
सामना ऑनलाईन । मुंबई
‘पानात काय आहे ते बघण्यापेक्षा मनात काय आहे ते बघा’ असा सल्ला खवय्यांना देणारे आणि वालाचं बिरडं, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत अशा खास सीकेपी पदार्थांच्या रसवंतीविषयी सांगताहेत, कवी-लेखक प्रवीण दवणे…
‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – ‘रस सगळे आकळले हो…’ म्हणजे जेवण त्यांना कळले हो. कोणाला? तर ज्यांना सगळ्या पदार्थातले रस आनंदाने आस्वादता येतात. त्याला जेवण कळले. ही माझी खाण्याची व्याख्या आहे. निसर्गाने चवींचं वैभव आपल्याला दिलंय.
खायला काय आवडतं?- मी नेहमी म्हणतो की, मासे जसे पाण्यात तसा सीकेपी माशात असतो. त्यामुळे कायस्थ सीकेपी असल्यामुळे घरात मासे आवडतात, पण मी स्वतः आठ वर्षांपूर्वी माशांचा आस्वाद घेतला, पण शाकाहाराचा आनंद घ्यावा असं वाटलं. त्यामुळे आता मांसाहार बंद आहे. त्यासाठी कोणतेही वेगळे कारण नाही.
खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – जे पदार्थ तेलकट, तिखट आहेत, ते खात नाही. ताजेपणावर भर देतो. गोड वरण-भात, मऊ भात कोणतेही पदार्थ चालतात. कधीही आतापर्यंत जेवणावर राग काढला नाही. ‘माणसाशी जशी आपण मैत्री करतो. तशी ताटातल्या पदार्थाशीही मैत्री करून त्याला हॅलो करता आलं पाहिजे.’ असं मला वाटतं. माझी आई प्रेमाने माझ्यासाठी स्वयंपाक करते. मी तिला विचारतो, तुझा स्वयंपाक एवढा छान कसा होतो. त्यावर ती सांगते, ‘त्यामध्ये मी छटाकभर मन घालते.’
डाएट करता का? – ठरवून करत नाही, पण अनावश्यक आणि नको त्या वेळी खात नाही. प्रयोगाहून घरी यायला उशीर झाला तर जेवणाऐवजी साधं थंड दूध पिणे पसंत करतो. ‘खरं म्हणजे मनासारखं आणि प्रचंड काम करणं हेच माझ्यासाठी डाएटिंग आहे.’ मी मनासारखं प्रचंड काम करतो आणि त्या कामाला पूरक जेवतो. यंत्राने वेळ वाचला, पण वाचलेल्या वेळेचं काय करायचं याचं यंत्र माणसाकडे नाही. त्यामुळे सतत गतिमान राहाणं हेच फिटनेसचं रहस्य आहे. लोकं मला विचारतात, तुमचं लेखन लोकांना आवडण्याचं रहस्य काय? मी लिहीत असताना या फोडणीचा वास यायचा. म्हणून ‘माझं लेखन आवडल्याचं कारण माझ्या लेखनाला आईच्या फोडणीचा गंध आहे.’
आठवडयातून किती वेळा बाहेर खाता? – बाहेर खाण्याची ओढ नाही. कारण घरामध्ये अतिशय उत्तम स्वयंपाक करणारी पत्नी, आई आहे. माझ्या मुलीलाही स्वयंपाकाची आवड आहे. फक्त तिचे पदार्थ आधुनिक पिढीचे आहेत. अन्नाला दैवत मानतो. हिंदुस्थानात खूप वेगवेगळे पदार्थ तयार होतात. सगळ्या चवी म्हणजे आयुर्वेदाची रसशाळा आहे. मसाले खा, पण मसालेदार खाऊ नका, असं माझं म्हणणं आहे.
प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?- तेव्हा मी त्या मातीतलं खातो. प्रत्येक प्रदेशाचा पदार्थ वेगळा. जळगावला भरीत-भाकरी, कोकणात भरपूर सोलकढी-भात, नाशिकची मेथी भाजी-भाकरी, नागपूरचा वडा-भात, कोल्हापूरची मिसळ आवर्जून खातोच. ‘पानात काय ते बघू नका, मनात काय ते बघा’ या विचाराचा मी आहे. खेड्यातल्या एका मुलाने खाऊ घातलेली शेंगदाण्याची चटणी आणि भाकरीची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे.
घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?- आईच्या हाताचं कडबे वालाचं बिरडं आणि भात आवडतं. पत्नीच्या हातचं आंबट वरण-भात, भरली वांगी, पण जेवणातला सगळ्यात आवडता राजस प्रकार म्हणजे भाकरी व गावठी मेथीची भाजी ही माझी सर्वात आवडती पंचतारांकित डीश आहे. निसर्गाला असलेली मूळ पदार्थाची चव तशीच ठेवली तर तो पदार्थ छान होतो.
जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?- ज्याला स्वयंपाक चांगला करता येतो आणि चवीने जेवता येतं त्याचं जीवनही आपोआप उत्सव होतं. त्यामुळे पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे मालवणी चिकन-भाकरी, कोलंबीची खिचडी, सुक्या सोड्यांची आमटी हे काही पदार्थ.
उपवास करता का ?- परमेश्वराच्या सहवास हाच उपवास.
भगरीचं सूप
हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याची तुपावर फोडणी टाकायची. त्यामध्ये धुतलेली भगर घालायची. वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं. जास्त पाणी घालून शिजवायची. त्यामध्ये चवीसाठी भाजलेल्या शेंगदाण्यात अर्धा पेला पाणी घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घालायचे. सूप पिताना दाताखाली शेंगदाणे आले पाहिजेत. याला एक निराळीच चव असते.
























































