सिनेमा – तू दुर्गा, तू काली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

नवरात्र उत्सव हा स्त्राrच्या जागराचा उत्सव. परिस्थिती कशीही असली आणि ती कोणत्याही क्षेत्रात असली तरी काही स्त्रिया आपल्या जीवनाला लागलेल्या पुरुषी अहंकाराच्या ग्रहणाला स्वयंप्रकाशाने झाकोळून टाकतात. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश इतिहासाला त्यांच्या नावाची, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावतो. चित्रपटाच्या माध्यमातून अशाच दखल घ्यायला भूमिका प्रेक्षकांना आजही विचार करायला भाग पाडतात. हेच त्या भूमिकांचे आणि या माध्यमाचे यश आहे.

संस्कृती जेव्हा भरभक्कमपणे समाजात स्थापन झालेली असते त्या वेळी साहित्यावर संस्कृतीचा आघात, प्रतिघात होत असतो, पण जेव्हा संस्कृतीची जडणघडण होत असते तेव्हा मात्र साहित्याचा संस्कृतीवर परिणाम होत असतो. चित्रपट हे समाजातील अनुभव पडद्यावर अनुभवण्याचे माध्यम असल्यामुळे या माध्यमातून संस्कृतीचे होणारे दर्शन हे अधिक प्रभावी जाणवते.

रामायणातील सीता असो की महाभारतातील द्रौपदी किंवा चित्रपटातील नायिका, त्यांचा छळ पडद्यावर पाहण्याची सर्व हिंदुस्थानी प्रेक्षकांची मानसिकता तयार झालेली आहे. त्या स्त्राrचं सामान्य असणं चारचौघींप्रमाणे जगणं, होणाऱया अन्यायाविरुद्ध न बोलणं, अन्याय सहन करून स्वतचा गळा घोटून, स्वतची अस्मिता जाळून, स्वतचं स्वत्व फुंकून जगणं याला समाजमान्यता आहे, पण ती जर बंड करून उठली तर तिच्या जवळचे तिला आसरा द्यायला, मदत करायला, तिचे सांत्वन करायला तयार नसतात. 1987 साली आलेल्या सुजाता मेहता अभिनित ‘प्रतिघात’मधली शिक्षिका असणारी नायिका लक्ष्मी किंवा 1993 मध्ये आलेल्या ‘दामिनी’ची नायिका दामिनी या दोन्ही दुर्गा आहेत, काली आहेत. त्या ज्या समाजव्यवस्थेमध्ये, ज्या काळामध्ये जगत आहेत, त्या काळातील समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे असणारे स्थान, त्यांची असणारी वैचारिक मानसिकता, संस्कृतीमध्ये असणारे स्त्रियांचे स्थान आणि त्यांची जबाबदारी या सर्व बाबतीत त्या अनभिज्ञ आहेत. कारण त्या मूलत स्वतंत्र आहेत. जगण्यातील पावित्र्य, विचारातील पावित्र्य आणि आपल्या सामर्थ्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. म्हणूनच ‘प्रतिघात’मधली लक्ष्मी जेव्हा एका पोलीस अधिकाऱयाचा खून होताना पाहते तेव्हा खून करणाऱया त्या कालीच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी तयार होते.

संपूर्ण समाजव्यवस्था तिच्या विरोधात आहे. पोलीस अधिकारी तिच्या विरोधात आहे. इतकंच नव्हे, तर तिचा वकील पतीसुद्धा तिच्या विरोधात आहे. तिचे सासर तिच्या विरोधात आहे. सगळे तिच्या विरोधात आहेत. पण ती आपल्या भूमिकेवर ठाम असते आणि म्हणूनच शिक्षिका लक्ष्मीला भर चौकात काली आणि त्याचे गुंड नग्न करतात, पण नग्न केल्यानंतर तिच्या डोळ्यांत शरम नसते तर अंगार असतो. पाहणाऱयांचीच मान शरमेने खाली झुकते. तिला मरणाचं भय नसतं.

कुठून येते ही विलक्षणता? स्वतच्या अस्मितेला धरून जगण्याची तीव्र इच्छा? त्या वेळी ती त्या काळातली नसते तर ती असामान्य असते. आपल्या विचारक्षमतेच्या पलीकडची असते, पण समाजाची मानसिकता 1987 मध्ये तशी होती आणि 2023मध्येसुद्धा तशीच आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढली जाते. तेव्हा या देशामध्ये स्त्राr सुरक्षित आहे का? हा विचार 1987 साली ‘प्रतिघात’ पाहताना येत होता आणि 2023 सालीही तोच अनुभव येत आहे.

हा लेख लिहीत असताना साताऱयामध्ये एका आदिवासी महिलेवर अकरा जणांनी पाशवी बलात्कार केल्याची बातमी वाचतो आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात या घटना अजूनही घडतात ही एक मोठी शोकांतिका आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये प्रत्येक स्त्राrची भूमिका ही दुर्गा आणि कालीसारखी असावी. ‘दामिनी’मध्ये नेमकं वेगळं काय होतं? झालेला अन्याय दामिनीला सहन होत नाही. आपल्याच घरातील मोलकरणीवर आपल्याच कुटुंबातील तरुण मुलं बलात्कार करतात तेव्हा संपूर्ण कुटुंब दामिनीला समजावून सांगतं की, तू साक्ष देऊ नकोस; पण त्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात ती साक्ष देते. अशी हिंमत असणारी स्त्राr म्हणजे दुर्गा आणि काली होय.

भर दरबारात द्रौपदीची विटंबना करतानाही ते सर्व शूर योद्धे (कोणत्या अर्थाने शूर म्हणायचं? हा प्रश्नच आहे) माना खाली घालून बसले होते आणि मणिपूरमध्ये ही घटना घडत असतानाही सर्व नेते माना खाली घालून बसलेले होते. आपल्या देशातील परिस्थिती ना महाभारताच्या काळात बदलली ना आजच्या काळात बदलली आहे. म्हणूनच चित्रपटातली नायिका कधी दुर्गा, तर कधी कालीच्या रूपात समोर येत राहते, तर कधी वास्तवातही ती फुलनदेवीच्या रूपात येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेते. तेव्हा चित्रपट आणि समाज यातलं अंतर क्षणभर का होईना, अदृश्य होतं. हिंदुस्थानी परंपरेत स्त्राrचं जीवन हे फक्त विवाहापर्यंत असतं. विवाहानंतर तिच्या जगण्याला, तिच्या मनाला, तिच्या अस्तित्वाला, तिच्या वेदनांना, तिच्या स्वप्नांना काहीही अर्थ उरत नाही. अशीच मानसिकता हिंदुस्थानातील पुरुषप्रधान संस्कृतीत कायमची ठाण मांडून बसली आहे.

‘इंग्लिश विंग्लिश’च्या नायिकेला जेव्हा जगण्याचं भान येतं की, मला जगायला हवं, शिकायला हवं, तेव्हा शिक्षणाचे पंख तिला आकाशात उंच, तिच्या स्वप्नांच्या राज्यात घेऊन जातात, पण त्यासाठी ती जागी झाली पाहिजे. आपल्या अस्मितेसह, अस्तित्वासह! स्त्राr एकदा घराबाहेर पडली की, तिला मदत करणारे अनेक जण भेटतात, पण त्यासाठी तिने तिच्या कोषातून बाहेर पडून एकटीने प्रवास करणे, बँकेचे व्यवहार करणे, सरकारी कार्यालयात जाऊन माहिती करून घेणे, रेशन ऑफिसमध्ये जाणे, शॉपिंग मॉल, सिनेमा, महिला मंडळ, पालक सभेत गेले पाहिजे. पतीशिवाय जगण्याची थोडी तरी सवय करून घेतली पाहिजे. पूर्णत त्याच्यावर अवलंबून राहू नकोस हे आत्मभान आजच्या अनेक स्त्रियांना देणारा ‘इंग्लिश विंग्लिश’ आहे.

चित्रपटातील नायिका इंग्रजी भाषा शिकण्यासाठी घराबाहेर पडते म्हणजे ओळख केवळ इंग्रजीनेच होते असं नाही, तर लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने, एका विशिष्ट वयात त्याचा घेतलेला धांडोळा, तिच्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त करून देतो. तुमचे प्रयत्न, तुमचे प्रश्न, तुमचा श्वास या सगळ्यांचं एक सुंदर जीवन गीत तयार होतं. आत्मविश्वासाने जगण्यात खरा आनंद आहे हे पटायला लागतं. नवे मित्र, नवे विचार, नव्या संकल्पना, नवे आकाश, नवे क्षितिज, खुणावू लागतं. नायिकेच्या मनात निर्माण झालेली शिकण्याची इच्छा हा खरा जगण्याचा मार्ग असतो. श्रीदेवी प्रत्येक गोष्ट आपल्या अभिनयातून सिद्ध करत जाते, पण हे सगळं दाखवण्यासाठी चित्रपट हिंदुस्थानात नाही, तर अमेरिकेत घडावा लागतो. अमेरिकेच्या स्वतंत्र विचारांना जगण्याची पूर्ण संधी देणाऱया भूमीमध्ये तिच्या मनात स्वातंत्र्याचे वारे वाहतात हा या पटकथेचा बेस लक्षात घ्यायला हवा.

हिंदुस्थानी सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर तयार केलेला चित्रपट म्हणजे ‘मृत्युदंड’! ग्रामीण भागात अजूनही रूढीप्रियता आणि रूढीपूजा करणारी मानसिकता असणारा पुरुष वर्ग जगत आहे. स्त्राrला पायाच्या दासीचे स्थान देणारा पुरुष वर्ग. आपल्या अहंकारात त्या गावातील लोकांना लोकशाहीचं वारे नको आहे. आपल्या या देशाला रूढीप्रियतेचा मोठा शाप आहे. गावातील व्यक्तीशी विवाह करणाऱया एका सुशिक्षित मुलीला विवाहाच्या पहिल्याच रात्री समाधानाचे, आनंदाचे सुख लाभू न देता घरातील कलह पाहायला मिळतो आणि तिच्या लक्षात येतं की, आपल्या समोर काय वाढून ठेवलं आहे? त्या गावात विधवेला जर दिवस गेले तर तिला मृत्युदंड देणारा गाव तिच्या दिवस जाण्याला कोण जबाबदार आहे याचा शोधही घेत नाही. मृत्युदंडाची सजा देताना मात्र ‘जय भवानी’ असा देवीचा जयघोष करून समोर असलेल्या त्या देवीरूपी महिलेला मात्र पायाची दासी समजतो. ही मानसिकता दुर्गा होऊन संपवायची आहे, ही मानसिकता काली होऊन संपवायची आहे. म्हणून नवरात्र उत्सव हा अशा स्त्राrच्या जागराचा उत्सव व्हायला हवा. परिस्थिती कशीही असली आणि ती कोणत्याही क्षेत्रात असली तरी काही स्त्रिया आपल्या जीवनाला लागलेल्या पुरुषी अहंकाराच्या ग्रहणाला स्वयंप्रकाशाने झाकोळून टाकतात. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश इतिहासाला त्यांच्या नावाची, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावतो.

‘डर्टी पिक्चर’ हा सर्वपरिचित सत्यकथेवर आधारित आहे. मुख्य नायिकेच्या मागे नाचणाऱया, गर्दीत हरवून जाणाऱया एक सामान्य आर्टिस्ट सिल्क स्मितावर आहे, जिने स्वतचं अस्तित्व उभं केलं. टॉलीवूडमधल्या पुरुषी वर्चस्वामध्ये स्वतच्या नावाचा, कर्तृत्वाचा, प्रतिभेचा, अस्तित्वाचा आणि सौंदर्याचा असा काही दबदबा निर्माण केला की, भविष्यात तिच्यावर चित्रपट निर्माण झाला आणि तो तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक चालला हेसुद्धा सिल्क स्मिताच्या जीवनाचं यश म्हणावं लागेल.
जर स्त्राrने ठरवलं, जर तिला दिशा सापडली, जर तिला तिचं स्वप्न कळलं तर ती कोणत्याही परिस्थितीत तिथपर्यंत पोहोचू शकते. तेव्हा तिला कोणीही अडवू शकत नाही. कुटुंबाला सावरताना, मुलांना पंख देताना, मुठीतल्या स्वप्नांना कर्तव्याचे डंख देताना ती जणू स्वतला सांगते की, थांबू नकोस. संधी शोधत रहा. तुझी स्वप्नं येतील कवेत. समस्या तर सावित्रीलाही होत्या, फक्त इच्छेला जिद्दीचे पंख हवेत.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)