
मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या काही आठवणींना उजाळा देत आहे अभिनेता अंशुमन विचारे…
माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत आणि त्यातून मला खूप काही शिकता आले. यातली एक घटना बरीच जुनी आहे. त्या वेळी माझा या क्षेत्रातला स्ट्रगलिंग पिरियड सुरू होता. आमचे एक नाटक चालू होते. नाटकाचे नाव सांगणार नाही, पण त्या नाटकाला बरेच अवॉर्ड मिळाले होते. या नाटकातल्या मुख्य पात्रासाठी रिप्लेसमेंट सुरू होती. ती व्यक्ती काही कारणांमुळे नाटक करणार नव्हती. मग त्या नाटकाच्या मंडळींनी त्या भूमिकेसाठी मला विचारले. माझ्या रिहर्सल्ससुद्धा करून घेण्यात आल्या. त्यानंतर मी या नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्याला जाऊन पोहोचलो. तिथे गेल्यावर नाटकातला तो मूळ कलाकार त्या ठिकाणी आल्याचे मला समजले. मला आश्चर्य वाटले. मी त्या नाटकाच्या मंडळींना त्याबाबत विचारले. तेव्हा मला त्यांच्याकडून सांगण्यात आले, ‘‘त्या कलाकाराच्या नावाने नाटकाचे बुकिंग झालेले आहे, तर तुम्ही हा प्रयोग करू नका.’’ स्ट्रगलर अॅक्टरला कोणकोणत्या प्रकारचे त्रास असतात हे एका स्ट्रगलर अॅक्टरलाच समजू शकते. हे सगळे घडल्यावर पुण्याच्या बालगंधर्व नाटय़गृहाच्या मागे मी एकटा रडत बसलो. या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. मी काहीही न बोलता तिथून निघून आलो, पण प्रत्येक गोष्टीला एक कारण असत यावर माझा विश्वास आहे. त्या घटनेनंतर महिन्याभराने त्याच लोकांनी मला पह्न केला. पुन्हा एकदा त्या नाटकातल्या त्या मूळ कलाकाराचा काही प्रॉब्लेम झाला होता. नाटकाच्या त्या मंडळींनी मला सांगितले, ‘‘त्या कलाकाराची काहीतरी अडचण आहे आणि या नाटकाचे पाच-सहा कॉन्ट्रक्ट शो लागलेले आहेत.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘तो कलाकार प्रयोगासाठी जितकी नाईट घेतो, त्यापेक्षा शंभर रुपये मी जास्त घेईन. हे शक्य असेल तरच मी प्रयोग करीन.’’ त्या मंडळींनी ते मान्य केले व मला प्रयोग करायला दिले. आता ही घटना चांगली आहे, दुःखदायक आहे, की अजून काही, मला कल्पना नाही. पण असे घडले खरे…!
दुसरी एक घटना आहे, ती ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम मी करत होतो त्या वेळची. त्या कार्यक्रमातले आमचे एक स्किट पाहून खेडच्या आमच्या एका चाहत्याने आमचा नंबर मिळवून आम्हाला पह्न केला. त्यांची आई पाच वर्षे अंथरुणाला खिळून होती. बिछान्यातून ती कधी हलली नव्हती, पण कार्यक्रमातले आमचे ते स्किट बघून ती खूप हसली. तिला खूप आनंद झाला होता, असे त्यांनी आम्हाला सांगितले. हे सर्व ऐकून आमच्या अंगावर काटाच आला. आम्ही त्यांना भेटायला गेलो, पण मधल्या काळात त्यांचे निधन झाले होते. मात्र यामुळे एक गोष्ट आम्हाला कळली की, एक कलावंत म्हणून आपण आपले काम किती जबाबदारीने करायला हवे. अशीच एक घटना आहे तिला दुःखद म्हणता येणार नाही, पण एखादी घटना सल लावून जाते तशा प्रकारची ती आहे. मला जेव्हा व्यावसायिक नाटकासाठी पहिले पारितोषिक मिळाले, तेव्हा माझ्यासोबत माझी आई नव्हती. मला असे राहून राहून वाटत होते की, माझ्या करीअरचा ग्राफ आणि ते पारितोषिक मिळताना तिने बघितले असते तर तिला खूप आनंद झाला असता. असो…! आता माझ्या मुलीच्या रूपात मी आईला पाहतो, त्यामुळे मला समाधान वाटते.
कलाकार म्हणून आम्हाला बरेच लोक भेटतात. काही लोक काही गोष्टी समजावून सांगतात, तर काही लोक बरेच काही शिकवून जातात. अशी खूप माणसे आयुष्यात आली, पण मी समाधानी आहे. मला असे वाटते की, सध्या जे काही माझ्या आयुष्यात चालले आहे ते दत्तगुरूंच्या आणि आमच्या कुलदेवतेच्या कृपेने चालले आहे. माझी प्रगती छान सुरू आहे. आयुष्यात वेगवेगळे असे अनेक प्रसंग येत राहतील आणि त्यातून मी नवनवीन गोष्टी शिकत जाईन. माणूस म्हणून मी कायम जमिनीवर राहिलो, तर मी जीवनात बरेच काही साध्य केले असे मला माझ्या आयुष्याकडे पाहताना वाटेल.
शब्दांकन : राज चिंचणकर

























































