जागतिक कीर्तीचे हिंदुस्थानी गुप्तचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून जगभरात एका फोन कॉलवर प्रचंड उलथापालथ करण्याची क्षमता असलेले रामेश्वरनाथ काव. हिंदुस्थानात गुप्तचर यंत्रणेतील निवृत्त अधिकाऱयांनी जी पुस्तके लिहिली आहेत, त्यात रामजींचा आवर्जून उल्लेख आहे. आयबीतून रॉची स्थापना झाल्यावर त्याचे प्रमुख म्हणून काव यांनी रॉ या गुप्तचर संस्थेची जगाला दखल घेण्यास भाग पाडले.

1996 साल पाकिस्तान-विरोधातील युद्धात हिंदुस्थानला मिळालेल्या यशाच रौप्य महोत्सवी वर्ष. त्याच युद्धात नियोजनात अग्रस्थानी असलेले रामेश्वरनाथ काव मात्र त्याच संबंधित कार्यक्रमात सर्वात मागे बसले होते. काव यांच्याकडे एका व्यक्तीचे लक्ष जाताच 1971 च्या विजयाचे शिल्पकार म्हणून व्यासपीठावर येण्याची विनंती केली. मात्र काव यांनी त्याचे श्रेय कार्यक्रमाला उपस्थित सैनिक, नागरिक व प्रशासकीय अधिकाऱयांना देऊन तिथून निघून जाण्यालाच प्राधान्य दिले. हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून जगभरात एका फोन कॉलवर प्रचंड उलथापालथ करण्याची क्षमता असलेले रामजी व्यक्ती म्हणून स्थितप्रज्ञ होते. हिंदुस्थानात गुप्तचर यंत्रणेतील निवृत्त अधिकाऱयांनी जी पुस्तके लिहिली आहेत, त्यात रामजींचा आवर्जून उल्लेख आहे. 10 मे 1918 रोजी कश्मिरी पंडित कुटुंबात रामेश्वरनाथ काव यांचा जन्म झाला. 1940 साली प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची पोलीस खात्यात उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. स्वातंत्र्यानंतर काव यांच्याकडे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या सुरक्षेची जबाबदारी होती. पुढे आयबीतून रॉची स्थापना झाल्यावर त्याचे प्रमुख म्हणून काव यांनी रॉ या गुप्तचर संस्थेची जगाला दखल घेण्यास भाग पाडले.

हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरातील गुप्तचर यंत्रणेत अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव रामेश्वरनाथ काव. हिंदुस्थानातील त्यांचे सहकारी आपुलकीने त्यांना रामजी या नावाने संबोधित करतात. जगातल्या सर्वोत्तम गुप्तहेरांच्या यादीत रामजी यांचे नाव अग्रस्थानी आहे. हिंदुस्थानच्या रॉ या गुप्तचर संस्थेला रामजी यांच्यामुळे यशाची अनेक शिखरे पार करता आली. बांगलादेशची निर्मिती असो अथवा सिक्कीम संस्थानाचे हिंदुस्थानात विलीनीकरण असो, रामजींच्या नेतृत्वात रॉने अवघ्या नऊ वर्षांत भव्यदिव्य यश संपादित केले. रॉ अस्तित्वात आल्यावर अवघ्या अडीच वर्षांत रामजी यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तानची फाळणी झाली. रक्ताचा एकही थेंब न पडू देता रामजी यांनी सिक्कीम संस्थानाला हिंदुस्थानच्या गणराज्यातील 22 वे राज्य म्हणून समाविष्ट केले. सिक्कीमची मोहीम तर इतकी गोपनीय होती की, रॉच्या केवळ तीनचार अधिकाऱयांना त्याबाबत माहिती होती. सिक्कीमची राजेशाही राजवट उलथवून रामजी यांनी हिंदुस्थानची गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहे हे जगाला दाखवून दिले.

संजय गांधींनी कधीतरी रॉच्या कारभारात हस्तक्षेप केल्यावर इंदिराजींनी संजय यांना तसे न करण्याची ताकीद दिली. रामजी पॅरिसच्या दौऱयावर असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांना विचारणा केली होती. त्यावर रामजींनी असहमती दर्शवली होती. पुढे इंदिरा गांधींचा पराभव झाल्यावर रामजींनी रॉच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला. जनता पक्षाच्या सरकारने रामजींच्या विरोधात विरोधी पक्षांवर पाळत ठेवण्याचा आरोप केला. त्या चौकशीतून रामजींच्या विरोधात काहीच निष्पन्न झाले नाही. पराभवानंतर नेपाळच्या राजांनी इंदिरा गांधींच्या विरोधात वाढता रोष बघता त्यांना सहकुटुंब नेपाळला आश्रय घेण्याचा सल्ला दिला. त्यावर रामजींनी दिलेल्या असहमतीला यावेळी इंदिराजींनी सहमती दिली. या घटना रामजींची शासन दरबारी असलेली प्रतिष्ठा अधोरेखित करणाऱया आहेत.

ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिरा गांधींच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता रामजी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सूचना केल्या. त्यात बुलेटप्रूफ जाकिटाचा वापर हा मुख्य होता. इंदिरा गांधींच्या जाकिटाचे माप घेण्याची छाती तेव्हा कुठल्याच काँग्रेस नेत्यांकडे नव्हती. रामजींनी इंदिराजींच्या शरीरयष्टीच्या एका महिलेच्या मापाची तीन बुलेटप्रूफ जाकिटे बनवून आणली. रामजींनी इंदिराजींचे निकटवर्तीय असलेल्या फोतेदारांच्या करवी ती इंदिराजींच्या गळी उतरवली. यासारख्या अनेक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना राजकीय अथवा वैयक्तिक कारणास्तव इंदिराजींनी दुर्लक्षित केल्या. इंदिराजींची हत्या झाली तेव्हा रामजी एका गुप्त मोहिमेवर बीजिंगला होते. रामजींनी इंदिरा गांधींना दिलेला प्रत्येक सल्ला परिणामकारक होता हे पुढे सिद्ध झाले, पण इंदिराजींनी परिणामांची पर्वा केली नाही असेच दिसून येते.

निवृत्तीपश्चात रामजींनी पत्रांच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनेकदा सूचना केल्या. कारगील युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलजींनी रामजींना बोलावून काही विषयांवर चर्चा केल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त रामजी कश्मिरी पंडितांच्या हक्कांसाठीसुद्धा अग्रेसर होते. रॉला जन्म देणाऱया रामजींचे 20 जानेवारी 2002 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. अलेक्झांडरी द मरीनचेस फ्रान्स गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रामजींचे प्रशंसक होते. त्यांनी रामजींची गणना जगातील पाच उत्कृष्ट गुप्तचरांत केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सीआयएचे संचालक होते. त्यांची आणि रामजींची घनिष्ट मैत्री होती. सीआयएच्या मुख्यालयात रामजी गेले तेव्हा बुश यांनी रामजींना काऊबॉयची एक मूर्ती भेट दिली होती. काऊबॉयची मूर्ती रॉच्या मुख्यालयात आजही रामजींच्या स्मृतींना उजाळा देते आहे. रामजींच्या काव आडनावावरून रॉच्या तत्कालीन गुप्तहेरांना ‘कावबॉयज्’ असे अभिमानाने संबोधले जायचे. हिंदुस्थानच्या बाह्य सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख असलेल्या रामजींच्या कर्तृत्वाला देशातच नव्हे, तर जगाने मान्यता दिली. अतिशय साधे राहणीमान असलेले रामजी सार्वजनिक कार्यक्रम सोहळ्यात फारसे न रमणारे म्हणूनच प्रसिद्ध होते. त्यामुळे रामजींची फार छायाचित्रेसुद्धा आढळत नाहीत. रामजी नेहमी म्हणायचे, ‘‘सल्ले देऊ नका, स्वतः उदाहरण बना’’ (नसीहत मत दो, नमुने बन जाओ). रामजींनी स्वतःच्या कृतीतून आदर्श अधिकारी व नागरिकाचे आपल्याला उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

– [email protected]