देवदिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  प्रज्ञा कुलकर्णी 

एकूण बारा महिन्यांमधला अतिशय पवित्र आणि सर्वश्रेष्ठ असा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना होय. भगवान श्रीकृष्णांनी आपले स्वरूप, आपल्या दिव्य विभूती अर्जुनाला सांगताना म्हटले आहे की,
‘बृहत्साम् तथासाम्नां गायत्री छन्दसाहम् ।
मासांनां मार्गशीर्षे। हमृतुनां पुसुमाकरः।।’
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘वैदिक स्तोत्रांमधलं बृहत्साम् स्तोत्र मी आहे. छंदांमधला गायत्री छंद मी आहे. बारा महिन्यांच्या ऋतुचक्रातला मार्गशीर्ष महिना मी आहे आणि सहा ऋतूंमधला वसंत ऋतू मी आहे.’’ प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी आपलं स्वरूप, आपलं दिव्य विभूतीमत्व मार्गशीर्ष महिन्याला दिले आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा थोडे पुढेमागे मृगशीर्ष नक्षत्र हे पूर्ण चंद्राजवळ असतं म्हणून या महिन्याचे नाव ‘मार्गशीर्ष’ असे ठेवले गेले आहे. प्राचीन काळी मार्गशीर्ष महिना हा ‘अग्रहायण’ म्हणून ओळखला जात होता. कारण त्या काळात वर्षाचा पहिला महिना मार्गशीर्षच होता. सर्वात पहिला म्हणून सर्वात पुढे म्हणून तो अग्रहायण होय. आजही उत्तर हिंदुस्थानात मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायणच म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात दिवस लहान आणि रात्री मोठ्या असतात. या काळात आकाश अगदी निरभ्र असतं. त्यामुळे ग्रह, नक्षत्रे अगदी स्पष्ट आणि ठळक दिसत असतात. त्यांचा अभ्यास करण्यासाठी मार्गशीर्ष महिना उत्तम असतो. आश्विन-कार्तिकात सुरू झालेल्या दीपावली सणाचे पडघम मार्गशीर्षातही वाजत असतात. कारण मार्गशीर्ष महिन्याची सुरुवातच ‘देवदिवाळी’ सणाने होते. भगवान श्रीकृष्णांनी विभूती योगामध्ये ‘‘मी मार्गशीर्ष मास आहे’’ असे सांगितले तेव्हा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला सर्व देवदेवतांची स्वर्गलोकात दीपोत्सव साजरा केला म्हणून या दिवसाला देवदिवाळी म्हणतात.

देवदिवाळी ही मुख्यत्वे कोकण प्रांतात आणि खान्देशात साजरी केली जाते. आपले कुलस्वामी आणि कुलस्वामिनी, तसेच इष्ट देवदेवता यांच्याखेरीज ज्या देवदेवता आहेत त्यात स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता, महापुरुष, वेतोबा इत्यादी आणि आपल्या गावातील इतर महत्त्वपूर्ण अशा मुख्य 35 देवदेवतांना मान दिला जातो. या देवदिवाळीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून नैवेद्य रूपाने त्या त्या देवदेवतांचा मानाचा भाग पोहोचविण्याचा महत्त्वाचा विधी या दिवशी केला जातो. घरातील, गावातील आणि घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या अशा सर्व देवांचा उल्लेख करून त्यांचा आदरसत्कार केला जातो. या सर्व देवता संतुष्ट झाल्यावर त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरावर दुष्ट शक्तींची छाया पडत नाही अशी समजूत आणि श्रद्धा असते. अशा या देवदिवाळी सणाने खऱ्या अर्थाने दिवाळी सणाची सांगता होते.

[email protected]