भटकंती – दुबईच्या सौंदर्याची भुरळ!

>> प्रभाकर पवार

युरोपमधील युके, स्वीत्झरलँड, नेदरलँड, फ्रान्स, डेन्मार्क, बेल्जियम, तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क, लॉसएंजिलिस, आशिया खंडातील श्रीलंका, मलेशिया, मध्य आशियातील उजबेकिस्तान आदी देशांचे पर्यटन केल्यानंतर अलीकडेच मी संयुक्त अरब अमिराती या आखाती देशातील दुबई शहराची वारी केली आणि थक्क झालो. तीन-चार दशकांपूर्वी कुणी ‘मी दुबईला जाऊन आलो,’ असे म्हटले तर त्याच्याकडे लोक संशयाने पाहायचे. पोलीसही त्या व्यक्तीवर लक्ष ठेवायचे. कारण मुंबईती} एका बँक रॉबरीमध्ये 1984 च्या सुमारास न्यायालयाने दाऊदला सजा ठोठावल्याने दाऊदने मुंबईतून पलायन केले होते व तो दुबईच्या शेखच्या आश्रयाला गेला. तेथूनच तो अंडरवर्ल्डची सूत्रे हलवू लागला. 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर दाऊद दुबईतून पाकिस्तानात पळाला. तेव्हा शेखने दाऊद इब्राहिम कासकर व त्याच्या बगलबच्च्यांची दुबईतून (तेथे गँगवॉर वाढल्यानंतर) हकालपट्टी केली. सुनील सावंत ऊर्फ सावत्या व शरद शेट्टी या दाऊदच्या हस्तकांची छोटा राजनच्या गुंडांनी दुबईत गोळय़ा घालून हत्या केल्यानंतर शेखने दाऊदचा भाऊ इकबाल कासकर, अनिल परब ऊर्फ वांग्या आदी गुंडांनाही दुबईतून हाकलले व हिंदुस्थानात पाठविले. त्यामुळे दुबई म्हणजे ‘अंडरवर्ल्डचे हब! दाऊदचे हेडक्वॉर्टर’ हा जो लोकांचा अनेक वर्षे समज होता तो आता दूर झालेला आहे. }ाsक दुबईत बिनधास्त पर्यटन करीत आहेत.

दुबईत गँगवॉर वाढल्याने दुबईच्या शेखने दुबईतील दाऊद टोळी संपवून टाकली. आता तेथे ना गँगवॉर आहे ना गंभीर गुन्हे! तेथे वातानुकूलित पोलीस ठाणी आहेत. परंतु तक्रारदारच नाहीत. मुंबईप्रमाणे स्नॅचिंग, रॉबरी, दरोडा, बलात्काराचे प्रकार नाहीत. जर कुणी अशा गंभीर गुन्हय़ात सापडला तर तेथे तत्काळ कठोरात कठोर शिक्षा होते. तेथे कायदे कडक आहेत. त्यामुळे यूएईमध्ये कुणीही कायद्याचे उल्लंघन करायचा प्रयत्न करीत नाही.

दुबईची लोकसंख्या 33 लाखांच्या पुढे आहे. तेथे 90 टक्के बाहेरील (आशियन) देशातील नागरिक राहतात. यूएईमध्ये आपणास गरीब माणूस सापडणार नाही. शेख मोहम्मद बीन रशीद अलमकतुम या दुबईच्या प्रधानमंत्र्याने प्रथम मासेमारी, नंतर तेलविक्रीतून देश उभा केला. समुद्र बुजवून उंच उंच टॉवर, शॉपिंग मॉल उभे केले. रस्ते चकचकीत केले. तारांकित हॉटेल्स, नाईट क्लब उभारले आणि जगभरातील पर्यटकांना आपल्या देशाकडे आकर्षित करून घेतले आहे. दुबईला आज सिटी ऑफ गोल्ड म्हणून ओळखले जाते. अशा या शहराला दरवर्षी जगभरातून दीड कोटीपेक्षाही अधिक पर्यटक भेट देतात. अरब देशाचा विचार केला तर आखाती देशात कतारनंतर सर्वात श्रीमंत म्हणून दुबईचे नाव घेतले जाते.

दुबईत पाय ठेवल्यानंतर तेथील चकचकीत विमानतळ व रस्ते पाहून नेत्र सुखावून जातात. दुबई हे उष्ण शहर आहे. वातानुकूलित वाहनाशिवाय तेथे फिरणे कठीण असते. रस्ते लाजवाब आहेत. कुठेही खड्डे नाहीत. वाहने शिस्तीत चालविली जातात. हॉर्न बिलकुल वाजविला जात नाही. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. अशा या शहरात रस्त्यावर फारसे कुणी दिसत नाही. परंतु शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. 124 मजल्यांची बुर्ज खलिफा ही गगनचुंबी इमारत व त्यावरील रात्रीचा लेझर शो, हॉटेल बुर्ज अल अरब हे सेवन स्टार हॉटेल, फ्युचर म्युझियम, पाल्मजुमेराह बीच, मत्स्यालय, पेंग्विन गुहा, मिरॅकल गार्डन, ग्लोबल व्हिलेज डेझर्ट सफारी, मरिना धाऊ व्रुझ शो, दुबई फ्रेम ही सर्व पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर पर्यटकांचे डोळे अक्षरश: दिपून जातात. तेथील पायाभूत सुविधा (Infrastructure)मजबूत आहे. समुद्राच्या खाऱया पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यालायक करण्यात शेखला यश आले आहे. आपल्याकडे दरवर्षी करोडो रुपये खर्च करूनही ना गंगा नदी स्वच्छ होते, ना मुंबईतील मिठी नदी! तेथे कचरा व सांडपाणी सोडले जाते. आपला देश भ्रष्टाचाराने पोखरला गेल्यामुळे पर्यटन व्यवसायाची बोंबाबोंब आहे!

दुबई हे मुंबईसारखrच एक नैसर्गिक बेट आहे. मुंबईला जसा समुद्र लाभला आहे तसाच दुबईलाही! यूएईचा राजा व प्रधानमंत्री शेखने समुद्र बुजवून तेथे तारांकित टॉवर, बंगले उभे केले व परदेशी पर्यटकांना भुरळ पाडली. दुबईच्या वाळवंटात शेखने बागबगिचे निर्माण केले. दुबईला 2040 ला जगातील सर्वात ‘बेस्ट सिटी’ म्हणून ओळखले जाईल, दुबईचे नंदनवन होईल अशा प्रकारचा आराखडा शेखने तयार केला आहे. अगदी मुंबईपर्यंत त्याला बुलेट ट्रेन सुरू करायची आहे. त्यामुळे भविष्यात दुबई व मुंबईचे व्यावसायिक संबंध वाढणार आहेत. आपल्याकडील पर्यटन स्थळे (जी काही असतील ती) नामांकित शहरे पाहिली की फारच वाईट वाटते. राजकीय पुढाऱयांचे कटआऊट नाहीत असे शहर तुम्हाला सापडणार नाही. मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो अथवा नाशिक असो, सर्वच शहरी व ग्रामीण भागात होर्डिंग दिसतात. मिठी नदीचा कायापालट करता येईल. बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जर पाहिले तर तेथेही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खूप काही करता येईल. परंतु अशा या उद्यानाची आज दुरवस्था आहे. बिबटे, हरणे, सांबर, कोल्हे, गिधाडे आदी प्राणी व पक्षीही तेथे आहेत. परंतु तेथे हव्या तशा सुविधा नाहीत. सरकारने या उद्यानाची नागपूरच्या ‘ताडोबा’प्रमाणे कधी जाहिरात केली नाही. ‘ताडोबा’ला पर्यटक आहेत. महसूल आहे, परंतु बोरिवलीच्या नॅशनल पार्कला नाही. मंत्री असताना पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जेवढे प्रयत्न केले तेवढे कुणीच केले नाहीत. महाविकास आघाडी सरकार पडले नसते तर आदित्य ठाकरे यांनी नक्कीच बोरिवलीच्या नॅशनल पार्कचा कायापालट केला असता. मुंबईत पर्यटक वाढवायचे असतील तर प्रेक्षणीय स्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. तरच दुबईप्रमाणे मुंबईचे आकर्षण वाढेल. दुबईतील पाल्म जुमेराह बीचवरील रात्रीचा लेझर शो डोळे दिपविणारा असतो. मग दादर, जुहू व गिरगाव चौपाटीला असा शो का आयोजित केला जात नाही? गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, ताजमहल हॉटेल, आरे गार्डन, तुळशी व पवई तलाव, शिवाजी टर्मिनस आदी महापालिका स्थळांना पर्यटन स्थळांचा दर्जा देऊन त्याचा विकास केला पाहिजे. राणीच्या बागेतील पेंग्विनमुळे पालिकेला दरमहा सुमारे 1 कोटीच्या वर महसूल मिळतो. आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नामुळे ‘पेंग्विन’ मुंबईच्या राणीच्या बागेत आले आणि राणीची बाग चर्चेत आली. पर्यटन व्यवसायातून शेखने दुबईचे सौंदर्य वाढविले. मग मुंबईचे का नाही? राज्यकर्ते याचा विचार करतील का? इंग्रजांनी आपल्या देशातील पर्यटन स्थळ हेरून त्याचा विकास केला. मग हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर केले काय? दुबईला गेल्यावर तेथील विकास पाहून आपणास भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. परंतु दुबईच्या इकॉनॉमिक मॉडेलची कॉपी आजूबाजूच्या देशांनी करण्यास सुरुवात केल्याने दुबईचे पर्यटक घटण्याची व दुबईला भविष्यात मंदीला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुबईचा विकास सौंदर्य पाहून आपण नक्कीच हुरळून जातो, परंतु मुंबईतली माणुसकी व प्रामाणिकपणा या जगात कुठेच दिसणार नाही, हेही तितके खरे आहे. मुंबई हे हिंदुस्थानातील सर्वात सुंदर शहर आहे. देशाची अर्थवाहिनी आहे. या मुंबईत अब्जाधीशांची कमी नाही. त्यांनी ठरवले तर या मुंबईचा कायापालट, नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.

[email protected]