रंगपट – चालत राहणे हेच आयुष्याचे ध्येय…!

>> शब्दांकन – राज चिंचणकर

जीवनात पदोपदी घडलेल्या विविध बदलांचा मागोवा घेत आहे पार्श्वगायिका नेहा राजपाल…

माझा वैयक्तिक प्रवास, तसेच माझ्या करीअरची दिशा बदलणारे बरेच प्रसंग माझ्या आयुष्यात आले. पहिल्यांदा माझे ध्येय होते, ते म्हणजे हिंदी ‘सारेगमप’ ही स्पर्धा जिंकणे. त्यावेळी मी मेडिकलचे शिक्षण घेत होते. पासआऊट होतानाच मी ‘सारेगमप’ स्पर्धा जिंकले, पण तिथून माझ्या आयुष्याचा प्रवास, करीअरच्या दृष्टिकोनातून, मेडिसिनपासून दूर होऊन थेट गाण्याकडे वळला. तो एक मोठा माइलस्टोन होता, ज्यामुळे माझ्या करीअरची संपूर्ण वाट बदलली. तिथून गायनाच्या क्षेत्रात माझी जी सुरुवात झाली, ती आतापर्यंत सुरू आहे. ‘सारेगमप’ जिंकण्यापूर्वी, म्हणजे मेडिसिनच्या पहिल्या वर्षी मी हिंदी ‘सारेगमप’मध्ये सहभागी झाले होते, पण त्या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये मी हरले होते. त्यामुळे एक अपयश पचवून झाल्यावर, यश मिळणे म्हणजे काय असते ते मला तेव्हा कळले आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही.

दुसरी एक महत्त्वाची घटना माझ्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे जेव्हा मी आई झाले. मला मुलगी झाली, तेव्हा मी 24 वर्षांची होते. वास्तविक, एक डॉक्टर म्हणून मी अनेक डिलिव्हरी पाहिल्या होत्या आणि केल्याही होत्या, पण जेव्हा मला स्वतःला ते फिलिंग अनुभवता येत होते ते क्षण काही औरच होते. आलिया, म्हणजे माझी मुलगी जेव्हा माझ्या कुशीत आली, तेव्हाचे फिलिंग शब्दांत सांगता येणार नाही. आलियाची स्माइल पाहूनच मला इतकी ऊर्जा मिळाली की, बाकीचे सर्व काही मी विसरून गेले. ‘अनकंडिशनल लव’ काय असते आणि आपले आई-बाबा आपल्यावर किती प्रेम करू शकतात याची जाणीव होण्यासारखा तो ‘टर्निंग पॉइंट’ होता. एक ‘वर्किंग वुमन’ आणि ‘एक वर्किंग मदर’ यांना एकत्र आणणारी ती घटना होती.

अजून एक प्रसंग मला आठवतो, ज्याने माझे आयुष्य बदलले आणि तो म्हणजे जेव्हा मला पार्श्वगायनासाठी पहिला पुरस्कार मिळाला तो! ‘सारेगमप’ जिंकणे म्हणजे दुसऱयांची गाणी गाऊन एक रिऍलिटी शो जिंकणे होते, पण जेव्हा तुम्हाला तुमच्या ओरिजनल गाण्यासाठी पुरस्कार मिळतो, तेव्हा त्याने एक खात्री पटते की, या करीअरमध्ये तुमचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. अनेक पुरस्कार मला मिळाले, पण 2008 या वर्षी मला पहिला जो पुरस्कार मिळाला तो ‘झी गौरव’चा होता आणि त्याने माझे आयुष्य बदलून गेले.

एक घटना तर अगदी अलीकडची आहे. माझा गाण्यांचा प्रवास खूप छान चालला होता. मला वाटले होते की, मी मेडिसिनकडे कदाचित पुन्हा कधीच वळू शकणार नाही. आलियासुद्धा आता पदवीधर होण्याच्या मार्गावर आहे. तिचे स्वतःचे आयुष्य आता सुरू होतेय. माझ्या हाती थोडा वेळ आहे हे जेव्हा मला कळले, अगदी तेव्हा एक संधी माझ्या आयुष्यात आली आणि ती होती मेडिसिनशी संबंधित! एका कंपनीत मी ‘अंडररायटर मेडिकल कन्सल्टंट’ म्हणून रुजू झाले. मोठमोठय़ा इन्शुरन्स कंपनींसाठी ते मेडिकल कन्सल्टिंग करतात. ही संधी माझ्याकडे अगदी सहा महिन्यांपूर्वीच चालून आली आणि मी म्हटले की, आपल्याकडे वेळ आहे, तर ही संधी स्वीकारावी. डॉक्टर होण्यासाठी साडेपाच वर्षे मी जो अभ्यास केला तो आता आयुष्याच्या या वळणावर सार्थकी लागतोय. पुन्हा एक नवीन करीअर सुरू झाले आहे. गाणे तर त्याबरोबर सुरूच आहे.
आता याहून मोठा असा माइलस्टोन माझ्या आयुष्यात अजून येणार आहे की नाही ते सांगता येत नाही, पण सध्या माझे मल्टिटास्किंग करीअर सुरू आहे. माझ्या आयुष्यातले हे काही प्रसंग माझ्या मनात कोरले गेले आहेत. कदाचित कुणाला त्यातून प्रेरणाही मिळू शकेल. मला एक माहीत आहे की, ‘रुकना मना है, चलते जाना है’ हे आयुष्याचे ध्येय असले पाहिजे. जे तुमच्या हाती येईल ते स्वीकारत तुम्ही पुढे चालायला हवे, ही शिकवण माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातून मी घेतली आहे.