संतदर्शन – साक्षात्कारी संत गोरोबाकाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. शरयू जाखडी

संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, चोखामेळा, बंका महार, सोयरा, जनाबाई, सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अज्ञान अंधःकाराला मागे सारत स्वधर्मसूर्याच्या प्रकाशात वाटचाल करू लागली. स्वतःचा शोध घेता घेता परधामापर्यंत पोहोचली. अशा या महान संतांपैकी एक संत म्हणजे ‘संत गोरोबाकाका’. संत गोरोबाकाका हे कुंभार होते. आपल्या व्यवसायात मातीला आकार देणाऱया या संताने स्वतःच्या जीवनालाही परमसुंदर आकार दिला.

संत ज्ञानेश्वरांनी सर्वाभूती समदृष्टी ठेवून विश्वकल्याणाचे पसायदान ‘ईश्वराकडे मागितले, उपनिषिदातील आत्मज्ञान आणि आत्मसाधना यांचा अंगीकार करून तत्त्वज्ञानाला वेगळी बैठक दिली. त्याकाळी रूढीपरंपरेच्या पगडय़ामुळे अज्ञानाने दीनदलित घटकांना अवहेलनेचे चटके सहन करावे लागत होते. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीचा करुणामयी मेघधन सर्वांना भक्तीचा अधिकार देत विशाल मानवताधर्माचे अमृतसिंचन करीत बरसू लागला. त्यामुळे अठरापगड जाती भक्तिरसाचे अमृतपान करू लागल्या. त्यातून अनेक संत उदयाला आले. पंढरपूरच्या वाळवंटात समतेचे मुक्तांगण झाले. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशा टाळगजरात भेदातीत मनाने एकरूप होऊन गाऊ नाचू लागले. चोखामेळय़ाची पत्नी सोयरा हिच्या अंतरीचा ज्ञानदीप, ‘रंग अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग!’ असा अद्वैतबोधात्मक अनुभव मांडण्याइतपत चेतवला गेला. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, चोखामेळा, बंका महार, सोयरा, जनाबाई, सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अज्ञान अंधःकाराला मागे सारत स्वधर्मसूर्याच्या प्रकाशात वाटचाल करू लागली. स्वतःच शोध घेता घेता परधामापर्यंत पोहोचली. अशा या महान संतांपैकी एक संत म्हणजे ‘संत गोरोबाकाका’. संत गोरोबाकाका हे कुंभार होते. आपल्या व्यवसायात मातीला आकार देणाऱया या संताने स्वतःच्या जीवनालाही परमसुंदर आकार दिला. प्रतिभासंपन्न महाकवी ग. दि. माडगूळकर यांनीही या यातीला आपल्या गीतातून विश्वात्मक परिमाण दिले आहे. ते म्हणतात,

फिरत्या चाकावरती देशी। मातीला आकार।
विठ्ठला तू वेडा कुंभार।।

ईश्वराच्या निर्माणक्षम सृजनात्मक शक्तीची तुलना कुशल हातांनी मातीला सुंदर आकार देणाऱया कुंभाराच्या कर्मकुशलतेशी केली आहे. इतकेच काय प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी कुंभाराला ‘प्रजापति’ नामाभिधान देऊन त्याच्या कलात्मक निर्मितीचे कौतुक केले आहे. कुंभार यातीमागे दडलेल्या या कर्मकौशल्य आणि निष्ठा इतिहासाला साजेसे असेच संत गोरोबांचे व्यक्तिमत्त्व होते. ईश्वराच्या आराधनेने चैतन्याचे आकाश त्यांनी कवेत घेतले होते. संत गोरा कुंभार हे संतमंडळीत वयाने आणि ज्ञानाने सात्विक फळांनी लगडलेल्या वृक्षासारखे परिपक्व होते. म्हणून संतमंडळीत त्यांना ‘गोरोबाकाका’ म्हणून संबोधले जायचे. गोरोबा भक्तिरसात रंगून जात तरी त्यांची रोजच्या कामावरही तेवढीच निष्ठा होती. कर्तव्ये पार पाडतानाच आपल्या कामातच भगवत प्रेमाचा रंग ते सावता माळय़ाप्रमाणे सहजदृष्टीने पाहत होते. सावता माळी सांगतात, ‘लसूण मिरची कोथिंबीरी। अवघा झाला माझा श्रीहरी।।’ व्यवसायात ईश्वराचे दर्शन घेणे हीच दृष्टी संत गोरोबाकाकांचीही होती. ते देवाला आळवतात, ‘तुझे रूप चित्ती राहो। मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास। सुखे करो काम।।’ निष्ठsच्या नामस्मरणात राहून सख्यभक्तीतून चराचरात ईश्वराला पाहण्याची ज्ञानदृष्टी गोरोबांना सहज समाधी साधावी तशी लाभली होती.

‘गोरा जुनाट पै जुना।
हाती थापटणे अनुभवाचे।।’
‘प्रेम अंगी सदा वाचे भगवंत।
प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।’

असे नामदेवांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे. अशा संताचा महिमा सांगताना संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी सोळा कळांनी चंद्र पूर्णपणे आकाशात आल्यावर सागर भक्तीने उचंबळू लागतो. त्याचप्रमाणे श्रीहरीरूप पाहताच किंवा साठवताच संतांच्या हृदयसागराला भक्ती येते. गोरोबांची वृत्ती अशाच विठ्ठलभक्तीत तल्लीन होणारी होती. तथापि त्यांच्या हाती घटाची परीक्षा करणारे अनुभवाचे थापटणे होते. त्या थापटण्याने ते संतभक्तांच्या आध्यात्मिक स्थितीचे चिकित्सक बुद्धीने परीक्षण करीत असत. एकदा ज्ञानदेव संत नामदेवांसह सर्व संतमंडळी गोरोबाकाकांच्या भेटीला गेले होते. तेव्हा सर्व संतांनी गोरोबाकाकांना त्यांच्या आध्यात्मस्थितीचे परीक्षण करण्याची विनंती केली. डोक्यावर थापटणे पडताच नामदेवांना त्याचा राग आला. कारण विठ्ठल माझ्याशी बोलतो या गोष्टीचा सूक्ष्म अहंकार नामदेवांच्या ठिकाणी होता. गोरोबांच्या हे ध्यानी येताच त्यांनी नामदेवांना ‘कच्चे मडके’ ठरवले. गोरोबा हे जाणत होते की परमार्थात सगुणांसंगे निर्गुणाची भेट होणे हे अंतिम ध्येय असते आणि ते ध्येय गुरू प्राप्त करून देतात.

बोलोनिया येणे वाढविता डांगोरा।
अंतरीचा कोरा गुरूवीण।।

गोरोबाच्या या परीक्षेने नामदेवांना प्रारंभी राग आला असला तरी सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्यात आपण कमी पडलो हे त्यांनी मनोमन ओळखले. पुढे विठ्ठलाच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचर यांना गुरू केले आणि त्यांच्या कृपेने विश्वात्मक निर्गुण निराकार ईश्वराची प्रचिती नामदेवांना दिली. त्यांच्या ठायी समदृष्टी आणि सर्व विश्वात चराचराच्या रूपाने तो ईश्वर नटला आहे. याची खात्री पटली अशारीतीने संतांची परीक्षा घेणारी परीक्षकांची भूमिका पार पाडायची तयारी गोरोबाकाकांच्या ठिकाणी होती. संत गोरोबा भक्तिप्रेम रसात कधी कधी देहभान विसरून जात. त्याबद्दल काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्यांची पत्नी संती लहान मुलाला त्यांच्याकडे सोपवून पाणी आणायला गेली असता गोरोबा नामस्मरणात दंग होऊन देहातीत अवस्थेत आळय़ातील माती तुडवीत होते. मूल रांगत आळय़ातील मातीत केव्हा आले ते गोरोबांना कळले नाही. नामस्मरणाच्या दंग अवस्थेत आळय़ातील मातीबरोबर मूलही तुडवले गेले. चिखल रक्ताने लाल झाला. संतीने आल्यावर ते दृश्य पाहून हंबरडा फोडला. आपली अक्षम्य चूक लक्षात आल्यावर या घटनेचे पर्यवसान गोरोबांच्या स्वतःचे हात गमावण्यात झाले. पुढे नामदेवांच्या कीर्तनाला ते गेले असता नामदेवांनी सर्वांना हात वर करून विठ्ठलाच्या नामाचा गजर करायला सांगितले. गोरोबांना आपल्या थिटय़ा हातांची लाज वाटली.

सर्वे हस्त करिती बरी। गोरा लाजला अंतरी।
नामा म्हणे गोरोबाची। वरती करावे हस्तांसी।
गोरा थोटा वरती करी। हस्त फुटले वरचेवरी।।
अशी अद्भुत कथा सांगितली जाते.

गोरोबाकाकांचा जन्म इ.स. 1267 मध्ये एका भगवद्भक्त घराण्यात झाला. त्यासंबंधी साक्षात्कारी कथा सांगितली जाते. गोरोबाकाकांचे चरित्र उदबोधक घटनांनी बहरलेले आहे. धाराशीव जिल्हय़ातील तेर गावी चैत्र कृष्ण 13 शके 1239 म्हणजे 20 एप्रिल 1317 रोजी त्यांनी समाधी घेतली. तिथे त्यांचे समाधी मंदिर आहे.