
>> प्रसाद ताम्हनकर
सध्या आपल्याकडे ‘प्रेडिक्टिव पोलिसिंग’ प्रचंड चर्चेत आहे. गुन्हा घडण्याच्या आधीच त्याचा अंदाज लावून रोखण्याचे काम हे तंत्रज्ञान करते. या तंत्रज्ञानामध्ये एका विशिष्ट अल्गोरिदमच्या मदतीने एक ‘कॉम्प्युटर प्रोग्राम’ संभाव्य गुह्यांचा अंदाज बांधतो आणि मग त्याच्या मदतीने पोलीस गुन्हा घडण्याच्या आधीच सावध होऊन, तो रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करतात. सध्या हिंदुस्थानात दिल्ली, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांसारख्या काही राज्यांमध्ये पोलीस यंत्रणा या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.
हे तंत्रज्ञान नक्की काम कसे करते, या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यावर गुन्हेगारी कमी झाली आहे का, असे विविध प्रश्न सामान्य जनतेला पडत आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापराची सुरुवात सर्वात प्रथम ‘शिकागो’ शहरामध्ये करण्यात आली. 2013 साली शिकागो शहरात ‘टोळीयुद्ध’ आणि इतर गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्या वेळी ‘शिकागो पोलिसां’नी अशा घटना वेळीच रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. या तंत्रज्ञानामध्ये संशयित अपराधी, बंदुका बाळगणारे, शार्प शूटर, गोळीबार व इतर हिंसक घटनांमध्ये सामील असणारे यांच्या जोडीलाच अशा हिंसाचाराने पीडित झालेले, गोळीबारात जखमी झालेले अशा सर्व लोकांची एक यादी बनवून ती कॉम्प्युटरमध्ये अपलोड करण्यात येते. त्याचबरोबर या सर्व लोकांची आवश्यक माहिती, त्यांची गुन्हे करण्याची पद्धती, त्यांच्याकडून घडलेले गुन्हे या सर्वांचा तपशीलदेखील कॉम्प्युटरच्या एका खास प्रोग्राममध्ये साठवण्यात येतो. या सर्व माहितीचे विशिष्ट प्रकारे विश्लेषण करून हा प्रोग्राम भविष्यात घडू शकणाऱया गुह्यांचा अंदाज लावतो आणि तशा सावधगिरीच्या सूचनादेखील देतो. विशेष म्हणजे, हा प्रोग्राम त्याला पुरवण्यात आलेल्या लोकांच्या नावांना, त्यांनी केलेल्या गुह्यांचे किंवा त्यांच्यासोबत घडलेल्या गुह्यांचे विश्लेषण करून 1 ते 500 अशा क्रमात ‘गुण’देखील देतो. त्यानुसार कोणत्या व्यक्तीवर किती नजर ठेवणे गरजेचे आहे; याचा तपास यंत्रणांना अंदाज येतो. टोळीयुद्धामध्ये दोन गटांतील वैर हे सतत सुरूच असते. अशा वेळी एका टोळीकडून दुसऱ्या टोळीच्या गुन्हेगाराच्या जिवाला कायम धोका असतोच. अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान विशेष उपयोगी ठरते.
अगदी सोपे उदाहरण द्यायचे तर, एखादे पोलीस ठाणे आपल्या अधिकार क्षेत्राखाली असलेल्या भागाचे लहान लहान भाग बनवते आणि त्या भागातील गुन्हेगार, तिथे घडलेले गुन्हे, गुह्यांची वेळ अशी माहिती या कॉम्प्युटर प्रोग्रामला पुरवते. त्यानंतर हा प्रोग्राम या सर्व माहितीचा अभ्यास करून, कोणत्या भागात आणि किती वाजता पोलिसांची गस्त असणे गरजेचे आहे ते सुचवतो. त्यानुसार पोलीस त्या त्या भागात गस्तीवर राहून संभाव्य गुन्हे रोखू शकतात.
हे तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी असले तरी या तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यातील फक्त 7 ते 8 टक्के गुह्यांचा अंदाज बांधणे आणि ते रोखणे शक्य असल्याचा दावा या क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्त करतात. सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांमध्येदेखील या तंत्रज्ञानाबद्दल मतमतांतरे आहेत. एका गटाचे असे म्हणणे आहे की, कॉम्प्युटर हे यंत्र असले आणि त्यामुळे ते निःपक्षपाती काम करत असले तरीदेखील ते त्याला देण्यात आलेल्या माहितीच्या मदतीनेच काम करते. ही पुरवण्यात येणारी माहितीदेखील निःपक्षपाती असेल असे नाही. त्यामुळे अशा प्रोग्रामने एखाद्या व्यक्तीला दिलेले ‘गुण’ हे केवळ सावधगिरीची सूचना म्हणून बघावेत; त्या व्यक्तीला लगेच ‘अपराधी’ समजण्याची चूक होऊ नये.





























































