाऱया गिरनार मोहिमेची ही हकिगत

सौराष्ट्रमधील जुनागढ इथे वसलेले श्रीक्षेत्र गिरनार इथे प्रत्यक्ष जाऊन दर्शनाचा योग येणं म्हणजे खरोखरच त्याला नशीबवान म्हणावं लागेल. त्यातही विशेष म्हणजे माझ्यासारख्या अनेक वर्षे आजारी असलेल्या एका पामराची आणि असाच योग आम्हालादेखील आला. मला स्वत:ला दोनदा हार्ट अॅटॅक दोन वेळा अँजिओग्राफी, एकदा अँजिओप्लास्टी एक पॅरालिसीसचा अॅटॅक व चार मोठे अपघात अशी परिस्थिती असतानादेखील फक्त दत्त महाराजांची असीम कृपा व आमचे मित्र श्री. किशोरजी खवले यांच्यामुळे माझी गिरनार यात्रा संपन्न झाली.

गुजरातमधील जुनागढला पोहचलो. खूप लांबूनच हा गिरनारचा पर्वत दिसत होता आणि नुसता डोळ्यांनी बघूनच तो पर्वत सर करण्याची ओढ आम्हा प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होती. थोडीशी मनात असलेली भीती, आणि वरच्या टोकापर्यंत पोहचण्याची लागलेली ओढ ह्यांची सांगड घालताना खरोखरच मनात छोटंसं वादळ येऊन जात होतं. कारण गिरनार पर्वत हा खरोखरच शारीरिकरीत्या आणि मानसिकरीत्या परीक्षा घेणारा होता. सुमारे 10 हजार पायऱया चढून 3666 फुटावर असलेल्या या स्थानावर आपल्याला जायचेच आहे ही मानसिक तयारी आमची झाली होती. आता परीक्षा होती ती मात्र शारीरिकरीत्या तयार असण्याची. लक्ष्य एकच होते. ते टोकावरचं मंदिर अर्थातच गुरू शिखर. पहिल्या पायरीला नमस्कार करत रात्री 9.30 ला आम्ही सगळ्यांनी अविस्मरणीय यात्रेच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली.

समोर पायऱया दिसत होत्या आणि वर वर जाणारे बाजूने असणारे दिवे. गप्पा मारत मारत पुढे जात होतो. आमच्या प्रत्येकाच्या शारीरिक सुदृढतेनुसार त्यांचा त्यांचा चालायचा वेग कमीजास्त होत होता. उजव्या हाताला कठडा, त्यामागे झाडं आणि डाव्या हाताला मोठमोठे दगड होते. त्यावर यात्री विश्रांतीला बसत. काही ठिकाणी तर दिवसभर यात्रा करून तिथेच वस्तीला असलेलेदेखील दिसून येत होते. 1000, 1500, 2000… पायऱया चढत गेल्यावर तो समोर येणारा आकडा अजून ताकद देत गेला.

स्वामी समर्थांचे आणि दत्त महाराजांचे नामस्मरण, गाणी म्हणत, ऐकत आम्ही चौघेजण पुढे होत होतो. वर मान करून बघावं तरी फक्त छोटे छोटे होत जाणारे दिवेच दिसत होते. त्यावरून आम्हाला अजून किती आहे याचा अंदाज येत गेला. सहजच मागे बघितलं. जुनागढ शहर झगमगत होतं आणि त्याच झगमगीत ओमचा आकार दिसत होता, खूपच सुंदर दृश्य होत ते. या प्रवासात एक गोष्ट नक्कीच लक्षात आली ती म्हणजे शारीरिक शक्तीपेक्षा मनाची शक्ती नेहमीच बाजी मारते.

आम्ही हळूहळू 3000-4000 एक एक टप्पा ओलांडून वर येत होतो. आता सरळ येणाऱया पायऱया कमी आणि उंच आणि उभ्या यायला सुरुवात झाली होती. तिथेच श्रीक्षेत्र नेमिनाथ जैन धमिऱयांचे स्थान स्थित आहे. साधारण एक वाजून गेला होता. आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. फक्त आम्हीच. होता तो फक्त गार वारा आणि भन्नाट शांतता. इथपासून खाली वाकून बघितलं तर खालचे वळवळत जाणारे दिवे दिसत होते. आणि आत्ता मात्र वाट पूर्ण बदलून जाणार होती, कारण एक डोंगर आम्ही पूर्ण चढून आलो होतो आणि हाच डोंगर पुढच्या बाजूने अर्धा उतरून दुसरा डोंगर पूर्ण चढायचा होता. दुसऱया टप्प्याची वाटही खरोखर आमची वाट लावणारी होती. आम्ही दुसऱया टप्प्याला सुरुवात केली होती. पण खरी परीक्षा आता होती. थंडी जाणवू लागली होती. त्यासोबतच तो वाऱयाचा वेग वाढला होता. आणि त्या काळोखाच्या रात्रीत ऐन कठीण वाटेवर एक दिवादेखील नव्हता. पूर्ण काळाकुट्ट अंधार होता. या सगळ्यात आठवणीत राहणारी म्हणजे ती नसलेली कडा. कुट्ट अंधार, जोरदार धुक्याचा वारा आणि एवढय़ा उंचीवर एका बाजूला नसलेली कडा. आधाराशिवाय एकटा माणूस उभा राहू शकत नव्हता त्यावेळी. अजूनही दुसरी कडा चढायची बाकी होती. आता गाणी गप्पा काहीच सुचत नव्हतं कोणाला. फक्त ‘किती पायऱया झाल्या असतील रे?’ ‘कधी येईल ग मंदिर?’ ‘वर चढायचं आहे ना अजून?’ हेच शब्द पुडपुडत ओठातून निघत होते. पहाटेचे 2.30 वाजून गेले होते पायऱया मात्र संपत नव्हत्या. थोडय़ा वेळाने समोर एकच उंचच्या उंच वर जाणाऱया सलग पायऱया दिसल्या. आम्ही त्या सलग पायऱया चढायला लागलो. 2-3 वळणं घेतल्यानंतर वरती पत्र्यासारखं काहीतरी दिसू लागलं. ते मंदिर आहे हे कळल्यावर खूप समाधान वाटलं. जरी ते वरती दिसत असलं तरी तिथपर्यंत जायला अजून तीन एकशे पायऱया सर करायला लागणार होत्या.

या शेवटच्या टप्प्यात आम्हाला ती शक्ती पुठून आली हे आम्हालाही कळले नाही. काहीच वेळात आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. खूपच उंचावर असलेलं एकच डोंगराच्या कडेवर असणारं ते छोटंसं मंदिर. 10,000 पायऱया सर करून त्या मंदिराच्या उघडय़ा असलेल्या दाराजवळ माथा टेकला आणि आत मधे डोकावून पाहिलं. श्रीदत्त महाराजांची तेजस्वी मूर्ती आणि त्या पादुका पाहून सगळा थकवा आणि देहभान तात्पुरते विसरूनच गेलो होतो आम्ही आणि अक्षरश: वीस मिनिटे दत्तात्रय महाराजांच्या पादुकांसमोर बसून घळाघळा रडत होतो. आनंदाश्रू अनावर झाले होते. आम्हाला ज्याची आस होती ते ‘श्री संक्षिप्त गुरुचरित्र’देखील ऐकायला मिळालं. आयुष्यातल्या अनमोल क्षणांपैकी एक होतं.

वेळ जाऊ लागला तसे यात्री येऊ लागले. 6.15 नंतर आमच्या मागे एक एक करत लांबच लांब दर्शनाची रांग तयार झाली आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढय़ा उंचावर एवढय़ा थंडीत पायऱया चढून त्यांच्यासोबत कुत्रादेखील आला होता जो आमच्याबरोबर पहिल्या पायरीपासून सोबतीला होता. काय महिमा असावा त्याचा! मंदिर येताच ते श्वान आता गायबच झाले होते ते शेवटच्या पायरीवर उतरतानाच दिसले. बहुदा आम्हाला सुखरूप वर नेण्यासाठी आणि परत खाली नेण्यासाठीच महाराजांनी दूतरूपाच्या उद्देशाने तो पाठवला असावा.

आम्ही दर्शन घेतलं…महाराजांच्या अखंड धुनीचे दर्शन घेतले. विभुती मिळाली. परतीच्या प्रवासाला निघालो. ‘एवढं उंच आलो आहोत 10 हजार पायऱया त्याच आता परत खाली उतरायच्या आहेत.’ कठीण होतं, पण अशक्य नाही. पण आमचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण जे अशक्य ते शक्य करून दाखवले होते महाराजांनी.

ज्यासाठी अट्टहास केला होता ते आम्हाला मिळालं होतं. पण शारीरिक थकवा उतरताना जास्त जाणवत होता. जेव्हा आम्ही परतीला निघालो तेव्हा बरेच जण वर येताना दिसत होते. काहीजण डोलीमधे बसून दर्शनाला येत होते. ती डोली उचलून भक्तांना खांद्यावर घेऊन 10 हजार पायऱया चढून येणाऱया त्या कष्टकरू माणसांना मी मानलं होतं. एकच पर्वत, पण हजारो भक्त आणि त्यांची होणारी परीक्षा विलक्षण आहे. परत येताना मात्र पाय थरथर करत होते. पण तेव्हा माझ्या किशोरने खरी मदत केली. आणि तीच मैत्रीची काठी आम्हीदेखील दुसऱया कोणाला तरी द्यायची ठरवली जेणेकरून त्यांनादेखील अशीच मदत व्हावी. विश्रांती घेत घेत आम्ही येत होतो. कधी खाली पोहचू असं वाटतं होतं. जवळ येताच आम्ही ती काठी जिथून घेतली होती तिथे परत दिली. पाऊले टाकत वेळेशी आणि पायऱयांशी संघर्ष करत एकदाचे आम्ही पुन्हा एकदा पायथ्याशी आलो. परत एकदा महाराजांना नमस्कार केला. मागे वळून त्या उंच पर्वताकडे बघितलं आणि मनातून स्वत:ला खूप नशीबवान समजत होतो.

पूर्ण रात्रीत केलेला तो प्रवास डोळ्यासमोर येत होता. शेवटी रूमच्या खिडकीत बसलो आणि त्या पर्वताकडे एक कटाक्ष टाकला. अजूनही असंच वाटत होतं की तो प्रवास संपला नाहीये. खरोखरच जर श्रध्दा असेल तेथे महाराज स्वत: मार्ग दाखवतात याची प्रचीती आली. त्यामुळे फक्त आणि फक्त महाराजांच्या वर असलेली श्रध्दाच तुम्हाला तो अशक्य वाटणारा डोंगर लीलया पार करायला मदत करते.