
>> डॉ. नीलम ताटके
पुस्तकाचं शीर्षक ‘वादग्रस्त पुस्तके आणि कलाकृती’ वाचकांची उत्कंठा वाढवणारं, काय वाचायला मिळणार याची उत्सुकता लावणारं. आपल्याकडे सामान्यतः अशी प्रथा आहे की एखाद्या कलाकृतीवर बंदी आणली की त्याचा बोलबाला जास्त होतो. ते पुस्तक, तो चित्रपट यात नेमकं काय आहे हे पाहावंसं वाटतं. याबद्दल एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते की आज बंदी घातलेल्या कलाकृती काळाच्या पुढचा विचार करणाऱया असतात. म्हणून आज भयंकर वाटणारं, नापसंत केलेलं पाच-दहा वर्षांनी सहज स्वीकारलं जातं. काळाबरोबर बदलणाऱया नीतिमूल्यांमुळे हे घडत असावं. बदलता काळ नवनवीन कल्पना, मूल्ये स्वीकारायला तयार होतो.
परंतु काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे लेखक, कवी, चित्रकार, दिग्दर्शक हे लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरले आहेत.
या पुस्तकात एकूण चौदा लेख आहेत. ज्यात सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल, द सॅटनिक व्हर्सेस, लज्जा या आणि अशा कलाकृतींविषयी लिहिले आहे. एखादी कलाकृती निर्माण करणे, वाचकांनी वाचणे न वाचणे या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. यासाठी कुणीही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. हे स्वातंत्र्य हवेच.
वाद एका कवितेचा या लेखात लेखकाने त्या कवितेचे विश्लेषण करून कविची भूमिका चांगल्याप्रकारे मांडली आहे. इंग्रजी पुस्तके वाचणाऱयांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले. त्यामुळे ‘द लास्ट टॅन्गो इन पॅरिस’ हा चित्रपट नेमका कशाविषयी आहे. या चित्रपटाचा वाद याविषयी याच पुस्तकातून कळू शकते. प्रगत तंत्रज्ञानामुळे परदेशी कलाकृती आपल्यापर्यंत हल्ली लवकर पोचू लागल्या आहेत. घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर या कलाकृती लोकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांच्या विषयीचा वाद हे पेल्यातलं वादळ ठरलं. कलाकृतीच्या बाजूने आणि विरोधी मतं मांडणारे असतात. प्रत्येकालाच आपली बाजू योग्य आणि तर्कशुद्ध वाटते. पण एक नक्की अशामुळे समाजात मरगळ नाही हे जाणवते.
उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक चांगल्याप्रकारे प्रकाशित केले आहे. लेखन लेखकाच्या इतर पुस्तकांइतकेच चांगले आहे.
वादग्रस्त पुस्तके आणि कलाकृती
लेखक ः सर्वोत्तम सताळकर
प्रकाशक ः उत्कर्ष प्रकाशन
पृष्ठs ः 144, मूल्य ः रुपये 200/-





























































