
>> नमिता वारणकर
थंडीचे दिवस… जत्रांचे दिवस.. विविध कलावंतांच्या कारागिरीचे दिवस… हुनर हाट… माणदेशी महोत्सव, ग्राहकपेठ यातून देशभरातील कलावंतांच्या हातांना रोजगार मिळतो…
देशभरातील कलाकारांना त्यांची कला साकारण्याची संधी मिळावी याकरिता ‘हुनर हाट’ हे प्रदर्शन 31 डिसेंबरपर्यंत बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. महालक्ष्मी सरस, माणदेशी महोत्सव, कोकण महोत्सव…तर आता हुनर हाट…अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱया महोत्सवांचं आयोजन आपल्याकडे होत असतं…त्यामुळे माणदेश, राजस्थान, कोकण, मध्य प्रदेश अशा अनेक देशांतील खाद्यसंस्कृती, संस्कृती, पोषाख, लोककलांची ओळख होण्याबरोबर तिथलं संवादकौशल्य, पारंपरिकता, वेशभूषा यांचाही आनंद घेता येतो.
बाजारपेठेच्या गरजेनुसार कलाकार आणि कारागीर यांच्या कौशल्यावर भर देण्यासाठी ‘हुनर हाट’ या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या विविध राज्यांतील कारागीर आणि शिल्पकार, हस्तकलाकारांना त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्याची संधी मिळावी, स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेता यावा, लोकप्रिय कलाकारांना सांस्कृतिक आणि संगीतविषयक कार्यक्रम सादर करता यावेत, हा उद्देश असे महोत्सव साजरा करण्यामागे आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर महोत्सवाचं आयोजन कसं केलं जातं, याविषयी माणदेशी महोत्सवाच्या आयोजिका उज्ज्वल सामंत सांगतात, महोत्सवानिमित्त महिलांमधील कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळतो. या महिला स्वतःच विविध वस्तू तयार करून आपल्या घराचा भार वाहतात. त्यांना मुंबईसारख्या शहरी भागात एक मंच मिळतो. शिवाय महानगरातील नागरिकांना देशोदेशीची संस्कृती कळते.
रोजगारासोबतच प्रसिद्धी मिळते. समाजात कौतुक होतं. आत्मविश्वास वाढतो. त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी दुपटीने ऊर्जा मिळते. शिवाय बहुभाषिक, बहुसांस्कृतिक लोकांशी परिचय होतो. मुंबईसारख्या ठिकाणी होणाऱया महोत्सावात भाग घेतल्याने त्यांचा बहुसांस्कृतिक लोकांशी परिचय होतो. विचारांचे आदान-प्रदान होते.
महिला सक्षमीकरण
पुरातन कला, संस्कृतीची जपणूक करणे, नव्या पिढीला जुन्या पुरातन गोष्टींची, कलाकृतींची ओळख या महोत्सवाद्वारे होत असली तरीही खलबत्ते, सुपली, केरसुणी, जात्यावरील कोरीव काम, इतर कलाकुसरीच्या अनोख्या वस्तू पुरुष कारागिरांप्रमाणे महिला कलाकार साकारतात. त्यांनी बनवलेल्या चटण्या, लोणची, पापड यांना बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक असते, जेणेकरून त्यांना याचा आर्थिक लाभ होईल. महोत्सवांच्या माध्यमातून या महिलांचे सक्षमीकरण होते. त्या बनवलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या व्यवसायात वाढ होते. ‘हुनर हाट’मध्येही महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात आहे.
चटकदार खानपान
अवधी खाना, राजस्थानी दाल बाटी चुरमा, गुजराती थाळी, चुरमा, केरळी मलबार फूड, तामीळ पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ, बंगाली मिठाई, सुगंधी पान, असा खानापानाची रेलचेल खवय्यांसाठी आयोजित केली आहे.
महोत्सवातलं समाजकारण-अर्थकारण
विविध महोत्सवांच्या समाजकारण आणि अर्थकारणाविषयी त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे कलाकार महिला, पुरुष यांच्या जीवनातही आमूलाग्र बदल होतो. त्यांना रोजगाराच्या विविध संधी याद्वारे मिळवून दिल्या जातात. यामुळे देशभरातील कारागीर आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होतात. पूर्वीच्या काळात बारा बलुतेदार ही आपल्या समाजाची एक पद्धत होती. यांच्यामुळे खेडी स्वयंपूर्ण होती. गावातल्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. कालौघात हे सारं काही बदललं. महोत्सवाद्वारे लेहार, कुंभार, सुतार, कासार, चर्मकार, साळी, माळी अशा सर्वच कारागिरांना संधी मिळते. त्यांची कला सादर होते. अशा प्रकारच्या महोत्सवामुळे सामाजिक एकरूपतेचा संदेश आपसूक लोकांना मिळतो. शिवाय लाखो रुपयांची उलाढाल होऊन या महिलांच्या हातात थेट पैसा येतो.
‘हुनर हाट’चे अनोखेपण
‘हुनर हाट’ प्रदर्शनात देशभरातील विविध भागातील कलाकार सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. आसामचे बांबू, वेत, झारखंडच्या सिल्कच्या साडय़ा, भागलपुरी सिल्क आणि लिनन, लाख आणि पारंपरिक दागिने, लखनवी चिकन, उत्तर प्रदेशचे सिरॅमिक, काचेच्या वस्तू, पितळी भांडी, चामडे, संगमरवरी वस्तू, आंध्र प्रदेशातील कलमकारी, मंगलगिरी आणि मोत्यांचे दागिने, गुजरातचे अजरख, तांब्याच्या घंटा, पतियळची फुलकारी आणि जुत्ती, मध्य प्रदेशचे बाटिक, चंदेरी, महेश्वरी, जम्मू-कश्मीरचे होम फर्निशिंग, राजस्थानी स्वदेशी हॅण्डीक्राफ्ट, हॅण्डलूम उत्पादने पाहण्याचा आणि ती विकत घेण्याचा आनंद यामध्ये घेण्यात येईल. याशिवाय सुफी संगीत, नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रमही पाहता येतील.

























































