
>> नीला उपाध्ये
कथा याच वाङ्मय प्रकाराचा ध्यास घेऊन आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी केवळ कथा व कथाकार यांच्याबद्दलच समर्पित भावनेने लेखन केले ते कथाक्रती अरविंद गोखले यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. मात्र महाराष्ट्र सरकारला त्याचा सोयिस्करपणे विसर पडलेला दिसतो.
प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करते – गदिमा, बाबूजी व पु. ल. हे तिघेही मलाही खूप आदरणीय वाटतात आणि त्या तिघांचाही व्यक्तिगत लोभ एक सांस्कृतिक पत्रकार म्हणून शेवटपर्यंत लाभण्याचे भाग्यही मला लाभले होते. त्या तिघांचे स्मरण सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी ठेवले याबद्दल धन्यवादच! कारण गतवर्षी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांची जन्मशताब्दी हे साहित्य-अनभिज्ञ सरकार सपशेल विसरले होते, तेव्हा चाहत्यांना वृत्तपत्रांतून सरकारचे कान टोचावे लागले होते. पण रसिकप्रिय कथाकार अरविंद गोखले यांच्या जन्मशताब्दीबाबत महाराष्ट्र सरकारचे अनभिज्ञतेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
दि. के. बेडेकर, ‘सत्यकथा’कार श्री. पु. भागवत, रा. भि. जोशी यांसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ समीक्षकांनी पन्नासच्या दशकात ज्यांना ‘मराठी नवकथेच्या चार बिनीच्या शिलेदारांपैकी एक’ असे वरचेवर गौरविले, त्या अरविंद गोखले यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1919 चा! एक दुर्दैवी नाटय़मय योगायोग म्हणजे एशियाड बस जेव्हा एस. टी.च्या ताब्यात प्रथम आल्या तेव्हा ‘एशियाड’ नावाची कथा लिहिणाऱया गोखल्यांचा 24 ऑक्टोबर 1992 रोजी त्याच एशियाड बसमध्ये ब्रेक लागल्यावर धडपडून वर्मी मार लागल्याने मृत्यू झाला होता!
तेवढेच लोकप्रिय
यंदा अरविंद गोखलेंची 19 फेब्रुवारीला जन्मशताब्दी सुरू झाली आहे हे लक्षात ठेवून मी ‘कथाक्रती अरविंद गोखले’ हा समीक्षाग्रंथ सिद्ध केला. ग्रंथालीने प्रकाशित केलेला हा ग्रंथ यंदाच्या ‘मराठी राजभाषादिनी’ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली गोखले जन्मशताब्दी प्रारंभ सोहळय़ात प्रकाशित केला. मुख्य म्हणजे, एरवी कुठल्याही ग्रंथ प्रकाशन सोहळय़ात जेमतेम दहा-बारा प्रती विकल्या जातात असा प्रकाशकांचा अनुभव असतो. पण त्या सोहळय़ात मात्र ग्रंथालीने सोबत आणलेल्या सर्वच्या सर्व नव्वद प्रतींची विक्री हातोहात होऊन गेली तरी ‘प्रत कुठे मिळेल?’ हे लोक विचारतच राहिले. त्याहून विशेष म्हणजे त्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन उरणपासून ठाण्यापर्यंत गावोगावची नगर वाचनालये, महिला मंडळे गोखल्यांच्या कथांचे वाचन, त्यांच्या साहित्यगुणांचा आढावा घेणारी स्थानिक मराठीच्या प्राध्यापकांचे भाषण, चर्चासत्रे अशा विविध प्रकारे गोखले जन्मशताब्दीचा एक तरी कार्यक्रम दरमहा साजरा करीत आहेत. अगदी नेहमी इंग्रजीतून जिथे कार्यक्रम होतात त्या एशियाटिक सोसायटीतही संजीवनी खेर, ज्योत्स्ना पटवर्धन यांना पुढाकार घेऊन गोखले जन्मशताब्दी साजरी करावीशी वाटली. मुंबई दूरदर्शनने ‘सखी सह्याद्री’त 27 मार्चला घेतलेला विशेष कार्यक्रम आजही व्हूट ऍपवर पाहता येईल.
जगण्याचे बळ देणारी
एक समीक्षक म्हणून गोखल्यांच्या या रसिकप्रियतेचा विचार करू लागतो तेव्हा लक्षात येते की, गोखल्यांची कथा ही सतत वाचकांना जगण्याचे बळ देत राहिली. त्यांची बलात्कारित ‘जान्हवी’देखील जननिंदेने मोडून पडत नाही किंवा मृत्यूला कवटाळत नाही. उलट ती निर्धाराने जगण्याला सामोरी जाते. त्यांच्या ‘विघ्नहर्ती’तील निपुत्रिक काकू, मानलेल्या मुलाचं लग्न मोडू नये म्हणून आपले पती निधनाचे दुःख दडवून, सामान्य स्त्र्ााrमध्ये दडलेल्या असामान्यत्वाचे दर्शन घडवते. समग्र गुंतागुंतीच्या जीवन वास्तवाचे भान घेऊन अभिव्यक्त होत गेलेल्या त्यांच्या कथा म्हणूनच हिंदी-इंग्लिशबरोबरच रशियन, जर्मन भाषांतही अनुवादित होऊन गेल्या. आता बुकर वगैरेसारखे कैक साहित्य पुरस्कार आशियाई लेखकांना मिळताना दिसतात. पण चक्क 1959 साली लंडनच्या ‘एन्काऊंटर’ मासिकाने घेतलेल्या आफ्रिकी, अरबी, आशियाई कथा स्पर्धेचे पारितोषिक गोखल्यांच्या ‘गंधवार्ता’ या इंग्रजीत अनुवादित कथेने पटकावले होते हे का विसरले जाते?
लघुकथा, दीर्घकथा, लघुत्तम कथा असे कथालेखनाचे अनेक प्रयोग केलेल्या गोखल्यांच्या मनाचा दिलदारपणा कसा दुर्लक्षून चालेल? सदानंद रेगे, व्यंकटेश माडगूळकर, वामन चोरघडे, ना. सी. फडके यांसारख्या ज्येष्ठ तसेच समकालीन कथाकारांच्या निवडक कथा समीक्षापूर्वक प्रकाशित करण्यावरच ते थांबले नाहीत, तर अमेरिकन, पाकिस्तानी, बांगलादेशी कथाकारांच्या कथांचेही त्यांनी मराठीत अनुवाद जाणीवपूर्वक केले.
कथेचे ‘लागीर’ झालेल्या गोखल्यांनी केवळ कथालेखनातच मन रमवण्यासाठी साहित्यिक गटबाजीपासून, कंपूशाहीपासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेवले, जाहीर सभासंमेलनातून मिरवणे टाळत राहिले. साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या मोहापासून ते कटाक्षाने दूर राहिले. गदिमा गोखल्यांचे दोस्त होते. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली म्हणून गोखले अभिनंदन करायला ‘पंचवटी’वर गेले तर त्यांचे हात हातात घेऊन गदिमा गहिवरून त्यांना म्हणाले होते, ‘गोखले, अहो, तुम्ही खरे ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक! खरा हा मान तुम्हाला मिळायला हवा होता.’
दुर्दैवाने राज्यात आज भाजपचे राज्य आले असले तरी सर्व सरकारी समित्यांवर नेहमीचीच मंडळी विळखा घालून बसली आहेत. या मंडळींना गोखल्यांच्या संस्कारक्षम अभिरुचीसंपन्न साहित्याचे मोल कसे कळावे!
पहिली आवृत्ती पाच महिन्यांतच संपलेल्या ‘कथाक्रती अरविंद गोखले’ या माझ्या ग्रंथाची प्रत भेट देऊन मार्चमध्येच मी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना या गोखले जन्मशताब्दीचे स्मरण करून दिले होते. पण पुढे काहीच झाले नाही. कथाक्रती अरविंद गोखले पुन्हा दूर्लक्षितच केले गेले.



























































