मुद्दा – उद्योग क्षेत्राला चालना..!

1016

>> पुरुषोत्तम आठलेकर

राज्यातील उद्योग क्षेत्रातील समस्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींबरोबर चर्चा केली. हे एक त्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. ही भूमिका स्वागतार्ह आहे. मागील दोन दशकांपासून आणि खासकरून जागतिकीकरण, आधुनिकीकरण याचे वारे वाहू लागले त्यानुसार औद्योगिक धोरणात आमूलाग्र बदल होऊ लागले. जागतिक बाजारपेठेतील वाढती स्पर्धा, शासकीय ध्येय-धोरण, पायाभूत सुविधा यामध्ये अपेक्षित बदल न झाल्याने राज्यातील अनेक उद्योग प्रकल्प राज्याबाहेर गेले, तर काही बंद झाले. त्यामुळे राज्यातील महासुलावर परिणाम तर झालाच, पण बेरोजगारीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर वाढली. मुंबई, ठाणे, बेलापूर, नाशिक, संभाजीनगर, कोकण आदी अनेक औद्योगिक पट्टय़ातील लघु, मध्यम उद्योग प्रकल्प आजारी अवस्थेत आहेत. मागील काही वर्षांत जे प्रकल्प आले त्याची आकडेवारी ही केवळ कागदोपत्रीच आहे. उद्योगपतींच्या मते काही धाडसी निर्णयाची आवश्यकता असून तंत्रज्ञान व आधुनिकीकरण यावर जास्त भर देण्याची गरज आहे. हे जरी बरोबर असले तरी त्याचबरोबरीने कामाच्या पदांची संख्यासुद्धा वाढली गेली पाहिजे नाहीतर पुन्हा बेरोजगारीचा प्रश्न उभा राहील. मागील काही वर्षांचा अनुभव व वास्तविकता पाहता केवळ आयटी हब व सेवा क्षेत्रे मोठय़ा प्रमाणावर विस्तारली गेली, पण औद्योगिक पट्टय़ातील जमिनी विकून तेथे मोठमोठे गृहसंकुल साकारले गेले, पण कुठेही एखादा कारखाना उभा राहिला हे पाहण्यात नाही. राज्याची प्रगती ही तेथे असणाऱया उद्योग व रोजगारावर अवलंबून असते. योग्य त्या आर्थिक निकषावर कर सवलत व योग्य त्या पायाभूत सुविधा उद्योगांना मिळाल्या तर राज्यात उद्योग क्षेत्राला चालना मिळून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, राज्याची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल. या दृष्टिकोनातून शासनाने उचललेले हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे.

आपली प्रतिक्रिया द्या