ठसा : डॉ. गो. मा. पवार

68

>> प्रशांत गौतम

मराठी साहित्यातील व्यासंगी समीक्षक तथा थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. गो. मा. पवार यांच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. मराठीतील विनोदी साहित्याची समीक्षा करणारे ते एकमेव समीक्षक समजले जात. डॉ. गोपाळ माधव पवार हे अवघ्या मराठी साहित्य विश्वासाठी गोमा म्हणून जास्त सर्वसुपरिचित होते. थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातजावई, आपल्या आजेसासऱयांचा वारसा त्यांनी त्यांच्या कार्यातून जपला. महर्षी शिंदे यांच्या साहित्यावर तब्बल चार दशकं त्यांनी संशोधनाचे कार्य केले. त्याच साधनेतून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य, महर्षी शिंदे- भारतीय साहित्याचे निर्माते. महर्षी शिंदे समग्र (दोन खंड) The life and works of shands अशी साहित्य संपदा निर्माण झाली. गोमांच्या या अद्वितीय संशोधन कार्याचे महाराष्ट्रभर कौतुक झाले. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे- जीवन व कार्य’ या गंथास 2007 साली साहित्य अकादमीचा सन्मान लाभला. गोमांनी या थोर समाजसुधारकाचे विस्तृत चरित्र लिहून आधुनिक इतिहासाच्या वाचकांना उपकृत केले. या पुस्तकाचा हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, तामिळ अशा भाषांत अनुवाद होऊन थोर पुरुषाचे कार्य जगभर पोहोचले. मात्र पुस्तकामुळे त्यांना शिंदे यांचे चरित्रकार अशी ओळख मिळाली.

गोमा यांच्याकडे उपजतच सुक्ष्म, तरल विनोदबुद्धी होती आणि विनोद हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. विनोद निर्मिती का होते यावर त्यांनी लिहिलेला ‘विनोद ः तत्त्व आणि स्वरूप’ हा मौलिक ग्रंथ लिहिला. विनोदाबाबतचे प्रचलित सिद्धांत त्यांना मान्य नसल्याने त्यांनी संशोधन करून उपरोक्त ग्रंथ लिहिला व त्यांना पीएच. डी. ही त्याच विषयातील सखोल चिंतन व अभ्यासासाठी प्राप्त झाली. तेव्हा पु. ल. देशपांडे हे या प्रबंधासाठीचे बहिःस्थ परीक्षक म्हणून होते. त्यात पु. लं. वर टीका असली तरी त्यांनी गोमांच्या या संशोधन कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. विनोद तत्त्व व स्वरूप, मराठी विनोद – विविध आविष्कार रूपे, निवडक फिरक्या अशी साहित्य संपदा या संशोधनातून निर्माण झाली. गोमांच्या खासगी गप्पांचा ज्या भाग्यवंतांना लाभ झाला. त्यांची मूळ प्रकृती गंभीर झाली असली तरी स्वभाव मात्र मिश्किल होता. विनोदाचं स्वरूप कसं असतं याचा शोध घेण्यासाठी त्यांनी भरतमुनी, प्लेटो, ऑरिस्टॉटलपासून इमॅन्युएल कांट फ्रॉईड, कोसलरपर्यंत ज्या ज्या तत्त्वचिंतकांना, सौंदर्यमीमांसक आणि मानववंशशास्त्र्ाज्ञांनी विनोदाच्या संदर्भाने उपपत्ती मांडल्या त्यांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करून आपला सिद्धांत मांडला. त्यातूनच त्यांची ओळख मराठी साहित्यातील विनोद साहित्याचे एकमेव समीक्षक अशी निर्माण झाली. ‘वेगवेगळय़ा पातळय़ांवरील दोन विभिन्न आकलनांचा परस्पर आघात आकस्मिकपणे प्रत्ययाला आणून हास्यामध्ये अथवा स्मितांमध्ये पर्यावसित होणाऱया जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रचिती देणारा धर्म म्हणजे विनोद अथवा विनोदात्मकता. या धर्माने मुक्त असलेले लेखन म्हणजे विनोदी वाङ्मय’ अशी त्यांनी व्याख्या केली होती. गो.मा. पवार यांनी 1963 पासून समीक्षात्मक लेखनास प्रारंभ केला. कुसुमाग्रजांच्या ‘रूपकात्मक कविता’ हा त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण लेख होय. त्यानंतर पु.ल. देशपांडे, आनंद यादव यांच्या लेखनाची समीक्षा केली. विवेकनिष्ठ जीवनदृष्टी हा त्यांचा पहिला समीक्षा ग्रंथ. व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक कथांची संपादने करून विवेचक अशा प्रस्तावनाही लिहिल्या. अन्य ग्रंथातील असाच एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप हा सांगता येतो. संपादनाच्या सखोल दृष्टीतून झालेले संपादनही वैशिष्टय़पूर्ण ठरले. गोमांनी आजपर्यंत विविध चर्चासत्रांसाठी वीसेक शोधनिबंधांचे सादरीकरण केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ दहा पीएच.डी.च्या आणि बावीस एम. फिल.च्या विद्यार्थ्यांना झाला. यावरूनच त्यांची विद्यार्थीप्रियता किती सर्वदूर पोहोचली होती, ते आपल्या लक्षात येऊ शकते. गोमांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातील वीसेक वर्षांचा कार्यकाळ संभाजीनगरात व्यतीत केला. 1968 ते 1979 या काळात गोमा मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात कार्यरत होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी विनोदी साहित्यावरची पीएच.डी. संपादन केली. याच काळात विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी भाषा आणि वाङ्मयास वैभव प्राप्त करून देणारी प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. प्रभाकर मांडे आणि

डॉ. गो. मा. पवार यांच्यासारखी ग्रेट दिग्गज मंडळी होती. त्यानंतर ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना समीक्षा क्षेत्रातील लेखन/योगदानासाठी साहित्य अकादमीसह अनेक सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले. मात्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळू शकला नाही. सोलापूर या कर्मभूमीतच त्यांची अखेरचा श्वास घेतला. व्यासंगी समीक्षक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असा लौकिक मागे ठेवून गोमा सर अखेरच्या प्रवासास निघून गेले.

आपली प्रतिक्रिया द्या