ठसा – सीताराम येचुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

वडील सोमयाजुला मोठे सरकारी इंजिनीअर तर आई कल्पकम सरकारी अधिकारी, अशा सुखवस्तू तेलुगु कुटुंबातले सीताराम येचुरी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य डाव्या विचारधारेसाठी वाहून घेतले. हा प्रवास गुरुवारी कायमचा थांबला. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या येचुरी यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये झाले. दहावीत असतानाच त्यांनी तेलंगणात आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. आपला चळवळ्या मुलगा अभ्यासाकडे दुर्लक्ष करेल, या भीतीपोटी पालकांनी त्यांचे ऍडमिशन दिल्लीत केले. मात्र त्यामुळे उलट या अभ्यासू माणसाला चळवळीसाठी मोठेच व्यासपीठ मिळाले. सीताराम येचुरी यांनी पुढील शिक्षणासाठी दिल्लीच्या प्रेसिडेंटस् इस्टेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या परीक्षेत ते देशात पहिले आले होते. दिल्लीच्याच स्टीफन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. केले. त्यातही ते अव्वल आले होते. नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. याच काळात त्यांच्यातील कॉम्रेडची जडणघडण झाली. दिल्लीत राहिल्यामुळे त्यांचे विश्व विस्तारले. 1970च्या दशकात विद्यार्थी देशेतच सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) ‘स्टुण्डंटस् फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेत ते सामील झाले. पुढे ते या संघटनेचे अध्यक्षही बनले. नंतर माकपच्या केंद्रीय समितीची सदस्य आणि 1992मध्ये पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य अशी मजल त्यांनी गाठली. येचुरी तेलुगु असले तरी बंगाली भाषा ते बंगाली माणसाला लाजवेल अशा अस्खलितपणे बोलत. दोनवेळा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) महासचिव राहिलेल्या सीताराम येचुरी यांची 2005 ते 2017 पर्यंतची राज्यसभेची टर्मही चांगलीच गाजली. राज्यसभा हे विद्वानांचे सभागृह मानले जाते. येचुरी यांनी त्यात आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणांनी सभागृहाच्या लौकिकात भरच घातली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते हरकिशन सिंग, सुरजित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या राजकारणाची बाराखडी गिरवली. येचुरी कम्युनिस्ट होते जरूर, मात्र ते प्रॅक्टिकल कॉम्रेड असल्यामुळे सर्वच पक्षांत त्यांचे मित्र होते. राजकीय विचारधारा त्यांच्या मैत्रीच्या आड कधीच आली नाही. अगदी उमदे व्यक्तिमत्त्व व हसरा स्वभाव यामुळे ते राजकीय विरोधकांचीही मने सहजपणे जिंकत. कम्युनिस्ट असूनही आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारले जावे यासाठी ते आग्रही असत आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करत हे विशेष. त्यामुळेच आजच्या काळात महत्त्वाच्या असलेल्या सोशल मीडियावर ते सदैव सक्रिय राहायचे. फेसबुकवरचे त्यांचे लेख चिंतनीय असायचे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात असतानाच त्यांना बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाची बातमी समजली. येचुरी यांनी आजारी असतानाही अंथरुणावरूनच बुद्धदेव यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठविला. आजही त्यांची प्राणज्योत मालविण्यापूर्वीपर्यंत ते सक्रिय होते. तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. या मृत्यूमुळे ते खचत चालले होते. ते स्वतःही कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले. मात्र मृत्यूशी सुरू असलेला लपाछपीचा खेळ आज अखेर संपला. केंद्रात मनमोहन सिंगांचे सरकार सत्तेवर असताना एकीकडे प्रकाश कारत डाव्यांच्या विचारधारेचा अजेंडा राबविण्यासाठी आग्रही असत त्यावेळी येचुरी नेहमीच सामंजस्याची भूमिका घ्यायचे. काही महिन्यांपूर्वी कॉम्रेड अतुल अनजान, त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य गेले आणि आज हसतमुख येचुरींची इहलोकीची यात्रा संपली. डाव्यांचा प्रभाव ओसरत चाललेला असताना सीताराम येचुरींसारख्या सर्वाभिमुख कॉम्रेडचे जाणे ही केवळ डाव्यांच्या चळवळीचीच नाही, तर देशाचीही मोठी हानी आहे.