आसामी, कोकणीचा ज्ञानपीठ गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

आधुनिक आसामी कवितेचा चेहरा, अशी ओळख लाभलेल्या ज्येष्ठ कवी नीलमणी फुकन यांना त्यांच्या (कोबिता) कवितासंग्रहासाठी 2020 सालचा 56वा ज्ञानपीठ पुरस्कार नुकताच घोषित झाला, तर ज्येष्ठ कोकणी कथा लेखक, कादंबरीकार दामोदर यशवंत मावजो यांना कादंबरी लेखन योगदानासाठी 2021 सालचा 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला. फुकन यांच्या निमित्ताने आसामी भाषेचा तिसऱ्यांदा तर मावजो यांच्या निमित्ताने कोकणी भाषेचा दुसऱ्यांदा सन्मान होतो आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा हा परिचय.

फुकन यांनी आपल्या सकस आणि दर्जेदार काव्यलेखनातून आसामी कवितेला आधुनिक चेहरा प्राप्त करून दिला. त्यांच्या आधी ज्ञानपीठ पुरस्कार बिरेंद्र कुमार भट्टाचार्य आणि मामोनी रायसोम गोस्वामी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव, ठसठशीत योगदानासाठी लाभला. याचा परिचय देण्यापूर्वी एक बाब स्पष्ट करणे महत्त्वाचे वाटते. (आसाममध्ये याच नावाचे आणखी एक ज्येष्ठ कवी, संपादक व स्वातंत्र्य सैनिक (1879 ते 1978 या काळात होऊन गेले. बागमिदार निलोमनी फुकन हे कवी, सधन शेतकरी, संपादक होते. त्यांचे चौदा कवितासंग्रह प्रकाशित होते. अनेक हस्तलिखित अप्रकाशित होते. त्यांचे शिक्षण गुवाहाटी, बिहार, कोलकाता येथे झाले. जॉर्ज इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक होते. आसाम साहित्य सभेचे दोनदा अध्यक्ष होते. त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टाचे तिकीटही निघाले. म्हणून ते सीनिअर फुकन होते आणि ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते ज्युनिअर फुकन होत.) त्यांचा जन्म गोलघाट जिल्ह्यात 10 सप्टेंबर 1933 साली झाला. कवी, कथाकार आणि आसामी लोककलांचे, लोकसाहित्याचे अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 88 व्या वर्षीही ते कार्यरत असतात. कवितांची तेरा पुस्तके प्रकाशित आहेत. 1961 च्या सुमारास त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. 1950 च्या वर्षांपासून त्यांनी काव्य लेखनास प्रारंभ केला. सूर्य हे नो नामी अहे इ नदी येदी (सूर्य या नदीवर उतरतो आहे, असे म्हणतात, 1963), मानस प्रतिमा, गुवाहाटी बुकस्टॉल (1971) फुली ठका सूर्यमुखी फुलटीर फळे (फुलणाऱ्या सूर्यफुलाच्या दिशेने (1971) अशी त्यांची महत्त्वाची साहित्य संपदा सांगता येते. कविता (साहित्य अकादमी प्रकाशन (2001), नीलमणी फुकन यांच्या निवडक कविता – संपादन कृष्ण दुलाल बरुआ (2007) ही त्यांची अधोरेखित केली जाणारी साहित्यकृती सांगता येते. त्यांच्या (कोबिता) कवितासंग्रहासाठी 1981 साली साहित्य अकादमी सन्मान लाभला. 2002 साली त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्राप्त झाली. 1969 साली गुवहाटी येथील आर्य विद्यापीठाच्या महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. 1992 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी जपानी, युरोपिय कवितांचा आसामीमध्ये अनुवाद केला. त्यांनी आपल्या अभिजात साहित्य, काव्यलेखनातून आधुनिक चेहरा प्राप्त करून दिला. म्हणूनच वाचकांना त्यांच्या कवितेतली शैली, सहज, सुंदर, साधी, सोपी भाषा, साधेपणा खूप भावला. त्यांच्या लेखनात समृद्ध लोक संस्कृती, लोकभाषा व्यक्त होत असते. आदिवासी लोककलांचे समीक्षक म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आसामी भाषेतील त्यांची एक कविता-
आपण आता कशाबद्दल बोलत होतो?
दगड कठीण, पाणी थंड असण्याबद्दल
आग जळण्याबद्दल
आणि मोर पसरवणारे मोर
जगाची पहिली पहाट
कशी होते, याबद्दल
आणि गोड फळ कडू का होते
ते क्षणात तोंडात आल्यावर
आभाळ जिवंत अंगारासारखे चमकते याबद्दल
फक्त चार मिनिटं मध्यरात्रीपर्यंत
पृथ्वी हळूहळू वाळूकडे वळत आहे
आणि बांबूच्या गुठळ्यांची सावली
राखेत वळत आहे
नाही, मला आता काहीच आठवत नाही
तू काही क्षणापूर्वी मला सांगितलंस
की तू माझ्यावर प्रेम करतोस!

कोकणातील नामवंत कथा लेखक, कादंबरीकार आणि पटकथा लेखक असा बहुआयामी प्रवास मावजो यांचा सांगता येतो. त्यांना कादंबरी लेखनातील भरीव योगदानासाठी ज्ञानपीठ सन्मान घोषित झाला. त्यांच्याआधी रवींद्र केळेकर यांचा ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव झाला होता. 77 वर्षीय मावजो यांचा जन्म दक्षिण गोव्यातील माजोर्डा येथे झाला. महाविद्यालयात असल्याच्या काळापासून त्यांचे कथालेखन सुरू होते. ‘गांथन’ हा पहिला कथासंग्रह 1971 साली प्रकाशित झाला. याला कोकणी साहित्य मंडळाचा पुरस्कार लाभला. 1983 साली त्यांच्या कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी सन्मान लाभला, तर काणी एका खोमसायी या साहित्य कृतीस गोवा कला अकादमीचा पुरस्कार लाभला. मावोजी यांचा ‘तिश्टावणी’ हा कथासंग्रह ऑनलाइन रूपात प्रकाशित झाला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त घोषित झाल्यावर ते प्रतिक्रिया देताना माध्यमात म्हणाले, ‘साठ वर्षांपूर्वी ज्या भाषेला पुणीही भाषा म्हणण्यास तयार नव्हते, त्या भाषेने या कालावधीत मोठी झेप घेतली की, या भाषेत दोन ज्ञानपीठ प्राप्त झाली आहेत. मराठीचा अभिमान आहेच, पण अभिव्यक्तीसाठी कोकणी जवळची वाटते.’’ गोव्यातील साहित्यिकांना एकापेक्षा जास्त भाषा येतात. त्यामुळे सध्या चांगले साहित्य निर्माण होत असल्याचेही ते म्हणतात. मावजो हे लघुकथाकार, कादंबरीकार तर आहेतच, पण त्यांनी विपुल प्रमाणात बाल साहित्य, लेखनही केले आहे. बालपण साष्टी तालुक्यात माजोर्डा येथे गेले. प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबईत पोतदार महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. आंतर महाविद्यालयीन नाट्य-स्पर्धेत लेखन करून त्यांनी साहित्य लेखनास प्रारंभ केला. 1965 साली त्यांची ‘अशोक’ ही कथा प्रकाशित झाली. त्यांच्या कार्मेलिन या कादंबरीने वेगळा इतिहास निर्माण केला. तब्बल बारा भाषेत तिचा अभ्यास झाल्याने ती चर्चेत आली. त्सुनामी सिमात ही कादंबरी बरीच गाजली. मावजो यांनी लिहिलेल्या अनेक लघुकथांना आंतरराष्ट्रीय महोत्सवात नामांकन मिळाले, त्यांच्या अनेक साहित्यकृती या पोर्तुगीज व फ्रेंच भाषेतही अनुवादित झाल्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अनेक कोकणी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. गोवा चित्रपट महोत्सवात त्यांच्या ‘आश्लेषा’ या चित्रपटाला सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार मिळाला. चार कथा संग्रह, तीन कादंबऱ्या, बालसाहित्य लेखन अशी साहित्य संपदा असलेले दामोदर मावजो गोवा व कोकणी भाषेतला दुवा आहेत. साहित्य अकादमीवर त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. एवढेच नव्हे तर साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आसामी कवी नीलमणी, फुकन आणि कोकणी कादंबरीकार दामोदर मावजो या दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा.

prashant [email protected]