केरळमध्ये आता नवे संकट

129

>> राजेंद्र पा. केरकर

केरळमध्ये गांडूळ मरण्याची घटना वरवर गौण वाटत असली तरी ती वर्तमान आणि आगामी कालखंडात येऊ घातलेल्या पर्यावरणीय बदलांची नांदीच आहे. केरळमधील गांडुळांचा मृत्यू, काही ठिकाणी अचानक आटलेले जलस्रोत, पिण्याच्या पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, सुपीक जमिनीत वाढणारी क्षारता ही येऊ घातलेली अनेक पर्यावरणीय संकटे आहेत. हवामान बदलाच्या या संकटाला तोंड देण्याची नियोजनबद्ध सिद्धता ठेवली नाही तर भविष्यात उद्भवणारी मनुष्यहानी, मालमत्तेची हानी टाळणे असंभव होईल.

ऑगस्टमध्ये धुवांधार कोसळलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे गेल्या शतकभरात न उद्भवलेली जीवित आणि मालमत्तेची हानी केरळ राज्याला सोसावी लागली. नैसर्गिक प्रकोप आणि मानवी समाजाकडून घडलेल्या चुकांची कटू फळे इथल्या सर्वसामान्यांना चाखण्याची वेळ आली. केरळच्या सर्व चौदा जिल्हय़ांत इतका मुसळधार पाऊस कोसळला की वायनाड, कन्नूर, कोझिकोडे, मलाप्पूरम, इडुक्की आणि पाथानामथिट्टा आदी जिल्हय़ांतल्या भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या प्रकारांनी पूरग्रस्तांना मदत करण्यापासून हिरावून घेतले. केरळ राज्यात पुराच्या दुर्घटना तशा नवख्या नाहीत, परंतु या वेळी उद्भवलेल्या महापुराचा तडाखा केरळातल्या 1564 गावांपैकी 774 गावांना बसला तो 54 लाख लाकांवरती दुष्परिणाम करून. केरळमधल्या अरबी सागराशी एकरूप होणाऱया 41 नद्यांना महापूर आला. मान्सूनची पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याच्या केवळ दोन महिन्यांत केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच्या सर्व 82 धरणांचे जलाशय तुडुंब भरल्याने अतिरिक्त पाणी सोडण्यावाचून अन्य पर्याय शिल्लक राहिले नाहीत. केरळमध्ये महापुरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. तेथे राष्ट्रीय लोकसंख्या घनतेच्या 382च्या सरासरीच्या तुलनेत केरळमध्ये ही घनता 860 आहे. केरळमधील 10 टक्क्यांपेक्षा जादा जमीन समुद्रपातळीच्या खाली आहे आणि 41 नद्या अरबी सागरात एकरूप होणाऱया आहेत. केरळमध्ये जी 80 धरणे आहेत त्यांचे स्वतंत्र जलसंचय क्षेत्र आहे आणि त्यामुळे केरळातली महापुरामुळे उद्भवलेली परिस्थिती भयानक झाली.

1941 साली केरळमध्ये आलेल्या महापुराने असाच हाहाकार माजवला होता. परंतु त्या नैसर्गिक आपत्तीतून बोध घेण्याऐवजी इथल्या लोकांनी नदीच्या पूरनियंत्रक क्षेत्रात, नदीच्या किनारी घरे, हॉटेल्स, कारखाने आणि अन्य औद्योगिक आस्थापने उभारण्यावर भर दिला. जेव्हा धरणांचे जलाशय पाण्याने तुडुंब भरले जातात, तेव्हा त्यांच्यातले पाणी सोडले नाही तर धरणाच्या वरच्या भागात राहणाऱया लोकांना महापुराच्या समस्यांना सामोरे जाण्याची पाळी येते. धरणांचे बांधकाम पूर्णत्वास गेल्यावरती आपणाला वाटते की, नदीच्या पुरावरती नियंत्रण प्रस्थापित होईल, परंतु धरणामुळे महापुराची समस्या जटील झाल्याची प्रकरणे जास्त आहेत. नदी पावसाळय़ात प्रचंड पाण्याचा साठा घेऊन वाहत असल्याने तिच्या पूरनियंत्रक क्षेत्रांत अतिक्रमणे झाली तर त्याचे दुष्परिणाम लोकांना भोगण्यासाठी तत्पर राहावे लागते. शास्त्रज्ञांच्या मते केरळ आणि कर्नाटकातील कोडगु येथे जी अती पर्जन्यवृष्टी झाली त्याला वैश्विक तापमानवाढ कारणीभूत आहे, परंतु निसर्गाच्या एकंदर चक्रात मानवी समाजाने वारंवार जो हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळे येथील लोकांना महापुरापायी प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. केरळमध्ये बेकायदेशीररीत्या मोठय़ा प्रमाणात दगडी खाणी फोफावल्या आणि त्याचे दुष्परिणाम या परिसरातल्या नदी-नाल्यांवर झाले. दगडी खाणी, खनिज उत्खननाचे प्रकल्प, जंगलतोड, नैसर्गिक जंगलांच्या बदल्यात सामाजिक वनीकरणाद्वारे एकाच विदेशी प्रजातीच्या वृक्षारोपणावरती भर दिली जात असल्याने महापुराला सामोरे जाताना केरळचे अक्षरशः कंबरडे मोडले. केरळमध्ये पाणथळ क्षेत्र संवर्धन कायदा, शेतजमीन संवर्धन कायदा असताना इथे बेसुमारपणे चालत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवणे सरकारी यंत्रणेने हेतूपुरस्सर टाळले.

या महापुराच्या आपत्तीनंतर परिस्थिती सांभाळण्यासाठी केरळ सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र आता या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या इडुक्की, वायनाड या जिल्हय़ांतील बऱयाच गावांत मोठय़ा प्रमाणात गांडूळ मरत असल्याचे आढळून आलेले आहे. शेतजमिनीची सुपिकता वृद्धिंगत करण्यात गांडूळ महत्त्वाचे योगदान करीत असल्याने त्यांना हिंदुस्थानी लोकमानसाने कृषकमित्र मानलेले आहे. मात्र महापुरानंतर केरळमधल्या असंख्य पारंपरिक जलस्रोतांवर दुष्परिणाम झालेला दिसून येत आहे. ज्या ठिकाणी नैसर्गिक जंगले सुरक्षित आहेत, तेथील पालापाचोळय़ांचा निचरा करण्याबरोबर गांडूळ जमिनीचा कस वाढवत असतात. सध्या केरळमध्ये गांडुळांचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे गांडुळांना तग धरणे प्रतिकूल झालेले आहे आणि त्यामुळे असंख्य गांडुळे मृत्युमुखी पडत आहेत. साहजिकच येथील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. केरळमधील सरकारांनी विकासाच्या ज्या ‘मॉडेल’चे अनुकरण केले त्यामुळेच इथे पर्यावरण आणि परिसंस्थेचा ऱहास मोठय़ा प्रमाणात झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून केरळातल्या शेतकऱयांनी आपल्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन नगदी पिकांच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. डोंगर उतारावरील नैसर्गिक जंगलाचे आच्छादन उद्ध्वस्त करून चहा, कॉफीचे मळे, पर्यावरणीय पर्यटनाचे प्रकल्प, खाण व्यवसायाला प्राधान्य दिलेले आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, जंतूनाशके, बुरशी नाशके यांच्या वारेमाप वापरामुळे निसर्गाची साखळी अव्याहतपणे चालू राहावी म्हणून महत्त्वाचे कार्य बजावणाऱया गांडूळ, देवगांडूळ आणि अन्य वन्यजिवांच्या अस्तित्वावर आणि अधिवासावर संकट निर्माण झालेली आहेत. केरळमध्ये सध्या गांडूळ मरण्याच्या प्रकरणांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत असून अशाच प्रकारची गांडूळ मरण्याचे प्रकरण 2016 साली वायनाडमध्ये उघडकीस आले होते. त्या वेळी जमिनीतील तापमानात झालेले वाढ गांडूळांच्या मृत्यूस कारण ठरली होती. 15 ते 28 डिग्री सेल्सियस तापमान सोसण्याची क्षमता गांडुळात असून 22 पासून तापमान 29.04 डिग्री सेल्सियस झाल्याने त्याचा दुष्परिणाम गांडुळांवर झाला.

(लेखक पर्यावरणप्रेमी आहेत.)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या