21 दिवस आरोग्याचे ! वैद्य परीक्षित शेवडे यांचे फेसबुक लाईव्हतर्फे मार्गदर्शन !!

4306

>> नमिता वारणकर

दररोजच्या कामाच्या व्यापात आपले आहार, दिनचर्या आणि ऋतुचर्येकडे दुर्लक्ष होते, कारण सकाळी लोकल पकडावी लागते… दिवस कार्यालयीन कामात जातो… घरी यायला उशीर होतो. यामुळे आरोग्याकडे पुरेस लक्ष द्यायचं बाजूलाच राहतं.  नव्या आजारांना आमंत्रण दिलं जातं.  याकरिता  सध्याचा  21 दिवसांचा लाॅकडाऊन ही आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी लाभलेली सुसंधी आहे. याकरिता  आपल्या आरोग्याबाबत होणा-या चुका सुधारण्याकरिता वैद्य परीक्षित शेवडे फेसबुक लाईव्हमार्फत आयुर्वेदातील विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. दररोज सायंकाळी 5 वाजता त्यांचे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हमार्फत आपण ऐकू शकता. 

सध्याच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबाबत बोललं जातंय. याबाबत वैद्य परिक्षित शेवडे सांगतात की,  आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या जीवनशैलीचे आचरण करणे हाच योग्य मार्ग आहे. महत्त्वाचे म्हणजे काही जण सुटी घेऊन हल्ली स्पामध्ये जातात . तेथे त्यांना एक दिनक्रम आखून दिला जातो. त्याप्रमाणे तेथे राहावं लागतं. तिथे त्यांच्यावर पंचकर्म केली जातात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनचर्येचं पालन केलं जातं. आता सुरू असलेल्या बंदीकाळात हे स्पा प्रत्येकाच्या घरोघरी उघडे झाले आहेत. हीच आपल्याला दिनचर्या आणि ऋतुचर्येचं पालन करण्याची उत्तम संधी आहे.

निसर्गाचा आदर राखण्याची सकाळपासून सुरुवात आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे. सकाळी उठल्यानंतर करदर्शन, भूमातेला नमस्कार, प्रात:स्मरण म्हणजेच आपल्या श्रद्धास्थानांचं स्मरण करणेही आवश्यक आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा लाभते. मात्र याकरिता रात्री लवकर झोपणेही गरजेचे आहे. रात्री झोपताना मोबाईल हातात घेऊनच काही जण पेंगतात. त्याऐवजी दुपारची झोप टाळणे आणि रात्री मोबाईल पाहणे बंद करा. जेणेकरून सकाळी लवकर जाग येणं सोपं होईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

आयुर्वेदानुसार वसंत ऋतु सुरू आहे. ऋतुचर्येनुसार या काळात कफाचा प्रादुर्भाव होत असतो. विशेषकरून ज्यांना दमा, त्वचाविकार, अपचनाचा त्रास आहे , अशा रुग्णांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की, सकाळी लवकर उठतोय म्हणून दुपारी झोपू नये. यामुळे कफामुळे दम लागणं, शरीरात कफ वाढणं असे विकार सुरू होऊ शकतात. त्यामुळे दुपारी झोपण्याऐवजी चांगलं वाचणं, ऐकणं, लहान मुलांबरोबर खेळणं अशा काही गोष्टी करता येऊ शकतात. डोळ्यावर झापड आलीच तर बसल्या जागी पेंगलात तरी चालेल पण आडवं पडून झोपू नका, यामुळे शरीरातली कफप्रवृत्ती वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे.

लाॅकडाऊन काळात आळस वाढवू नका…

लाॅकडाऊन काही काळानंतर जाईलच, पण त्यानंतर पुढचं संकट म्हणजे शरीरात आळस वाढू शकेल.  सुटीच्या काळात शरीरात वाढलेलं मेद, काॅलेस्टेराॅल, वाढलेलं वजन हे सगळं आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागेल. ती करायची नसेल तर आपल्याला दिनचर्येचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. रोजच्या घाईगडबडीत ज्या गोष्टी आपण अंगी बाणवू शकत नव्हतो त्या आरोग्याच्या चांगल्या सवयी या काळात अंगवळणी लावून घेऊया. ही संधी आपल्याला निसर्गाने दिली आहे. त्याचा उपयोग करून घेऊया, अशी माहिती देऊन लवकरात लवकर कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर  येण्याकरिता प्रार्थना करुया. कारण असे आवाहनही वैद्य शेवडे यांनी केले आहे.

आयुर्वेद अंगीकारुया !! 

आयर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. मनुष्याचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे तसेच अहितकर आहार-विहार आणि आचार याचे विवेचन आयुर्वेदात केले आहे. मुळात मानवी आयुष्याचे खरे सुख  आणि ध्येय कशात आहे याचाही विचार केला आहे. त्यामुळे काळानुसार आलेल्या या साथीच्या आजारात आयुर्वेद आपले रक्षण करेल. याकरिता कोरोनाशी लढा देण्यास आयुर्वेदाचा आग्रह का?, सध्याच्या काळात काय खाल ? काय टाळाल? , रोगप्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद, विरुद्ध आहार भाग 1 आणि 2 , आयुर्वेदिय धुपन आयुर्वेदातील अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन आणि शंकानिरसन फेसबुक लाईव्हमार्फत केले जाणार आहे.

https://www.facebook.com/pareexit.shevde/videos/3010157265673953/?sfnsn=wiwspwa&d=w&vh=i&extid=dKL4sXpWp0ZwdRrt

या लिंकद्वारे आणि वैद्य परीक्षित शेवडे यांच्या टाईमलाईनवर ही माहिती उपलब्ध होईल. शिवाय येथेच यापूर्वी होऊन गेलेले भागही आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या