गाणं… गाणं… गाणं!

676

>> नमिता वारणकर

गाण्याने श्रम होतात हलके… हेच ब्रीदवाक्य सिंगेथॉन ही कल्पना पुढे चालवते आहे.

सिंगेथॉन… म्हणजे गाण्याची मॅरेथॉन… हा शब्द ऐकून कानांना जरा वेगळं वाटलं असेल. धावण्याच्या शर्यतीप्रमाणेच हौशी गायकांसाठी चक्क गाण्याची स्पर्धा होणार आहे… यामध्ये मॅरेथॉनप्रमाणेच कुणालाही अगदी मुक्तपणे, विशेष म्हणजे कुणाचीही पर्वा न करता गाता येईल, हे या शर्यतीचं अनोखं वैशिष्टय़.

ज्या व्यक्ती गातात त्या सतत आनंदी असतात. त्यांचे आयुष्य वाढते. आरोग्यही उत्तम राहाते. यासाठी प्रत्येकाने मुक्तपणे गायले पाहिजे. मुक्तपणे गाताना तुम्ही चालीत गाता की नाही यापेक्षा गायल्यामुळे स्वतःला आणि इतरांना मिळणारा आनंद महत्त्वाचा असतो. याचा अनुभव सर्वसामान्यांनाही घेता येण्यासाठी ‘सिंगेथॉन 28’चं आयोजन करण्यात आलं आहे.
या वैशिष्टय़पूर्ण स्पर्धेविषयी स्वरमानस संस्थेच्या संस्थापिका आणि गायिका मानसी केळकर-तांबे सांगतात, प्रत्येकामध्येच एक गायक लपलेला असतो. सिंगेथॉनच्या माध्यमातून गाण्याकरिता अशा गायकांना आम्ही गाण्यासाठी साधन उपलब्ध करून देत आहोत. प्रत्येकात लपलेल्या गायकाला गाता यावं महत्त्वाचं म्हणजे गाणं ही एकमेव कला अशी आहे की, जी तुम्हाला शेवटपर्यंत साथ करते. म्हणूनच ‘सिंगेथॉन 28’चं आयोजन आम्ही केलं आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणाऱया निधीपैकी काही भाग स्वरमानसतर्फे ‘राह फाऊंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे. पालघर जिह्यातील जव्हार आणि मोखाडा भागांमधील आदिवासींचे जीवनमान अधिक चांगले करण्यासाठी हा निधी वापरला जाईल. या स्पर्धेची महाअंतिम फेरी 17 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या क्षेत्रात अशा खूप लोकांना बघितलंय की, आवाज चांगला असेल तरच गाणं म्हणायचं, अशी त्यांची समजूत असते. लोकांचा असा समज होऊ नये, तसेच काही जण सुरुवातीला गाताना विसरतात. तरीही समोरच्याला गाण्यासाठी प्रोत्साहित करणं खूप महत्त्वाचं आहे. हा आत्मविश्वास यामुळे स्पर्धेमुळे निर्माण होतो. महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्यांना सर्टिफिकेट मिळेलच शिवाय निवड न झालेल्या स्पर्धकांना फ्री ग्रुमिंग म्हणजे कसं गायला हवं, स्पर्धेकरिता गाण्यासाठी काय महत्त्वाचं? या महत्त्वाच्या टिप्स दिल्या जातील, अशी माहिती मानसी केळकर-तांबे देतात.

आनंदाचा प्रसार करणे आणि इतरांना आनंदी करणे हे सिंगेथॉनचे उद्दिष्ट आहे. शिवाय प्रत्येक जण गाऊ शकतो हे आमचे ब्रीद असून, आम्ही प्रत्येकाला गाण्याची समान संधी देतो आणि गायन हे केवळ व्यावसायिक गायकांसाठीच असते, हा समज या स्पर्धेमुळे नक्कीच दूर होईल. ‘कोणीही गाऊ शकतो’ हा साधा विचार अंमलात आणून ‘बाथरूम सिंगर्स’पासून नवोदित गायकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा स्वरमानसचा प्रयत्न आहे.

वयोगटाप्रमाणे गाणी
‘सिंगेथॉन 28’ या गायनाच्या मॅरेथॉनची प्राथमिक फेरी 12 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत दादर (प.) येथील साने गुरुजी विद्यालयात आयोजित करण्यात आली असून 4 ते 80 वयोगटातील व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सिंगेथॉन 28 हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्यात वयोगटानुसार विभाग करण्यात आले आहेत. 16 वर्षे आणि पुढील वयोगटासाठी रोमँटिक बॉलीवूड गाणी ही संकल्पना आहे तर 10-15 या वयोगटातील मुलांसाठी लोकगीते आणि उडती बॉलीवूड गाणी तर 4 ते 9 या वयोगटासाठी देशभक्तीपर, बॉलीवूडमधील लहान मुलांची गाणी असे विभाग असतील.

स्पर्धेचे काही नियम
– ही स्पर्धा व्यावसायिक स्पर्धकांसाठी नाही.
– प्रत्येक गाण्यासाठी चार मिनिटांचा वेळ दिला जाईल. पहिल्या फेरीत एक मुखडा आणि एक अंतरा ऐकणार आहोत.
– दुसऱया आणि अंतिम फेरीत पाच-पाच जणांची निवड केली जाईल. त्यांना एक मुखडा आणि दोन अंतरे गाण्याची संधी मिळेल.
– न बघता आणि पाठांतर करूनच गाणं म्हणायचं आहे.
– आवश्यक तर पहिल्या फेरीत विद्युत तानपुऱयाचा वापर स्पर्धक करू शकतात.
– स्पर्धेत निवडून आलेल्यांना ग्रँड फिनालेबरोबर गाण्याची संधी मिळेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या