साहित्य-संस्कृती : गोदाकाठी मायमराठी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

3 ते 5 डिसेंबर दरम्यान 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पार पडत आहे. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, डॉ. जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यानिमित्ताने विज्ञान साहित्याचा गौरव होतो आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या या साहित्य संमेलनाबाबत उत्सुकता आहे. कुसुमाग्रजांची साहित्यनगरी, नाशिकचा गोदाकाठ मायमराठीच्या सारस्वत व उपासकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 94 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनास काही महिन्यांपूर्वी डिसेंबरमधील 3, 4 आणि 5 तारखेचा मुहूर्त लाभला आणि संमेलनाची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली. आता नियोजित संमेलन अवघ्या एका आठवडय़ावर येऊन ठेपले. तसे हे संमेलन नाशिकमध्ये व डिसेंबर महिन्यात होणारे तिसरे होय. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली 1942 साली 22 वे संमेलन झाले होते. त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर असा योग 63 वर्षांनंतर 2005 साली आला. 78 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रख्यात दलित लेखक प्रा. केशव मेश्राम यांच्यानिमित्ताने मराठी साहित्याला लाभला. त्याच्या सोळा वर्षांनंतर असा योग नाशिककरांना 2021 या वर्षी मिळतो आहे. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यानिमित्ताने विज्ञान साहित्याचा गौरव होतो आहे. जयंत नारळीकरांना अध्यक्षीय भाषणासाठी प्रदीर्घ कालावधी मिळाला. कारणही तसेच म्हणावे लागेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मार्च 21मध्ये होऊ घातलेले 94 वे संमेलन पुढे ढकलले. नारळीकरांची निवड होऊनही प्रत्यक्ष संमेलनासाठी त्यांनाही डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागली. वास्तविक पाहता अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रदीर्घ परंपरेत केवळ 94 साहित्य संमेलने ही नियमित होऊ शकली आहेत. या परंपरेत विविध कारणांनी अनेकदा खंड पडला. खंड जर पडला नसता तर आज संमेलनाची सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा झाली असती, पण तसे व्हायचे नव्हते. साहित्य संमेलनाच्या परंपरेतील बहुतेक सर्व संमेलने ही मार्च/एप्रिल या महिन्यात झालेली आहेत असे दिसते. 1981 या वर्षी दोन संमेलने होण्याचा योग येऊन गेला. 1981च्या फेब्रुवारी महिन्यात अकोला येथे झालेल्या 55 व्या संमेलनाचे अध्यक्षपद गो. नी. दांडेकर यांना मिळाले, तर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात 56 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. गंगाधर गाडगीळ यांना मिळाले. त्या संमेलनास विरोध म्हणून मुंबईत त्याच दिवशी समांतर अ.भा. मराठी साहित्य संमेलन झाले, ते फार गाजले. अशीच सलग संमेलने होण्याचा योग 1990 या वर्षी मराठी साहित्य रसिकांनी अनुभवला.

जानेवारीच्या महिन्यात पुणे येथे झालेल्या 63 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण यांना प्राप्त झाले, तर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात रत्नागिरी येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मधु मंगेश कर्णिक यांना लाभला. अशीच पुनावृत्ती अवघ्या चार महिन्यांत होताना आपल्याला दिसेल. नाशिक येथे होणारे 94 वे साहित्य संमेलन डिसेंबर महिन्यात होते आहे, खरे तर या काळात नव्या संमेलनाचे अध्यक्ष जाहीर झालेले असतात, एवढेच नव्हे तर संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाही तयार झालेली असते, पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने हे सर्व नियोजन बदललेले आहे. डिसेंबर महिन्यात संमेलन झाल्याबरोबर साहित्य महामंडळ मार्च 22 मध्ये अवघ्या चारच महिन्यांत 95 व्या साहित्य संमेलनाची तयारी करीत आहे.

साहित्य संमेलनास थोर प्रतिभावंत सारस्वतांनी भूषविलेल्या अध्यक्षपदाची जशी परंपरा आहे तशीच संमेलनास लाभलेल्या उद्घाटकांचीही आहे. संमेलन अध्यक्षांची भाषणे जशी गाजली तसे उद्घाटकांनीही बाजी मारलेली आहे. याचसोबत विविध वाद-विवादांची असलेली परंपरा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही. पहिल्या संमेलनापासून ते अगदी 94 व्या संमेलनापर्यंत ही परंपरा कायम राहिली असल्याचे आपल्या लक्षात येईल. वाद कधी स्थळाच्या संदर्भात असतात, कधी उद्घाटक, अध्यक्षांच्या संदर्भात असतात, तर कधी आयोजक संस्थेबद्दलही असतात. संमेलनाच्या व्यासपीठावर मंत्री असावेत की नको, असाही विषय वादाचा होता. एवढे दिवस वाद-विवादासाठी अध्यक्षपद निवडणुकीचा विषय होता. तिनेक वर्षांपूर्वी निवडणूक रद्द झाली आणि निवडणुकीमुळे वाद हा विषय कायमचा संपला. तीन वर्षांपूर्वी अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि जयंत नारळीकर यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल केले. अध्यक्षपद निवडणुकीमुळे होणारे वाद टळले, परंतु वेगळे विषय घेऊन ते पुन्हा आले. यवतमाळ संमेलनाच्या वेळी उद्घाटकांना सन्मानपूर्वक देण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्याची नामुष्की तत्कालीन साहित्य महामंडळ अध्यक्षावर आली. ही घटना फार जुनी होत नाही, तोच नाशिक येथे संमेलनाचे उद्घाटन कोण करणार? हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. उद्घाटक म्हणून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावावर एकमत होताच दुसऱया बाजूस टीकाही सुरू झाली. उद्घाटक हे लेखक आहेत, त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन टीका करा अशा चर्चेचे सूर उमटले.

नाशिक येथे होणाऱ्या संमेलनात आयोजकांनी वैविध्यपूर्ण, दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून आपली बाजू भक्कम ठेवली. साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच दोन दिवस दिलीप प्रभावळकर, राजीव तांबे यांच्या उपस्थितीत बाल मेळावा होत आहे. प्रकट मुलाखत, परिसंवाद, दोन कवी संमेलने, कवी कट्टा अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आपण कोरोनाचे नियम पाळून घेणार आहोत. कुसुमाग्रजांची साहित्यनगरी, नाशिकचा गोदाकाठ मायमराठीच्या सारस्वत व उपासकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

 [email protected]