साय फाय – ‘अ मॉक पॅरिस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

मालदीव या पर्यटकांच्या लाडक्या देशामध्ये चक्क पाण्यावर तरंगणारे एक संपूर्ण शहर वसवण्यात येत आहे. या शहराच्या निमित्ताने जगभरातील विविध आकर्षक आणि स्वतःचे असे काही वेगळेपण जपणारी अनेक शहरे चर्चेत आली आहेत. या चर्चेत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते एका नकली शहराने आणि हे नकली शहर दुसरे तिसरे कोणतेही नसून चक्क जगप्रसिद्ध असे पॅरिस शहर आहे. या नकली पॅरिस शहराची कथा आणि त्या निमित्ताने 4 ऑक्टोबर 2020 रोजी ‘द ग्लोब’ या ब्रिटिश वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला ‘अ मॉक पॅरिसः फ्रेंच प्लॅन टू डिसीव्ह जर्मन इनव्हेडर्स’ हा लेखदेखील प्रचंड चर्चेत आहे. अनेकांना माहीत नसलेली एक अद्भुत सत्यकथा त्यात देण्यात आलेली आहे.

या लेखातील माहितीनुसार पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान काही काळासाठी दोन्ही बाजूंनी युद्धविराम झालेला होता. युद्ध आता पूर्वीसारखे राहिलेले नव्हते, तर ते आकाशापर्यंत पोहोचले होते. जर्मन विमाने शत्रुराष्ट्रांच्या शहरांवर आणि विशेषतः राजधानीवर जोरदार बॉम्बहल्ले करत होती. अर्थात, आता युद्धभूमीवर न जाणारे वृद्ध, स्त्र्ाया आणि लहान मुले यांचे प्राणदेखील संकटात आलेले होते. अशा वेळी जर्मनीला फसवण्यासाठी फ्रान्सने एक डाव रचला होता. फ्रान्सची राजधानी पॅरिस ही युद्धभूमीपासून सर्वात जवळ असल्याने तिला धोकादेखील सर्वात जास्त. अशा वेळी हुबेहूब पॅरिससारखे एक शहर मूळ पॅरिस शहरापासून काही अंतरावर वसवण्याची चाल खेळायचे ठरले. या खेळीमागचा खरा सूत्रधार होता इलेक्ट्रिकल इंजिनीअर फर्नांड जाकोपोझी.

युद्धविरामाच्या दरम्यान थांबलेल्या लष्करी हालचालींचा फायदा घेत फर्नांड जाकोपोझी आणि त्याच्या सहाय्यक अभियंत्यांच्या टीमने नकली पॅरिस शहर उभारण्यासाठी जोरदार मोहीम आखली. यामध्ये रस्ते, बस स्थानके, घरे, गाडय़ा अगदी रेल्वे आणि रेल्वे स्थानकदेखील उभे करण्यात आले. जणू पॅरिसची एक प्रतिकृती तयार करण्यात आली. जर्मन विमाने हल्ला करण्यास आल्यास ती या नकली शहराला फसतील आणि त्याच्यावर हल्ले करतील, ज्यामुळे मूळ पॅरिस शहर आणि तिथले रहिवासी सुरक्षित राहतील यासाठी ही सगळी योजना आखण्यात आली होती.

30 ऑगस्ट 1914 रोजी पॅरिसवर पहिला बॉम्बहल्ला झाला होता. एकतर पॅरिस युद्धभूमीपासून अत्यंत जवळ होते. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जर्मन विमानांना फक्त 30 किलोमीटर एवढे किरकोळ अंतर पार करण्याची गरज भासत असे आणि त्यातून पॅरिस हे फ्रान्सच्या राजधानीचे शहर, देशाची अस्मिता. त्यामुळे पॅरिसवर हल्ला करण्यासाठी जर्मन कायम उत्सुक असे. पॅरिसवर झालेल्या पहिल्या हल्ल्यात फारसे निरपराध नागरिक मारले गेले नाहीत. मात्र जीवितहानीपेक्षा या हल्ल्यांनी मानसिक हानी मात्र प्रचंड प्रमाणात पोहोचवली होती हे नक्की. त्यानंतर पुढील 18 महिन्यांत पॅरिसवर असे अनेक हल्ले करण्यात आले.

1917 मध्ये काही काळासाठी जर्मनीचे लक्ष ब्रिटनकडे वळले आणि फ्रान्सला जरा दिलासा मिळाला. मात्र ब्रिटनवर झालेल्या हल्ल्यात 162 नागरिकांचा मृत्यू झाला आणि इकडे फ्रान्सदेखील हादरले. ब्रिटनला शक्य तेवढे नुकसान पोहोचवल्यावर जर्मन विमाने पुन्हा एकदा पॅरिसच्या दिशेने झेपावणार यात काही शंका नव्हती. अशा वेळी सुरक्षेचे काय उपाय आखता येतील यावर प्रचंड विचारमंथन झाले आणि त्यातून आकाराला आली ती ‘नकली पॅरिस’ची कल्पना. त्या काळात आकाशातील युद्ध तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते. विमानातून बॉम्ब नेले जात आणि लक्ष्यावर फेकले जात. अशा वेळी उंचावरून विमान चालक असली आणि नकली पॅरिस शहर सहजपणे ओळखू शकणार नाहीत असा विचार पुढे आला आणि मग या ‘नकली पॅरिस’ संकल्पनेला अजून चालना मिळाली.

अंधारात उड्डाण करणाऱया जर्मन विमानांकडे फारसे अत्याधुनिक तंत्रज्ञान नसायचे. केवळ नकाशाच्या मदतीने त्यांचे काम चालायचे. फर्नांड जाकोपोझीने आपल्या इलेक्ट्रिकल ज्ञानाचा पुरेपूर वापर करत नकली पॅरिसमध्ये दिव्यांची अशी खुबीने रचना केली की, घर, रस्तेच काय, तर अगदी रेल्वे स्टेशनदेखील सजीव बनले. पिवळ्या, लाल आणि पांढऱ्या दिव्यांचा वापर त्याने इतक्या चतुराईने केला होता की, नकली कारखान्यांच्या चिमण्यांमधून धूर आल्याचा आभास होत असे. तंत्रज्ञान अत्यंत बाल्यावस्थेत असलेल्या त्या काळात अभियंत्यांनी उभारलेली ही ‘मायानगरी’ किती अद्भुत असेल याची कल्पना करणेदेखील अशक्य!

[email protected]