साय-फाय – मंगळावर स्वारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

यश’ हा शब्ददेखील ज्याच्यासाठी तोकडा पडतो असा माणूस म्हणजे ‘इलॉन मस्क’ होय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेला आणि ‘SpaceX’सारख्या अद्भुत कंपनीचा मालक असलेला इलॉन मस्क 28 जूनला 51 वर्षांचा झाला. जगभरात त्याचे नाव त्याच्या भव्यदिव्य स्वप्नांसाठी कायमच चर्चेत असते. टेस्लासारखी जादुई कार बनवणे असो वा ट्विटरसारखी दिग्गज कंपनी विकत घेणे असो, इलॉन मस्क सतत काही ना काही भव्यदिव्य करण्याच्या तयारीत असतो. अशा या अवलियाचे भविष्यासाठीचे ‘प्लॅन’ आहेत तरी काय? सध्या मस्क त्याच्या दोन मोठय़ा स्वप्नांवर काम करत आहे. एक म्हणजे जगभरात सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवणे आणि दुसरे म्हणजे इतर ग्रहांवर, मुख्यतः मंगळावर मानवाचे पहिले पाऊल उतरवायचे आणि लवकरच तिथे मानवी वस्ती उभारायची.

इलॉन मस्कने आपल्या पहिल्या स्वप्नात बऱयापैकी आघाडी घेतलेली आहे. अंतराळातील खालील कक्षेत त्यासाठी मस्कने अनेक उपग्रह तैनात केले असून जगभरातील 12 देशांमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर इंटरनेट पुरवठा सुरूदेखील करण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत असे आणखी 12 हजार स्टारलिंक उपग्रह सोडण्याची तयारी सुरू आहे. या एकूण सर्व उपग्रहांची संख्या 42 हजारांच्या आसपास असू शकेल. अंतराळावर जणू राज्य करायचे असेच इलॉन मस्कने ठरवलेले दिसते. आपल्या दुसऱया स्वप्नासाठी मस्क ‘नासा’च्या (NASA) मदतीने स्टारशिप रॉकेट बनवायलादेखील लागला आहे. चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता मानवाला मंगळावर पाय ठेवायचे वेध लागले आहेत आणि त्यासाठी मस्क प्रचंड मेहनत घेत आहे. मंगळावर केवळ पाय ठेवण्याचे त्याचे स्वप्न नाही, तर या लाल ग्रहावर संपूर्ण मानवी वसाहत वसविण्याचे त्याचे स्वप्न आहे. 2024 पर्यंत मानव मंगळावर पाय टाकेल असा दावा मस्कने केला होता. मात्र आता ही तारीख 2029 असेल असे त्याचे सांगणे आहे.

1969 मध्ये पहिल्यांदा मानव चंद्रावर पोहोचला होता. त्यानंतर तब्बल 60 वर्षांनी मानव मंगळावर पोहोचेल असा विश्वास इलॉन मस्कने व्यक्त केला आहे. 2029 मध्ये मंगळावर पहिले पाऊल आणि 2050 पर्यंत मंगळावर मानवी वस्ती असे त्याचे स्वप्न आहे. नासा आणि SpaceXच्या संयुक्त प्रयत्नांतून बनलेले ‘स्टारशिप’ रॉकेट त्यासाठी सहाय्य करेल. पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले असून मानवाने लवकरच इतर ग्रहांकडे वस्तीसाठी मोर्चा वळवला नाही, तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती इलॉन मस्कने व्यक्त केली आहे. मंगळावर जाण्यासाठी एकेरी प्रवास तिकीट हे अंदाजे एक लाख डॉलर्स इतके असेल. मस्कच्या मते अंतराळ प्रवासासाठी हे अत्यंत कमी भाडे आहे. 100 प्रवाशांची क्षमता असलेल्या एक हजार स्टारशिप रॉकेट्सचे लक्ष्य या मंगळ मोहिमेसाठी ठेवण्यात आले आहे. 2030 ते 2040 मध्ये दर दोन वर्षांनी ठरावीक अंतराने ही स्टारशिप रॉकेट्स सोडली जातील. मंगळावर ‘सेल्फ-रन’ धोरणाने वसवलेले शहर असणार आहे. तिथे जाण्या-येण्यासाठी ही रॉकेट्स मदत करतील.

हे सगळे कमी म्हणून की काय, मस्कची कंपनी ‘न्यूरालिंक’ आता मानवी मेंदूत ‘सुपर चिप’ बसवण्याची तयारी करत आहे. या चिपच्या मदतीने मानवी मेंदू थेट संगणकाला जोडण्यात येणार आहे. ही चिप केवळ मानवी मेंदूच्या हालचाली रेकॉर्ड करणार नाही, तर त्यावर प्रभावदेखील टाकण्याचे काम करेल. पार्किन्सनसारख्या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही चिप म्हणजे जणू चमत्कार असेल असा त्याचा दावा आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याला जोडलेला मानवी मेंदू’ अशी जबरदस्त कल्पना सत्यात उतरविण्याचे स्वप्न केवळ इलॉन मस्कसारखा माणूस बघू शकतो आणि कदाचित भविष्यात सत्यात उतरवूनदेखील दाखवू शकतो.

z [email protected]