>> नीती मेहेंदळे
नगर जिल्हय़ातील अकोले हे एक छोटेसे प्राचीन गाव. हेच अगस्तीनगरी म्हणूनही परिचित आहे. गाव छोटे असले तरी येथील शिवमंदिरे पाहून एक शिल्प खजिनाच गवसल्याचा आनंद होतो.
नगर जिल्हा तसा प्राचीनच. त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा जवळजवळ या जिह्यातल्या प्रत्येक गावात पदोपदी आपल्याला दिसून येतात. अकोले हे नगरमधलं असंच एक लहानसं प्राचीन शहर. या शहराचे अगस्तीनगरी असेही दुसरे नाव आहे. अकोले गावात पोचल्यावर सिद्धेश्वर मंदिर शोधण्यात फारसे प्रयास पडत नाहीत. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर त्याच्या विस्तीर्ण प्रांगणाची आणि मंदिराच्या शिल्पकौशल्याची चाहूल लागते. मंदिर कुठेही ऑइल पेंटने न रंगवता आणि काँक्रीटचा आधार न घेता जपले आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीची आहे.
सिद्धेश्वर मंदिर तर कोणीतरी एखाद्या डिशमध्ये केक ठेवावा तसे अलगद जमिनीवर ठेवल्यासारखे नेहमी मला वाटते. इतकं नेटकं बांधकाम! मुख्य सभामंडपात खिडकीतून डोकावल्यास अनेक सुंदर मूर्तींच्या खजिन्याची झलक पाहावयास मिळते. मुख्य गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतल्यानंतर सभामंडपात जाण्यासाठी मंदिराच्या पुजाऱयाकडून चावी घेऊन जावे लागते. सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन शिवमंदिर असून प्रवरा नदीच्या काठावर शिलाहार राजवटीत साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात बांधले गेले असावे असे इतिहासकार सांगतात. हे मंदिर अंदाजे इसवी सन 1780पर्यंत प्रवरा नदीच्या गाळाच्या मातीत गाडलेल्या अवस्थेत होते. त्याचा उत्तर व दक्षिण सभामंडप हे लहान मंडप आहेत. आणि नंदी मात्र पूर्वेच्या मंडपात आहे. पूर्व व पश्चिम दिशांच्या द्वारशाखा, गाभारातले कोरीव काम उल्लेखनीय असे आहे. महाराष्ट्रात स्थापत्यातील शिल्पवैभवात उंट दिसणे तसे दुर्मिळच पण ते इथे आढळतात हे अधोरेखित करावेसे वाटते. खांब अतिशय कल्पक कोरीव कामाने मढलेले आहेत आणि खांबांच्या तळाशी अनेक देवदेवता कोरलेल्या आहेत. बाहेरच्या दक्षिण व उत्तरेतल्या देवकोष्ठांमध्ये चामुंडा आणि नटराज यांच्या मूर्ती दिसून येतात.
सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीव काम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, समुद्रमंथनासारखे काही पौराणिक प्रसंग बाह्य भागात अश्वथर, गजथर, असा शिल्पखजिनाच समोर मांडून ठेवलेला आहे.
अकोले शहराच्या मध्यवस्तीत कमानवेस परिसराजवळील श्री गंगाधरेश्वर मंदिराचा बाहेरून आवाका येत नाही पण आतून खूप आकर्षक असून मंदिराचे बांधकाम दगडांच्या वैशिष्टय़पूर्ण कलाकृतीतून साकारलेले आहे. गंगाधरेश्वर हे सध्या खासगी मालकीचे असलेले मंदिर तसे अलीकडच्या काळात, म्हणजे पेशवाईत बांधले गेले आहे. सिद्धेश्वराच्या जीर्णोद्धाराच्या काळात म्हणजे सन 1782मध्येच याचे बांधकाम पूर्ण झाले व उत्तर हिंदुस्थानी ब्राम्हणी पद्धतीने मंदिराचे काम जयपूरच्या कारागीरांनी पूर्ण केले असे बॉम्बे गॅझेटियर व ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार समजते. मालकांची परवानगी व किल्ली घेऊन मंदिर पाहता येते. मंदिराच्या प्रत्येक आतील वा बाहेरील कानाकोपऱयात व भिंतीवर सुंदर, रेखीव कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. सजीव वाटावीत अशी कमलदल व इतर पाकळ्या व फुलांची शिल्पे मंदिरात आहेत. शिखराच्या तिन्ही बाजूंस असलेल्या ध्यानस्थ शिवमुद्रा विशेष उल्लेखनीय आहेत. गोलाकृती सभामंडप व त्यातील मजबूत सुंदर खांबांनी मंदिरास आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. सभामंडपाच्या वर मध्यभागी असलेले उलटे दगडी कमलपुष्प व खाली फरशीवर असलेले पितळी अष्टदलांची रांगोळी अचंबित करते. विशाल वृक्षाच्या छायेतल्या या मंदिरात सुबक नेटके मांडलेले शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल, कोरीव खांब, प्राचीन काचेची झुंबरे, प्रशस्त फरसबंदी यावर यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू नये असे. हे मंदिर जवळच्याच सातुरीच्या टेकडीवरील दगडांपासून बांधण्यात आले आहे असे गावकऱयांकडून सांगितले जाते. गावाच्या एका टोकाला अगस्ती आश्रम आहे ज्यात प्राचीन शंकराच्या पिंडींचे अनेक पुरावे मिळाले आहेत. ते आश्रमभर इतस्ततः आपल्याला दिसून येतात. रामायण काळात राम, सीता या आश्रमात आले होते व अगस्ती ऋषींनी रामाला एक अमोघ बाण दिला जो त्याने रावणाच्या वधासाठी वापरला अशी पुराणात कथा आहे. अप्सरांच्या अनेकविध मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले अजून एक हेमाडपंथी टाहाकारीचे जगदंबा मंदिर हेही अकोलेहून थोडय़ाच अंतरावर आहे.

























































