नामशेष देवपक्ष्याची दंतकथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

माळरानाच्या सौंदर्यात रंग भरणारा पक्षी म्हणजे माळढोक. परंतु निसर्गाला बेरंग करणाऱया मानवाच्या कृतींमुळे या पक्ष्याचं अस्तित्व आता जवळजवळ नष्ट झालं आहे. हा राजबिंडा देवपक्षी आता केवळ दंतकथा म्हणून उरला आहे.

हिंदुस्थानातून अनेक पशुपक्षी नामशेष झाले आहेत. शंभराच्या वर संख्या असलेले पशुपक्षी नामशेष होण्याच्या अंतिम घटका मोजताहेत. माळढोक पक्ष्याची गेल्या दोन वर्षांत नामशेष झाल्यातच गणना होते आहे. कारण गेल्या काही वर्षांत माळरानात आढळणारा माळढोक दृष्टीस पडलेला नाही. अभ्यासकांनी माळढोकची संख्या 150 च्या जवळपास असल्याची भीती व्यक्त केली आहे. इंग्रजीत द ग्रेट इंडियन बसटर्ड नावाने परिचित माळढोक विदर्भात हूम पक्षी म्हणूनसुद्धा ओळखला जातो. शेतातील पिकांवरील कीड खाणारा माळढोक पाली, विंचू, सरडे, गोम यासारख्या सरपटणाऱया प्राण्यांना भक्ष्य करतो. शेतकऱयांचा मित्र आणि एका प्रकारे सुरक्षारक्षक असलेल्या माळढोक कधी काळी देव पक्षी संबोधला जात असे. त्याच कारणास्तव माळढोक पक्ष्याची कधी शिकार केली जात नसे.

लांबून शहामृगाची प्रतिकृती भासावी असा हा उडणाऱया पक्ष्यातील सर्वात वजनदार पक्षी. माळढोक पक्ष्याचे सरासरी वजन 15 किलो आढळते. आपल्या वजनदार शरीरामुळे हवेत झेपावण्यासाठी आपले पंख पसरून लांब धाव घेतो. ते दृश्य त्याच्या रूबाबदारपणात अधिकच भर टाकते. चार फुटांपर्यंत उंची असलेला माळढोक म्हणूनच लांबूनसुद्धा लक्षवेधी आणि आकर्षक दिसतो. नर माळढोक वरून गडद तपकिरी तर मान आणि आतले शरीर पांढरे शुभ्र असते. तर माळढोक मादीचा रंग हा मातकट असतो. कधीकाळी देशभरात माळढोकचा आजच्या पेक्षा मोठय़ा संख्येने विहार होता. जगभरातील माळढोकच्या 23 प्रजातींपैकी हिंदुस्थानात चार प्रजातींचे मोठय़ा प्रमाणात अस्तित्व होते. म्हणूनच माळढोक कधीकाळी राष्ट्रीय पक्षी होण्याच्या स्पर्धेत होता. माळढोकला निसर्गाने दिलेले वरदान बघता नामवंत पक्षीतज्ञ दिवंगत सलीम अलींनी माळढोकला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा मिळावा म्हणून विशेष प्रयत्न केले. त्या व्यतिरिक्त माळढोकच्या संवर्धनासाठी अनेक सूचना डॉ. सलीम अलींनी केल्या होत्या. त्यांच्या मते माळढोकची कमी होत चाललेली संख्या व माळढोकची गुणवत्ता बघता राष्ट्रीय पक्षी म्हणून माळढोक योग्य निवड ठरली असती. परंतु माळढोकच्या इंग्रजी नावातील बस्टर्डचा हेतुपूरस्सर बास्टर्ड असा अपप्रचार केली जाण्याची शक्यता अधिक होती. कारण माळढोक पाकिस्तानातसुद्धा आढळून येतो. म्हणून माळढोकची राष्ट्रीय पक्षी म्हणून निवड केली गेली नसावी असा एक मतप्रवाह आहे.

1963 साली मोर राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषणा झाली. काही वर्षांतच दूरदृष्टी असलेल्या डॉ. सलीम अलींनी व्यक्त केलेली भीती खरी ठरू लागली. 1969 साली अभ्यासकांच्या सर्वेक्षणात माळढोक पक्ष्यांची हिंदुस्थानातील संख्या 1,250 इतकी खालावली. 1979 साली महाराष्ट्रात नगर आणि सोलापूर जिह्यांत त्यांच्या अधिवासाला अभयारण्याचा दर्जा दिला गेला. त्यानंतर 2006 सालापर्यंत 25 च्या जवळपास माळढोक पक्ष्यांचे तिथे अस्तित्व होते. 1984 व 1988 साली माळढोकचा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या यादीत समावेश करण्यात आला. मात्र मानवी प्रगतीच्या मार्गात माळढोक पक्ष्यांची अधोगती अधोरेखित होऊ लागली. 2005 साली 50, 2010 साली 10 तर 2015 साली महाराष्ट्र राज्यात केवळ 3 माळढोक पक्षी आढळून आले. 2018 सालात एकही माळढोक दिसला नाही. विदर्भ व मध्य महाराष्ट्रात माळढोक पक्ष्यांचे काही प्रमाणात अस्तित्व होते. गेल्या काही वर्षांत बोटावर मोजण्याइतपत माळढोकची संख्या आली. आता तर माळढोकची हातावरची रेष पुसली गेली की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानात माळढोक पक्षी अनेक ठिकाणी आढळून येत असे. आजही राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यांत अत्यंत कमी माळढोक आढळून येतात. मात्र मध्य प्रदेशातून नामशेष झालेला माळढोक गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातूनही नामशेष होण्याची नामुष्की ओढावलेली आहे. माळढोकची दयनीय अवस्था बघता यापुढे माळढोकच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेवर अभ्यासकांत साशंकता निर्माण झाली आहे. इंग्रजांनी आपल्या शिकारीच्या छंदात माळढोकला मोठय़ा प्रमाणात लक्ष्य केल्याने माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे एक मुख्य कारण आहे. विदर्भातील भद्रावती वरोरा या भागात माळढोकचे अस्तित्व होते. परंतु गेल्या काही दशकांत वाढत्या खाणी व इतर कारणास्तव माळरानं संपुष्टात आल्याने माळढोकची संख्या दिवसेंदिवस खालावत गेली. माळढोकला उडण्यासाठी मोठी धाव घ्यावी लागत असल्याने उच्च दाबाच्या विद्युत तारा या माळढोकच्या भरारीत अडसर ठरू लागल्या. सोलापूर जिह्यातील माळढोक अभयारण्याचे क्षेत्रसुद्धा कालांतराने कमी करण्यात आले. तेसुद्धा माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरले. माळढोक मादी ही झाडावरती घरटे न बांधता जमिनीवर अंडी घालते. दोन वर्षांतून एकदाच होणाऱया या प्रसंगाला जमिनीवर मुक्त संचार असलेल्या चतुष्पाद प्राण्यांच्या पायी ती अंडी तुडवल्या जाण्याचा धोका उत्पन्न होतो. त्यातून दैव बलवत्तर असलेली माळढोक पिले जन्माला येऊन वर्षभरात आईपासून विभक्त होतात. माळढोक संवर्धनात जन्मापासून जगण्यासाठीचा संघर्ष आजच्या परिस्थितीत खडतर असाच आहे. माळरानांच्या सौंदर्यात रंग भरणारा माळढोक महाराष्ट्रातून नामशेष झाला आहे. अगोदरच कमी झालेली माळरानं आज ओसाड भासू लागली आहेत. शेतकऱयांचा मित्र, सुरक्षारक्षक असलेल्या या देव पक्ष्याची दैन्यवस्था पर्यावरण असमतोलाचे द्योतक आहे. निसर्ग वेळोवेळी अनेक बोलकी चित्र दाखवतो. जे दिसायला हवं ते नामशेष झाल्यास निसर्ग त्याची दुसरी बाजू आपल्या समोर आणतो. निसर्गात रंग भरायचे अथवा बेरंग करायचे हे निसर्गतःच आपल्या हातात आहे.

n [email protected]