विषाणूंच्या शोधात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

सध्या संपूर्ण जग ‘कोरोना व्हायरस’चा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रोन’च्या हल्ल्याने बेजार झालेले आहे. ‘ओमायक्रोन’ हा कोरोनाचा व्हेरिएंट आहे की, तो एक नव्याच प्रकारचा ‘व्हायरस’ आहे यावर जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र असे असूनही या ‘ओमायक्रोन’च्या हल्ल्याने जगाची घडी पुन्हा एकदा विस्कटून टाकली आहे हेदेखील खरे. आता या सर्वात शास्त्रज्ञांच्या एका नव्या अभ्यासाने अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या उद्रेकात कोरोनावर उपचार शोधण्यासाठी, कोरोनाचा उगम, त्याची लक्षणे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांची एक टीम सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने आपले संशोधन पार पाडत होती. आता या सुपर कॉम्प्युटरने एक लाख नवे ‘व्हायरस’ शोधून काढले असून त्यातील नऊ व्हायरस हे कोरोनाचे नवे व्हेरिएंट आहेत. ‘नेचर जर्नल’मध्ये नुकताच यासंदर्भातला एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या शोधासाठी सुपर कॉम्प्युटरने गीगाबाईट्स एवढय़ा प्रचंड डाटाची तपासणी केली. त्याचबरोबर जीन सिक्वेन्सिंगसाठी 50.70 लाख बायॉलॉजिकल सॅम्पलदेखील सुपर कॉम्प्युटरला पुरवण्यात आले. यामध्ये बर्फाच्या खाली सापडलेल्या नमुन्यांपासून ते जनावरांच्या विष्ठेर्यंतचे अनेक नमुने जमवण्यात आले होते.

या शोधण्यात आलेल्या एक लाख बत्तीस हजार RNA व्हायरसपैकी पंधरा हजार व्हायरस हे शास्त्रज्ञांना आधीच माहिती होते. मात्र कोरोनाचे जे नवे नऊ ‘व्हायरस’ सुपर कॉम्प्युटरने शोधले आहेत, ते शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. हे नऊ कोरोना व्हायरस जगासाठी पूर्णपणे अनोळखी आहेत. अर्थात या संशोधनामुळे येणाऱया काळातील अनेक साथीचे रोग, आजार यांची माहिती मिळेल आणि या रोगांवरील उपचार, दक्षता, त्याला पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रचंड मदत मिळेल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. ‘‘जेनेटिकली’ पूर्णपणे अनोळखी अशा व्हायरसच्या एका वेगळय़ाच जगात आपण प्रवेश करत आहोत’’ असे शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितले.

या शोधण्यात आलेल्या नव्या व्हायरसचा अभ्यास केल्यानंतर प्राण्यांच्या शरीरात असलेल्या अनेक व्हायरसमुळे भयानक असे साथीचे रोग पसरू शकतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. यातील ‘SARS-CoV-2′ सारखी साथ जगभरात पसरू नये अशी आशादेखील ते व्यक्त करत आहेत. कोरोनाचे सापडलेले नऊ पूर्णपणे अनोळखी असे व्हायरसदेखील अत्यंत घातक असून कोरोना व्हायरसच्या पुढच्या पिढ्या अधिक विक्राळ होत जाणार असल्याची भीतीदेखील शास्त्र्ाज्ञांच्या टीमने व्यक्त केली आहे.

मात्र, आता सुपर कॉम्प्युटर आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने अशा धोकादायक व्हायरसचा तसेच त्यांच्या उगमाचा शोध घेणे सोपे झाले असून त्यांना प्रतिबंध करणे आता अधिक सुलभ बनले आहे. मात्र यासाठी वैद्यकीय संस्था, जगभरातील फार्मा कंपन्या यांनीदेखील या व्हायरसवर अधिक संशोधन करून भविष्यात पसरू शकणाऱ्या साथीच्या रोगांवर तसेच इतर आजारांवर औषधोपचार शोधण्याच्या प्रक्रियेला चालना द्यायला हवी आहे.

ही शोधाची प्रक्रिया अत्यंत सुलभ झाली असून आता एखाद्या व्यक्तीला ताप आलेला असल्यास त्याच्या रक्ताच्या नमुन्याच्या सिक्वेन्सिंगच्या मदतीने ही व्यक्ती कोणत्या व्हायरसच्या तडाख्यात सापडली आहे आणि या व्हायरसचे उगमस्थान कोणते आहे, ते एखाद्या प्राण्याकडून तर संक्रमित झालेले नाही ना, हे अवघ्या काही मिनिटांत शोधता येणे शक्य होणार आहे.

[email protected]