साय-फाय – नासाची नजर उडत्या तबकड्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

उडत्या तबकडय़ा अर्थात ‘यूएफओ’ (Unidentified flying object- UFO) हा जगभरातील लोकांचा अत्यंत आकर्षणाचा आणि आवडीचा विषय आहे. जगभरात उडत्या तबकडय़ा, एलियन्स बघितले गेल्याचे दावे मोठय़ा काळापासून होत आहेत. अर्थात त्याचा ठोस पुरावा असा कधी समोर आला नाही. मात्र अनेकदा काही विचित्र वस्तू अंतराळात दिसल्या आहेत हेदेखील खरे. आजपर्यंत नासासारखी अमेरिकेची संस्था ह्या गोष्टींना ठामपणे नाकारत आलेली होती. मात्र आता हीच नासा उडत्या तबकडय़ांचा विषय गंभीरतेने घेताना दिसणार आहे. अमेरिकेला उडत्या तबकडय़ांपासून धोका आहे आणि ह्याच धोक्याचा अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वात सुसज्ज अशा नासा ह्या अंतराळ संस्थेने शास्त्र्ाज्ञांची एक टीम नियुक्त केली आहे.

नासाने नियुक्त करण्यात आलेल्या ह्या टीमचे नेतृत्व करण्यासाठी प्रिन्स्टन विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्र्ा विभागाचे अध्यक्ष असलेले डेव्हिड श्परगेल यांची निवड केली आहे. नासाच्या सायन्स मिशन डायरेक्टोरेटमधील वरिष्ठ संशोधक डॅनियल इव्हान्स यांच्याकडे या अभ्यासाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. साधारण नऊ महिन्याच्या अभ्यासानंतर ही टीम आपला पहिला रिपोर्ट देईल. ह्या मोहिमेसाठी नासा काही लाख डॉलर्स खर्च करेल असा अंदाज आहे. सध्या उपलब्ध असलेल्या उडत्या तबकडय़ांच्या संदर्भातील सर्व माहितीचा अभ्यास करणे, भविष्यात आपल्याला उडत्या तबकडय़ांच्या संदर्भात काय नवीन माहिती मिळू शकेल ह्याचा अंदाज लावणे आणि ती माहिती मिळवण्यासाठी कोणते मार्ग सर्वोत्तम असतील ह्याचा शोध घेणे आणि सर्वात शेवटी ह्या मिळालेल्या माहितीच्या मदतीने सध्या चालू असलेल्या संशोधनाला अधिक योग्य मार्गाने कसे नेता येईल, त्यात अधिक भर कशी घालता येईल ते ठरवणे असे साधारण ह्या शास्त्र्ाज्ञांच्या टीमचे धोरण असणार आहे.

या नासाच्या टीमच्या स्थापनेची घोषणा अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकांनी नौदलाच्या विशेष दलाच्या सहकार्याने तयार केलेल्या अहवालाच्या एका वर्षानंतर करण्यात आली आहे. या अहवालात, नौसैनिकांनी पाहिलेल्या उडत्या अज्ञात गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली आहे, तसेच काही नोंदीदेखील देण्यात आलेल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या दोन अधिकाऱयांनी देखील अमेरिकन संसदेच्या समितीसमोर याबाबत निवेदन दिले होते. विशेष म्हणजे ह्या विषयाच्या संदर्भातली ही 50 वर्षांतील पहिली बैठक होती. अमेरिकन सरकारने आता या उडणाऱया अज्ञात गोष्टींना देशाच्या सुरक्षेचा मुद्दा मानला आहे, ज्यावर नासानेही सहमती दर्शवली आहे. एका निवेदनात नासा एजन्सीने म्हटले आहे की, ‘आकाशात उडणाऱया अज्ञात गोष्टी ही राष्ट्रीय सुरक्षेची आणि हवाई सुरक्षेचीही बाब आहे. कोणत्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि कोणत्या नाहीत हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्थात अशा घटनांचा धोका कमी करणे, ही आता नासाची जबाबदारी आहे आणि नासा त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे.’

गेल्या वर्षीच्या अहवालात असेदेखील नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेच्या संरक्षण आणि गुप्तचर एजन्सीच्या तज्ञांकडे या उडत्या तबकडय़ांबद्दल किंवा अंतराळात दिसलेल्या काही विचित्र वस्तूंबद्दल कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा डेटा (माहिती) उपलब्ध नाही. ज्या उडत्या गोष्टी नौसैनिकांनी, वैमानिकांनी पाहिल्या आहेत त्या संदर्भात त्यामुळे ठामपणे काही सांगणे अशक्य आहे. नौसैनिकांनी, वैमानिकांनी जे पाहिले ते पृथ्वीवरच विकसित झालेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे की त्याचे मूळ कुठेतरी बाह्य अंतराळात आहे ते सध्या सांगणे शक्य नाही. काँग्रेसमध्ये झालेल्या या सुनावणीत अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱयांनी कबूल केले की उडत्या वस्तूंची अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांचे तज्ञांकडे कोणतेही स्पष्टीकरण नाही.

नासाने आपल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बाह्य अवकाशातून कोणतीही उडणारी तबकडी आल्याचा कोणताही पुरावा नाही. यासंदर्भात जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा नासाचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी नासाचे शास्त्र्ाज्ञ, उपग्रह आणि सेन्सर्स इत्यादींचा वापर केला जाईल. गेल्या 50 वर्षांपासून, जेव्हा पहिल्यांदा उडणाऱया तबकडय़ांच्या बातम्या येऊ लागल्या, अगदी तेव्हापासून अमेरिकेने सातत्याने त्या बातम्यांचा इन्कार केला आहे. पण आता खुद्द अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने असे काही व्हिडीओ प्रसारित केले आहेत ज्यात काही चमत्कारिक उडणाऱया गोष्टी दिसत आहेत, मात्र त्या गोष्टी काय आहेत ह्याचा अंदाज लावता येणे शक्य नाही.

– [email protected]