
>> नितीन कुलकर्णी
क्रिकेटच्या इतिहासात आजवर असंख्य बदल होत गेले आणि त्यातून या सामन्याला एका बाजूने शिस्तीचे कोंदण देतानाच दुसऱया बाजूला त्यातील रंजकता, उत्कंठा, रोमहर्षकपणा कसा वाढत जाईल याचा विचार केला गेला. टी-20 ची भन्नाट संकल्पना अवतरल्यानंतर क्रिकेटमधील रंजकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचतानाच लोकप्रियतेनेही कळस गाठला. अशाच प्रकारचे काही बदल आता होऊ घातले असून त्याबाबत आयसीसीकडे प्रस्तावही दिला गेल्याचे समजते. त्यातील एक प्रस्ताव म्हणजे 100 मीटरपेक्षा अधिक उंचीवरून षटकार लगावल्यास त्याबदल्यात सहाऐवजी 12 धावा दिल्या जाणार आहेत. केविन पीटरसनने केलेल्या या मागणीला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अनुकूलता दर्शवली आहे. या प्रस्तावाला संमती मिळाल्यास क्रिकेटच्या मैदानावर धावांची आतषबाजी होताना दिसणार आहे.
‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱया क्रिकेटला प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. फ्रेंच भाषेतील ाढा@युट या शब्दापासून क्रिकेट या शब्दाची उत्पत्ती झाली असे सांगितले जाते. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी दक्षिण पूर्व इंग्लंडमधील वेल्ड येथे राहणाऱया मुलांकडून हा खेळ खेळला जात होता. 1611 मध्ये त्याला खेळ प्रकार म्हणून प्रमाणित करण्यात आले. 1744 हे वर्ष क्रिकेटच्या या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. कारण या वर्षी प्रथमच या ाढाrडा प्रकाराला नियमांचे कोंदण लाभले. अठराव्या शतकापासून क्रिकेट हा ब्रिटनचा प्रमुख खेळ बनला. 1844 मध्ये सर्वांत पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यादरम्यान खेळला गेला. पुढे 1890 मध्ये पहिल्यांदा काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिपची औपचारिकरित्या स्थापना करण्यात आली. 1889 मध्ये एका षटकामध्ये चार चेंडूंऐवजी पाच चेंडू असतील, असा बदल करण्यात आला. 1900 सालापासून सहा चेंडूंचे एक षटक बनले. हिंदुस्थानात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतर क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. 25 जून 1932 रोजी हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळला, तर 13 जुलै 1974 रोजी लीडसमध्ये इंग्लंडविरोधात हिंदुस्थानी संघ पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला. स्वातंत्र्यानंतर क्रिकेटविषयीची लोकप्रियता झपाटय़ाने वाढत गेली आणि हिंदुस्थानी उपखंडातील सर्वाधिक क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून आपण ‘नावलौकिक’ मिळवला.
क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यांना खूप मोठा प्रेक्षक वर्ग होता. सलग पाच दिवस संपूर्ण सामना पाहणारे लाखो हिंदुस्थानी आजही आहेत. तथापि, क्रिकेटमध्येही बदल झाले आहेत. 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांकडे क्रिकेटरसिकांचा ओढा वाढू लागला, परंतु टी-20 च्या उदयानंतर क्रिकेटचे सर्व आयामच बदलून गेले. हिंदुस्थानचा विचार करता ललित मोदी यांनी आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटविश्वात केवळ अर्थकारणाचा प्रवाहच खुळखुळता केला नाही तर क्रिकेटरसिकांची अभिरुचीच बदलून टाकली. क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महत्त्वपूर्ण घटनांपैकी आयपीएल ही एक स्पर्धा आहे. टी-20 क्रिकेट आयपीएलच्या आधी सुरू झाल्या होत्या, पण आयपीएलमुळे टी-20 ला खरे महत्त्व प्राप्त झाले. आज बहुतेक सर्व देशांतील क्रिकेट प्रशंसक आयपीएल सामने कधी आहेत हे लक्षात घेऊन आपल्या कॅलेंडरनुसार कार्पामांच्या नोंदी ठरवतात, अशी स्थिती आहे. 20 षटकांच्या सामन्यांमुळे क्रिकेटमधील रंजकता, उत्कंठा शिगेला पोहोचू लागली. परिणामी याचे रंजक मूल्यही वाढत गेले. धावांचे डोंगर उभे राहू लागले. पूर्वी एकदिवसीय सामन्यातील 50 षटकांमध्ये 250 ची धावसंख्या खूप मोठी वाटायची, पण आता अवघ्या 20 षटकांमध्ये 400 धावांचा मेरूपर्वत लीलया उभे करणारे फलंदाज आणि संघ अस्तित्वात आले. पॉवर प्ले, फ्री हिट यांसारख्या संकल्पनांमुळे क्रिकेटमधील रंजकता आणखी वाढत गेली.
साधारणत 1975 ते 1984 या काळात कसोटी तसेच एकदिवसीय मालिका यांचे प्रमाण अत्यंत मर्यादित होते. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात एकदिवसीय क्रिकेटचे फॅड जगभर वाढत गेले. आज टी-20 सामन्यांमुळे कसोटी सामने हवेत कशाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे कारण क्रिकेटरसिकांना आता थ्रील, टोकाची उत्कंठा, जबरदस्त चुरस या सर्वांची सवय लागली आहे. तशातच आता क्रिकेटमध्ये सुचवण्यात आलेल्या नव्या प्रस्तावाला संमती मिळाल्यास क्रिकेटरसिकांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला अलीकडेच काही नव्या बदलांसंदर्भात शिफारसी करणारे प्रस्ताव देण्यात आले आहेत. यापैकी एक प्रस्ताव अतिशय भन्नाट आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरन याने सुचवलेल्या या प्रस्तावानुसार क्रिकेट सामन्यामध्ये एखाद्या फलंदाजाने 100 मीटरहून अधिक लांब षटकार ठोकल्यास त्याला कमीत कमी 12 धावा दिल्या जाव्यात. पीटरसनने जाहीरपणाने ही बाब यापूर्वीही काही वेळा मांडली होती. हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक दिग्गज क्रिकेटपटू पीटरसनच्या या मताशी सहमत आहेत.
वास्तविक पाहता बेजबॉलच्या युगामध्ये 100 मीटर लांब षटकार हा काहीसा दुर्मीळ झाला आहे. टी-20 सामन्यांमध्येच असा उत्तुंग षटकार पाहायला मिळतो. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आजवरचा सर्वात लांबवरचा षटकार ठोकण्याचा पाम पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहीद आफ्रिदीच्या (158 मीटर) नावावर नोंदवला गेलेला आहे. त्याखालोखाल ब्रेट ली (130 मीटर), मार्टिन गुपटिल 127 मीटर, लियाम लिव्हिंगस्टोन 122 मीटर122 मीटर, कॉरी अँडरसन 122 मीटर, मार्क वॉ 120 मीटर, युवराज सिंग 119 मीटर आणि महेंद्रसिंग धोनी 118 मीटर अशी ाढमवारी आहे.
इतक्या अथक प्रयत्नांनी दूरवर लांब षटकार ठोकूनही फलंदाजाच्या आणि संघाच्या खात्यात फक्त सहाच धावा मिळतात, ही बाब योग्य नाही असा काहीसा विचार 12 धावांची मागणी करणाऱयांच्या मनात असावा. तो चुकीचा म्हणता येणार नाही. पण यामध्ये एक पेच आहे. तो म्हणजे अशा प्रकारच्या षटकारांचे अचूक मोजमाप करण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध असले तरी ते परिपूर्ण नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. गोल्फ खेळामध्ये ते उपलब्ध आहे. दुसरीकडे काहींच्या मते सध्याचे तंत्रज्ञान अचूकपणाने हे अंतर मोजू शकते. याचा वापर करून नवा प्रस्ताव स्वीकारण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. काही खेळाडूंच्या मते सहा धावांवरून एकदम 12 धावांवर उडी घेणे थोडे अतिशक्योतीचे ठरेल. त्याऐवजी अशा उत्तुंग षटकाराप्रित्यर्थ 8 धावा देणे योग्य ठरतील.
काही काळापूर्वी समालोचकांच्या पातळीवर असणारी चर्चा आता आयसीसीकडे प्रस्ताव म्हणून सादर करण्यात आली असून लवकरच तिला मान्यता मिळू शकते. तसे झाल्यास क्रिकेटच्या मैदानावर उत्तुंग षटकारांचा वर्षाव होताना रसिकांना पाहायला मिळू शकतो. सद्यस्थितीत 100 मीटर किंवा त्याहून अधिक लांबीचे षटकार फारसे दिसत नाहीत. दोन महिने चालणाऱया आयपीएल स्पर्धांमध्ये 100 मीटरहून अधिक लांबीचे जेमतेम 10 षटकार पाहायला मिळतात. पण 12 धावा देण्याचा निर्णय प्रत्यक्षात आला तर फलंदाजांमध्ये यासाठीची अहमहमिका लागल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. दुसरीकडे गोलंदाजांसाठी मात्र ही बाब चिंता वाढवणारी ठरेल. कारण यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभी करणे सहजशक्य होणार आहे. पण यॉर्कर, रिव्हर्स स्विंग यांसारख्या तंत्रांचा वापर करून अशा प्रकारचा प्रयत्न करणाऱया फलंदाजांच्या यष्टी उडवण्याचे कसब असल्यास गोलंदाजांना घाबरण्याचे कारण नाही. एकंदरीत हा निर्णय क्रिकेटमधील घमाशान वाढवणारा ठरेल यात शंका नाही. पाहू या…
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)






























































