प्रबोधनकार : सामाजिक जागृतीचे दीपगृह

>> प्रा.डॉ. आनंद पाटील ,  [email protected]

प्रबोधनकार हे राजर्षी शाहू महाराजांचे खरे पाईक होते. प्रबोधनकार महर्षी शिंद्यांच्या प्रमाणे गोरगरीबांमध्ये राहून नवी अस्मिता घडवत होते. तो त्यांचा खरा पुरुषार्थी क्षात्रधर्म होता. निर्भयता हा त्यांचा सद्गुण होता. आजच्या जातीय प्रदूषणाच्या काळात प्रबोधनकारांची खरी गरज आहे. कारण प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण जीवन म्हणजे सामाजिक जागृतीचे दीपगृहच आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याचे तीन खंड भेट दिले. ते चाळताना माझ्यातील इंग्रजीच्या तुलनाकार प्राध्यापकाचेच आगळेवेगळे प्रबोधन होऊ लागले. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा व शिका’ योजनेत आरक्षणाविना शिकलो. त्यामुळे केशव सीताराम ठाकरे, कर्मवीर, विचारे गुरुजी वगैरे सत्यशोधकांची थोडीबहुत माहिती होती. श्रीराम उंदेकरांच्या सत्यशोधकी साहित्याच्या तीन खंडी इतिहासाच्या प्रकल्पात माझा खारीचा वाटा होता. युरोपातील प्रबोधन म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचे जनकल्याणासाठी पुनरुज्जीवन आणि धर्मसुधारणा अशा त्या जुळय़ा चळवळी होत्या. त्याला Renaissance of Wonder आश्चर्यकारक परिवर्तन बदल उन्नयन प्रबोधन असे म्हटले गेले. तसे बदल भारतात वैदिक व इस्लामी औ ब्रिटिश अशा दुहेरी गुलामगिरीमुळे घडले नव्हते. हे आज पोर्तुगालमधील अनिवासी भारतीय इतिहासकार संजय सुबह्मण्यम यांनी विश्वसंलग्न इतिहासाचे तीन इंग्रजी ग्रंथ लिहून सिद्ध केले आहेत. मात्र याआधी शंभर वर्षांपूर्वी प्रबोधनकारांनी असेच प्रश्न उपस्थित केल्याचे पाहून मी थक्क झालो. हा सुब्रह्मण्यम भारताबाहेर आहे. जगातील सर्व श्रेष्ठ इतिहासकाराचा पुरस्कार त्याला परवाच मिळाला आहे.

प्रबोधनकारांनी स्वतःला विश्व इतिहासाशी जोडून घेतले होते. प्रबोधनासाठी इंग्रजीत enlightenment म्हणजे ज्ञानातून सामाजिक उद्बोधन असाही व्यापक अर्थ आहे. हेच कार्य कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख वगैरे कर्मयोगी करीत होते. कर्मवीरांच्या छोटय़ा चरित्रलेखाच्या शीर्षकात ‘सत्यशोधक’ हे विशेषण आहे. कर्मवीर अण्णांवरील असा लेख मी कधीच वाचला नव्हता. गोरगरीब दलितांसाठी ते साताऱयात राहत होते तेव्हा कुपरच्या कारखान्यात शेतीची अवजारे विकायची नोकरी करीत होते. कारखान्याच्या फंडातून वसतिगृहाला देणगी द्यायची सूचना त्यांनी एकदा केली. ती फेटाळताना राजीनामा देऊन समाजसेवा करा, असा फटका कुपरांनी लगावला. त्याक्षणी या क्षत्रियाने राजीनामा दिला.

प्रबोधनकार हे राजर्षी शाहू महाराजांचे खरे पाईक होते. शाहू महाराज त्यांना प्रेमाने ‘कोदंड’ म्हणायचे. ‘कोदंडाचा टणत्कार’ हे प्रबोधनकारांचे गाजलेले पुस्तक आहे.प्रबोधनकार ठाकरे यांनी शेजवलकरांच्या प्रमाणेच मराठीत चिकित्सक इतिहास नाही असे दाखवून दिले. शेजवलकरांनी तर मराठय़ांच्या इतिहासातील विषवृक्षाकडे बोट दाखवत स्वजातीचा बहिष्कार स्वीकारला. प्रबोधनकार महर्षी शिंद्यांच्या प्रमाणे गोरगरीबांमध्ये राहून नवी अस्मिता घडवत होते. तो त्यांचा खरा पुरुषार्थी क्षात्रधर्म होता. निर्भयता हा त्यांचा सद्गुण होता. शाहू महाराजांचे अनुदान स्वीकारून मिंधेपणा येईल म्हणून ते नाकारणारे प्रबोधनाचे ते सच्चे पाईक होते. पैसे मोजून प्रतिमा रचणाऱया भित्र्या ‘नपुंसक बुद्धिमंतांच्या’ भारतात अशी नितळ, स्वच्छ समाजसेवी माणसं होती. प्रबोधनकारांचे लेखन वाचताना हे सहज लक्षात येते. 1925 साली जन्मलेल्या अशाच एका गरीब शेतकऱयाच्या पोरानं इंग्लंडमधील प्रस्थापित विद्वानांना डोक्यावर उभं केलं होतं. शब्दांची छाननी करीत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शब्दकोशातील शब्दाचे अर्थ बदलायला भाग पाडलं होतं. ‘संस्कृती’ हे कल्चर या शब्दाचं विरूपित भाषांतर आहे. हे वेल्शमधील पॉण्डी नावाच्या खेडूत पण पेंब्रिजमधील इंग्रजी विभागातील प्रा. रेमण्ड विल्यम्सचा कल्चर-कृष्टी (बंगाली) या शब्दाचा शब्दकोश व त्यावरची बारा पुस्तके वाचल्यास लक्षात येईल.

बॅरिस्टर एस.सी. मुकर्जींच्या द डिक्लाईन अॅण्ड फॉल ऑफ हिंदूज (1919)चा मराठी अनुवाद प्रबोधनकारांनी फार मोठय़ा धाडसाने केला. पुरोहित वर्गातील हा बॅरिस्टर विलायतेत शिक्षण मिळाल्यामुळे पुरुषार्थी सेंद्रीय बुद्धिमंत होता. त्याचा पहिला परिच्छेद वाचतानाच सामान्य वाचकाचा माथा पेटेल. भारतीय समाज व धर्मावरील पुस्तकात 1945 साली जर्मन समाज शास्त्र्ाज्ञ मॅक्सम्युल्लरने निष्कर्ष नोंदवला होता. भारतात काही गोष्टी बऱया आहेत. बुद्धीचा (reason) दुष्काळ मोठा आहे. त्याआधी सोळा वर्षे मुकर्जींनी म्हटले होते – ‘‘ब्राह्मणांनी वेद उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ, पुराणे वगैरे रचून अखंड भारताला नपुंसक केले. या नपुंसक बुद्धिमंतांनीच मुसलमानांना आक्रमण करायचे निमंत्रण दिले.’’ या भाषांतराच्या शेजारी चार्ल्स गिबन्सचे The History of decline and Fall of Roman Empite त्या काळच्या अभ्यासक्रमात मांडायला उपलब्ध होते. याच काळातील न्या. रानडय़ांचे The Rise of Maratha Power अवतरले. सयाजीराव गायकवाड यांचे गिबन्सच्या पुस्तकाची चिकित्सा करणारे तसेच चिमाणाबाई महाराणीचे भारतीय स्त्र्ाया ही इंग्रजी पुस्तके शाहू राजांच्या स्नेहामुळे प्रबोधनकारांनी वाचली होती. त्यांचे इंग्रजी लेख वाचून मला भारतीय साहित्याच्या जातियीकरणाचा एक सिद्धांत बळकट करावासा वाटला. अनिवासी चिनी तुलनाकार शू मेई-शीहच्या ‘साहित्याचे वांशिकीकरण’ (Racealization) या सिद्धांताचा त्याला आधार आहे. जात-धर्म द्वेष व संघर्ष कमी करायला तो आवश्यक आहे.
प्रबोधनकारांचे ‘खरा ब्राह्मण’ व इतर नाटके आजही समजून घेणे कठीण आहे. ज्या मराठी बुद्धिमतांना विलायतेचे शिक्षण मिळाले त्यातील खरे समाजसुधारक कोण आणि युरोपियन साहित्याचे दरोडेखोर कोण हे ओळखायचा ठाकरी मानदंड महत्त्वाचा आहे. आजच्या जातीय प्रदूषणाच्या काळात प्रबोधनकारांची खरी गरज आहे. कारण प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण जीवन म्हणजे सामाजिक जागृतीचे दीपगृहच आहे.
(लेखक गोवा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभागप्रमुख आहेत.)