महाबँकेची सोनेरी वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा ताटके

बँकिंग क्षेत्राबद्दलचे लिखाण हे सहसा जास्त वाचक वाचत नाहीत, पण जर तेच लिखाण रंजकतेने लिहिले तर ते वाचनीय होते आणि याचे उदाहरण म्हणजे श्री. श्याम भुर्के यांनी लिहिलेली बँक ऑफ महाराष्ट्रची 85 वर्षांची वाटचाल. बॅंक ऑफ महाराष्ट्रची प्रगती खरोखरच वाचण्याजोगी आहे. बॅंकेचे कर्मचारी किती तन्मयतेने काम करतात आणि बॅंकेस प्रगतिपथावर ठेवतात हे कळते.
कायम सामान्य माणसाला आपलेसे करण्याचे धोरण, त्यांचा विश्वास कमावणे, सामान्य माणसाला बॅंकेचा स्टाफ आपल्यासाठीच काम करतोय हा विश्वास वाढवणे. अनेक दिग्गज व नामवंत लोकांनी बँक मोठी करण्यासाठी कष्ट घेतले आहेत. बॅंकिंग क्षेत्रात खातेदारांचा विश्वास ही सगळ्यात मोठी ठेव असते. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना खाते चालू करणे, त्यांना बॅंकेचे आवश्यक व्यवहार सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हे फार चांगल्या पद्धतीने बॅंकेने केले आहे. औद्योगिक क्षेत्रात हिरिरीने छोटय़ा आणि मोठय़ा व्यवसायांना मदत करून तिथेही आपला ठसा उमटवलेला दिसतो. शहरी आणि ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारत, सर्व संकटांवर मात करत आज 1832 शाखा दिमाखदारपणे व्यवहार करताना दिसतात.

लेखक स्वतः या बॅंकेशी संबंधित असल्यामुळे लिखाणात एक आपलेपणा आलेला आहे. काळाची पावले ओळखून त्या त्या वेळी योग्य तो बदल स्वीकारून बॅंक कायम सर्व बाबतीत आघाडीवर आहे. विशेषतः सामाजिक जाणीव आणि कर्तव्य याबाबतीतसुध्दा बॅंक योग्य ती कामे करत आहे. नवीन व्यवसायासाठी आणि आहे तो व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठीसुध्दा हे पुस्तक मार्गदर्शन करेल.

प्रेरणादायी महाबँक
लेखक ः प्रा. श्याम भुर्के
पृष्ठs ः 212, मूल्य ः रुपये 300/-