शिवमंदिराच्या राज्यात – श्रीक्षेत्र सुंदरपुरी चांगदेवचे शिवतीर्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेहेंदळ 

दक्षिण-उत्तरेला महाराष्ट्रात जोडणारा भूप्रदेश खान्देश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी आक्रमणांना खान्देशाला अधिक सामोरे जावे लागले. त्यामुळेच असेल, पण तेराव्या शतकानंतर या भागात फारश्या महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झालेल्या दिसत नाहीत. तरीसुद्धा खान्देशच्या वास्तुशैली व मांडणी अधोरेखित करणारे तीर्थक्षेत्र चांगदेवचे शिव मंदिर हे असेच एक ठळक उदाहरण आहे. तापी व पूर्णा या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध नद्यांच्या संगमक्षेत्री मुक्ताईनगरजवळ चांगदेव मंदिर वसलेले आहे. पूर्वी मध्य प्रदेशातील बऱहाणपूर, महाराष्ट्रातील मलकापूर असा संपूर्ण परिसर एकत्र असलेल्या या परिसराची ओळख एदलाबाद म्हणून होती. अलीकडे त्याचे नामकरण ‘मुक्ताईनगर’ असे करण्यात आले आहे. प्राचीन काळात या चांगदेव गावाला भृंगपूर आणि नंतरच्या काळात सुंदरपुरी म्हटले जात असल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

चांगदेव हे गावाचे नाव योगी चांगदेवाशी तसे थेट संबंधित नाही. चांगदेव हा निकुंभ राजा गोविंद याचा सरदार होता व त्यासंबंधीचा देवनागरी लिपीतला लेख चाळीसगावपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर पाटण गावच्या महेश्वर मंदिरात आहे. त्यात चांगदेवाचा उल्लेख गवळ्यांचा राजा असा येतो. या चांगदेवाच्या कारकीर्दीत हे देऊळ बांधले गेले असावे असे प्रमाण मानले जाते. यादव राजा सिंघण याने इ. स. 1306 मध्ये मोठय़ा जमिनी चांगदेव गावास इनाम दिल्या. शिल्परत्नाकर वगैरे वास्तुशिल्पावरील ग्रंथ येथे शिकविण्यात येत व त्यामुळे येथे एका खणखणीत नव्या वास्तुप्रकाराचा उगम झाला.
मुख्य मंदिर इ. स. 12 व्या शतकात प्रचलित नागर शैलीत असून हे कमी उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे. आजच्या काळात उभे दिसणारे जीर्णोद्धारित मंदिर अहिल्याबाई होळकर (इ.स. 1766 – 1795) यांच्या काळात बांधले गेले असे मानले जाते.

चांगदेवचं शिव मंदिर संपूर्ण दगडात बांधलेलं असून हेमाडपंती धाटणीचे आहे. अशा या देवळाचा सभामंडप 32 x 40 असून 14 मीटर उंच असा चांगला भव्य आहे. प्रत्येक कोपऱयात चार पूर्ण स्तंभ व चार अर्ध स्तंभ आहेत. या सोळा पूर्ण स्तंभ व सोळा अर्ध स्तंभांवर मजबूत छत असून त्यावर दगडी कलशाची योजना असावी. परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागून नंतर वरचा शिखराचा भाग विटांचा बांधला असावा. अंतराळावर अंडाकृती, नक्षीदार उतरते छत आहे. डॉ. हेन्री कझिन्सच्या मते वरचा भाग विटांचा बनविण्याचीच योजना असावी.

तोरणे, सुंदर मूर्ती, अर्धस्तंभ, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, आडवे शिल्पपट्ट, उभी शिल्पे सामावून घेणारी वेलबुट्टी वगैरे खुब्यांचा वापर यांचा अंतर्बाह्य वापर करण्यात आला आहे. लाकडी वास्तुकलेप्रमाणे बाहेरील सज्जाजवळ वापरलेल्या दगडी लोलकाकृती नक्षी, उथळ शिल्पे अशी अनेक वास्तुवैशिष्टय़े या भागात दिसून येतात. खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे. चांगदेव मंदिर दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट असून टिकून राहिले आहे.

या मंदिराची रचना खास असून इतके मोठे अंतराळ व गर्भगृह महाराष्ट्रातील मंदिराला क्वचितच दिसून येते. सभागृहातील सोळा स्तंभांची रचना वेरूळच्या कैलास मंदिराप्रमाणे चार वर्गात आहे. गर्भगृहातील प्रमुख भिंतीवर शिल्पही तसेच आहे. मंदिराच्या भिंतीत फक्त एकच व्यक्ती जाऊ शकेल अशा छोटय़ा पायऱयांचा जिना आहे. तेथून मंदिराच्या वरच्या भागापर्यंत जाता येते. या मंदिरात गर्भगृह, अंतराळ व मंडपाची योजना आहे. गर्भगृह आयताकृती आकाराचे असून हे आयताकृती तासलेल्या दगडांनी घडवलेले आहे. यात अलीकडच्या काळात स्थापलेली संत चांगदेवांची प्रतिमा आहे. गर्भगृहावरील मूळ शिखर नष्ट झाले असून आज दिसून येणारे विटांमधील बांधकाम नंतरच्या काळात झालेले आहे. गर्भगृहाचे छत घुमटाकार असून 18 व्या शतकात मराठा काळात बांधलेले आहे. अंतराळ चौकोनी आकाराचा असून मंडपावरील छत नष्ट झालेले आहे. त्याच्या तीन बाजूंनी प्रवेशद्वार आहे. मंडपातील खांब पूर्ण नष्ट झाले असले तरी त्याच्या अस्तित्वाचा पुरावा तळाच्या भागावरून दिसतो. गर्भगृह व अंतराळाबाहेरील भिंत विविध भौमितिक आकृतींनी व देव-देवता आणि अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभित केलेली आहे. मंदिराची लांबी 10 x 9 मीटर आहे. 1837 मध्ये तापीस आलेल्या महापुरामुळे मंदिराचा कळस कोसळला आहे. इथे मंदिराभोवती केल्या गेलेल्या उत्खननात विष्णू, शिव, दुर्गा, वरुण, अप्सरा, साधू, इ. शिल्पे व इतर स्थापत्याचे अवशेष सापडले आहेत. यांनीच एकेकाळी मंदिर सुशोभित होते.

शेजारच्या मेहूण गावात असेच कोरीव काम असलेले जवळपास तितकेच पुरातन सोमेश्वर मंदिर आहे. त्याशिवाय संत मुक्ताबाईची समाधीही आहे. नदीवरच्या हतनूर धरणामुळे काही पुरातन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मुक्ताई समाधी मंदिरही पाण्याची पातळी कमी असताना अर्धे पाण्याबाहेर येते तेव्हाच पाहता येते.

सालाबादप्रमाणे येणारी चांगदेवची यात्रा-जत्रा हे इथले एक खास खान्देशी कवतिक आहे. प्रत्येक खान्देशकर एकदा तरी बैलगाडीत बसून चांगदेवाच्या यात्रेला गेलेला असतो. गाडय़ा सोडून नदीच्या वाळवंटातच अनेक लोक मेळ्यासाठी गोळा होतात. यात्रेच्या काळात शिवरात्रीनिमित्त शंकराची आराधना केल्यावर डाळबट्टीच्या नैवेद्यानेच उपासाची सांगता होते. भरडय़ा डाळीच्या व गव्हाच्या पिठापासून केलेल्या व उघडय़ा विस्तवावर भाजलेल्या व शिजवलेल्या या खाद्यप्रकाराला वेगळीच खुमारी असते. खान्देशातील खास देवस्थानांत चांगदेवाचे स्थान आहे.
[email protected]