आपला माणूस – लोकविज्ञानाची प्रेरणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रदीप म्हात्रे

डॉ. प्रेरणा राणे यांच्या गुणवैशिष्टय़ांबद्दल सांगायचं तर एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो तडीस नेणं आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करणं. त्यांना निसर्ग भ्रमंतीची प्रचंड आवड होती. त्या अनुषंगाने येणारे पक्षी निरीक्षण, वृक्ष परिचय इत्यादी विषय ओघाने येतातच. विविध देशांत त्यांनी केलेल्या मुशाफिरीला असलेली आखणी आणि नियोजनाची जोड अनुकरणीय अशीच असायची. त्याशिवाय इतिहास, कला, संगीत अशा विविध गोष्टींमध्ये रुची असल्याने त्या मुशाफिरीला एक वेगळाच आयाम लाभायचा. चाकोरीबाहेरील चित्रपट, आवडलेल्या पुस्तकांवर, कवितांवर बोलणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी काही पैलू होते.

दरवर्षी आषाढीनिमित्त मुंबईतील वडाळ्यात भरणारी जत्रा सर्वांना माहीत असेल. परंतु 1980च्या दशकात लोकविज्ञान संघटनेचा स्टॉल असायचा असं जर सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि हा उपक्रम जवळपास पंधरा वर्षे सुरू होता. त्या काळात लोकविज्ञान संघटनेच्या अशा कार्यात अग्रणी असणाऱया डॉ. प्रेरणा राणे यांचे 7 मे 2021 रोजी कोरोनाशी झुंज देत निधन झाले.

व्हीजेटीआयमधून यांत्रिक अभियांत्रिकीतील पदवी प्राप्त केलेल्या डॉ. प्रेरणा यांनी 1987मध्ये आयआयटी मुंबईतून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. दरम्यान 1980मध्ये लोकविज्ञान संघटनेच्या कामात त्या पूर्णवेळ सक्रिय झाल्या. त्या काळी चळवळीची कामांकरिता स्वतंत्र जागा घेणं परवडणारं नव्हतं. साहजिकच कार्यकर्त्यांच्या घरून कामं चालायची आणि त्याला लोकविज्ञान संघटनाही अपवाद नव्हती. सुरुवातीला बऱयाचदा ही कामं विशालाक्षी गंगाधरन आणि लक्ष्मी सुंदरम यांच्या माटुंग्यातील घरातून चालत. त्यात प्रदर्शनाचे तत्ते तयार करणं. कला पथकाचा सराव करून घेणं, कार्यकर्त्यांकरिता प्रशिक्षण शिबिरं, सभा-गट चर्चा अशा सगळ्याच बाबतीत डॉ. प्रेरणा यांचा सहभाग असे. लोकविज्ञानशी संबंधित असल्यानं अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच संस्थांशी त्यांचा परिचय होता. त्यात काही लेखक-संपादकांचाही समावेश होता. डॉ. प्रेरणा यांचे लेखही वर्तमानपत्रांतून वेळोवेळी प्रसिद्ध होत असत. लोकविज्ञान संघटना आणि प्रेरणा राणे असं एक समीकरण झाल्याचं तेव्हा बोललं जायचं. लोकविज्ञान संघटनेतर्फे विज्ञान खेळणी, खगोलशास्त्र्ा अभ्यासक्रमाचं आयोजनही त्यांनी त्या काळी केलं होतं.
‘व्हीजेटीआय’मध्ये जवळपास सोळा वर्षे त्यांनी अध्यापन केलं. त्या वेळी प्राध्यापकांचे प्रश्न हाताळले. त्यानंतर जवळपास पाचेक वर्षे त्यांनी टेक-महिंद्रामध्ये प्रशिक्षण प्रमुख म्हणून काम करताना ‘इंडियन सोसायटी फॉर अप्लाईड बिहेवियरल सायन्स या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या. त्या संस्थेसाठी त्यांनी विभागीय समन्वयक, सहसंपादक, मानद सचिव अशी विविध पदे भूषविली होती. वर्तणूकशास्त्र्ााशी निगडित असलेल्या आणि परवडू शकणाऱया प्रयोगशाळा मराठीत सुरू करण्याचे श्रेय डॉ. प्रेरणा यांच्याकडे जाते. त्याशिवाय ‘लार्ंनग क्रुसिबल्स ः कलेक्टिव्ह एक्सपीरियन्सेस फ्रॉम टी ग्रुप प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे संपादन हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पाच म्हणावा लागेल.

समाजसेवी संस्थांना सल्ला देण्याचं कामही केलं. त्यात युवा नेतृत्व, संघटनात्मक बदल आणि विकास, लैंगिक संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास अशा विषयांचा तर संस्थांमध्ये कामगार युनियन, शेतकरी संघटना आणि युवा गटांचा समावेश होता. त्याचप्रमाणे कामगारांकरिता व्यसनमुक्ती कार्यक्रमही त्यांनी केले होते. डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुरू केलेल्या ‘निर्माण’ या युवक चळवळीच्या त्या मार्गदर्शक होत्या. यावरून डॉ. प्रेरणा यांचा कामाचा आवाका लक्षात येण्यासारखा आहे. एवढंच नाही तर त्यांनी कामगारांच्या मुलांना विज्ञान आणि गणित विषयात आवड निर्माण व्हावी याकरिता अनेक वर्षे काम केलं होतं. या त्यांच्या कामगिरीकरिता 2018 साली पुणे महानगर पालिकेच्या कामगार युनियनतर्फे देण्यात येणारा ‘सत्यशोधक’ पुरस्कारही मिळाला होता.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमातही त्या आघाडीवर होत्या. 2000 साली मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात त्यांनी ‘मागे वळून पाहताना’ या परिसंवादात लोकविज्ञान संघटनेकरिता अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी त्यांनी केलेलं काम आणि त्यांना आलेले अनुभव त्यांनी जाहीरपणे मांडले होते.

गेली जवळपास दहा वर्षे होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे डॉ. प्रेरणा राणे यांचे वास्तव्य होते. 2011 साली त्यांनी डॉ. प्रेरणा राणे फाउंडेशन स्थापन करून त्याची रीतसर नोंदणी केली. त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विद्या चेतना या प्रकल्पा अंतर्गत त्यांनी कामगारांना आणि त्यांच्या मुलांना प्रशिक्षण दिलं. कोकणातील सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय पण होतकरू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित तर केलंच त्याचबरोबर शिष्यवृत्ती योजनाही त्यांच्याकरिता राबविली. 2019 साली डॉ. प्रेरणा राणे फाउंडेशन आणि खगोल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधदुर्ग जिह्यात आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गणपती उत्सवाकरिता कोकणात जाऊन यंत्रणेवर ताण आणू नये, याकरिता समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न डॉ. प्रेरणा यांनी केला होता आणि त्यांचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

– [email protected]