पाऊलखुणा – स्मारकशिळांवरील शिलालेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

स्मारकशिळा, वीरगळ यांचा अभ्यास आता नवा नसला तरी त्यावरील शिलालेख हा विषय नेहमीच औत्सुक्याचा राहिला आहे. याचे कारण म्हणजे असे फार कमी कोरीव लेख आतापर्यंत सापडले आहेत. मुळशी तालुक्यात ग्रामदेवता व देवराईंचा अभ्यास करताना औंढे खुर्द, ब्राम्हणोली, साठेसाई या गावांमध्ये स्मृतिशिळांवरील कोरीव लेख सापडले आहेत. यानिमित्ताने स्थानिक इतिहासाचे एक सोनेरी पानच गवसले आहे असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्र म्हणजे राकट आणि कणखर देश. तसाच तो दगडांचा देश आहे, असे गोविंदाग्रजांनी वर्णन केले आहे. त्याची प्रचीती आपल्याला दख्खनच्या या भूमीतील गड-कोटांवरून येते. तशीच ती अनाम वीरांच्या स्मृती जागवत ठेवलेल्या वीरगळांवरून येते.

महाराष्ट्रात आढळणाऱया वीरगळांवर ज्या प्रकारे फार कमी शिलालेख अढळतात त्याच प्रकारे मध्ययुगीन स्मारक शिळांवरही फार कमी कोरीव लेख आतापर्यंत सापडले आहेत. गावोगावी असणाऱया ग्रामदैवतांच्या मंदिरांपुढे अथवा महादेवाच्या मंदिरांपुढे वीरगळांबरोबरच मध्ययुगीन स्मारकशिळा असल्याचे अनेकदा दिसते. या स्मारकशिळांवर वीरगळांप्रमाणे फारसे कोरीव शिल्पे नसतात. याला तत्कालीन राजकीय, धार्मिक व आर्थिक परिस्थिती जबाबदार होती. यामुळे ही स्मारक शिल्पे नक्की कोणत्या वीरपुरुषांची अथवा संतांची आहेत हे कळून येत नाही. यामुळे अनेकदा या स्मारकशिळांना म्हसोबा, वेताळ समजून त्यांची पूजाही होताना दिसते. काही स्मारकशिळांवर फारसा कोरीव नसलेला वीर पती-पत्नी अथवा एकाच वीराचे कधी घोडय़ावर तर कधी स्थानक रूपात शिल्प असते. यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांना देवाचे शिपाई समजून त्यांच्यावर शेंदूर लावून पूजा करतात तर काही ठिकाणी पशूबळीची प्रथाही पाहावयास मिळते.
पुणे जिह्यामध्ये मावळ व मुळशी तालुक्यात ग्रामदेवता व देवराईंचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या भटकंतीमध्ये मावळ तालुक्यातील औंढे खुर्द व ब्राम्हणोली या गावी तर मुळशी तालुक्यातील साठेसाई या गावी काही स्मृतिशिळांवर कोरीव लेख कोरलेले सापडले. हे लेख फारसे मोठे नसून दोन ते पाच ओळींचेच असून जरी त्यांच्यामुळे मध्ययुगीन इतिहासावर फार मोठा प्रकाश पडत नसला तरी स्थानिक इतिहासाचे एक सोनेरी पानच गवसले आहे असेच म्हणावे लागेल. मावळ परिसरात बापूजीबुवा या देवाच्या अनेक देवराया आहेत. त्यापैकी साठेसाई व ब्राम्हणोली या गावी संशोधनासाठी भेट दिली असता दोन शिलालेख तर लोवळ्याजवळ असलेल्या औंढे खुर्द येथील वाघोबा ऊर्फ वाघेश्वर या लोकदेवतेचा अभ्यास करण्यासाठी गेलो असता नागनाथ मंदिरासमोर असलेल्या स्मृतिशिळेवर दोन शिलालेख तर त्यामागेच असलेल्या जंगम समाजाच्या दफनभूमीत एक शिलालेख मिळाला आहे.

ब्राम्हणोली या ठिकाणी असलेल्या स्मृतिशिळेवर असणाऱया शिलालेखावर चंद्र -सूर्याचे अंकन खूपच कोरीव व सुबक आहे. या चिन्हाचा अर्थ मृत वीराची कीर्ती चंद्र, सूर्य असेपर्यंत टिकून राहील असे सांगायचे असते. अशा प्रकारे अनेक चिन्हे या स्मृतिशिळांवर आढळतात. यात औंढे गावी सापडलेल्या स्मृतिशिळांवर शिवपिंड व नंदी कोरलेले आहेत तर काही स्मृतिशिळांवर पावले कोरली आहेत. ही भोसले पाटील कुळातील मोवाजी या पुरुषाची आहेत. तर लेखाच्या वर समोरासमोर तोंड केलेले मासे कोरले आहेत. त्याचा अर्थ मात्र कळत नाही. त्या स्मृतिशिळेची रचना खूपच वैशिष्टय़पूर्ण आहे. या स्मृतिशिळेवर शिवपिंड आहे तर मध्यभागी गणपती आहे आणि या सर्वांचा भार तोलून धरला आहे अशाप्रकारे नंदी हा खालील भागात कोरलेला आहे. स्मृतिशिळांवर असणाऱया लेखांमधे देवनागरी लिपीबरोबरच मोडी लिपीही आढळते. साठेसाई येथे कोरलेल्या लेखामधली काही अक्षरे ही मोडी लिपीतील आहेत.

बहुतांश स्मारकशिळांवर फारसे कोरीव काम नसते आणि जरी तसा अपवाद मिळला तरी वीरगळांवरील कोरीव शिल्पांपेक्षा मध्ययुगीन स्मारकशिळांवरील कोरीव शिल्पे निकृष्ट स्वरूपाची रूपाची असलेली आढळतात. औंढे व ब्राम्हणोली येथील प्रत्येकी एका स्मारकशिळांवर शालिवाहन शक कोरले असून त्यांचा निश्चित काळ समजतो. ठिकठिकाणी असणाऱया स्मारकशिळांना देवता समजून शेंदराचे थर चढवल्यामुळे अनेक कोरीव लेख त्यांच्यामागे लुप्त झाल्याची शक्यता आज नाकारता येत नाही. स्मृतिशिळा या लढाईत मृत पावलेल्या वीरांच्या जशा असतात तशाच त्या संत, महात्मे तसेच कर्तृत्ववान माणसाच्याही उभारलेल्या दिसतात. मृत व्यक्तींच्या या शिळा देवाच्या सहवासात असाव्या म्हणून जशा मंदिरांच्या बाहेर उभा केल्या जातात तशाच त्या शेताच्या बांधांवर, नदी, ओढा, तलाव, विहीर यांच्या काठीही उभ्या असलेल्या अढळतात. अनेक वेळा ग्रामदैवतांच्या अभ्यासासाठी ज्यावेळी अनेक गांवांमधे जुनी मंदिरे पाडून नवीन मंदिरे बांधताना दिसतात त्यावेळी ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारातील जुने वीरगळ व अशा प्रकारची स्मृतिशिळा नदीत अथवा धरणात सोडून दिल्याचे कळते. त्यावेळी अतिशय वाईट वाटते. काही वेळा नव्या बांधकामात दगड म्हणून या अनाम वीरांच्या या स्मारकांचा उपयोग केलेला दिसतो. स्थानिक ग्रामस्थांना या स्मृतिशिळांविषयी माहिती देऊन जागरुक करून त्यांचे जतन करण्यासाठी प्रोत्साहित केल्यास स्थानिक इतिहासाचे हे महत्त्वाचे दुवे पुढच्या पिढीपर्यंत पोहचू शकतील.

स्मृतिशिळांचा अभ्यास करताना त्यांच्या रचनेचा तसेच आकार रचनेवरून स्थानिक स्वरूपाची वैशिष्टय़े, त्यांवर कोणकोणते अंकन आहेत, कोणकोणती शिल्प अथवा चिन्हे आहेत याचबरोबर या स्मृतिशिळा कुठे अढळतात असा त्यांचा शास्त्राrय अंगाने अभ्यास होऊ शकतो. तसेच त्यांच्यावरील कोरीव लेखांची भाषा आणि त्यातील अक्षरांच्या वळणावरून तत्कालीन अक्षरवटिकेची माहिती मिळते. लेखामध्ये आलेल्या नावांमुळे तत्कालीन लोकांची नावे कशा प्रकारची होती तसेच गावांची पूर्वीची नावे कशी होती, तत्कालीन समाजातील लोकांच्या उपास्य देवतांची नावे कोरीव लेखात येतात. यामुळे तत्कालीन समाजात कोणता उपासनापंथ अथवा देवता प्रसिद्ध होती, याच बरोबर धार्मिक व सामाजिक अंगांची माहिती तर मिळतेच तसेच मध्ययुगीन भाषेतील अनेक शब्दांवरून स्मृतिशिळांवर जर काळाचा उल्लेख नसेल तर कालनिश्चिती करता येते.
z [email protected]