निसर्गरम्य कोकण…मुंबईलगतचे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

मुंबईकरांना एक दोन दिवसांच्या पर्यटनांसाठी अनेकदा माथेरान, महाबळेश्वर किंवा अलिबाग, किहीमचा समुद्रकिनारा गाठावा लागतो, पण आता मुंबईपासून अगदी दीड- दोन तासांवर पालघर जिह्यातल्या केळवे-माहीमपासून अगदी पुढे बोर्डीपर्यंतच्या किनारपट्टीवरील नवीन पर्यटनस्थळांचा पर्याय निर्माण होऊ लागला आहे, पण राज्याच्या पर्यटन विभागाकडून या भागातील पर्यटनवाढीला अजूनही चालना मिळत नाही. पर्यटन विभागाने आर्थिक मदतीपासून सर्व प्रकारची मदत केल्यास मुंबईजवळची ही सुमारे 80 किमीपर्यंतची नितांत सुंदर किनारपट्टी जगाच्या नकाशावर येण्यास वेळ लागणार नाही..

समुद्रकिनारे लाभलेल्या जगातल्या अनेक देशांमध्ये पर्यटन मोठय़ा प्रमाणावर विकसित झाले आहे. महाराष्ट्राला सुमारे साडेसातशे किमी लांबीचा नितांत सुंदर समुद्रकिनारा लाभूनही समुद्रकिनाऱ्य़ांवरील पर्यटन तेवढे विकसित झाले नाही. कोकणच्या समुद्रकिनाऱ्य़ांवर पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण मुंबईपासून दीडदोन तासांवर असलेल्या पालघर जिह्यातील समुद्रकिनाऱ्य़ांवर वसलेल्या गावातील पर्यटनाकडे लक्ष दिलेले नाही. या भागाला केळवे, माहीम, उसरणी, दातिवरे, कोरे, नांदगाव, शिरगाव, वाढवण, अक्करपट्टी, सातपाटी, बोर्डी गावांना अतिशय सुंदर व सुरक्षित समुद्रकिनारा लाभला आहे. झाईसारखी सुंदर खाडी आहे. गेल्या काही वर्षांत या भागातील, खासकरून केळवे व माहीममधील पर्यटकांची संख्या वाढली आहे, पण राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास इतर भागातील पर्यटनालाही चालना मिळेल.

समुद्रकिनाऱ्य़ावरील शीतलादेवीचे मंदिर, समुद्रकिनाऱ्य़ावर पाच किमीपर्यंत पसरलेल्य़ा सुरुच्या झाडांचे वन यामुळे या गावाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून झपाटय़ाने विकास सुरू झाला. मुख्य म्हणजे रस्तेमार्गाने मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर केळवे रोड स्टेशन आहे. आता तर पालघरपर्यंत लोकल ट्रेन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतून दोन ते अडीच तासांत केळवे- माहीमचा समुद्रकिनारा गाठता येतो. अतिशय कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचण्यासारखे हे पर्यटनस्थळ असल्यामुळे दर शनिवार-रविवारी केळव्याचा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जातो.

माहीम समुद्रकिनाराही सुंदर आहे, पण गेल्या काही वर्षांत केळव्याच्या समुद्रकिनाऱ्य़ाकडे पर्यटकांची पावले जास्त वळल्यामुळे माहीमचा किनारा विकसित झाला नाही. वास्तविक या संपूर्ण भागात वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन विकसित होऊ शकेल. उदाहरणार्थ व्हिलेज टुरिझम म्हणजे मामाकडच्या गावासारखे पर्यटन, समुद्रकिनाऱ्य़ावर वॉटर स्पोर्टस्, सह्याद्रीच्या डोंगररांगा असल्यामुळे ट्रेकिंग किंवा जंगल ट्रेक करता येईल. समुद्रकिनारा असूनही या भागात वॅाटर स्पोर्टस् विकसित झालेले नाही. समुद्रात वॉटर स्पोर्टस् सुरू केले तर मासे दूर पळतील. किनाऱ्य़ापासून दूर जाऊन मासेमारी करावी लागेल या कल्पनेतून मच्छीमार बांधवांनी वॉटर स्पोर्टस्ला विरोध केला. या भागात वॉटर स्पोर्टस् सुरू होऊ देणार नाही असा ठराव ग्रामसभेत केला होता, पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलू लागली आहे, विरोध मावळण्यास सुरुवात झाली असून भविष्यात या भागातील किनारपट्टीवर वॉटर स्पोर्टस् सुरू होतील अशी आशा पर्यटकच व्यक्त करीत आहेत.

कोकण किनारपट्टीवर वॉटर स्पोर्टस् आहेत, पण कोकणातील समुद्रकिनाऱ्य़ावर जाण्यासाठी बारा, चौदा ते अठरा तास लागतात. अलिबागला रस्तेमार्गाने जाण्यासाठी चार-पाच तास लागतात, पण केळवे-माहीमच्या समुद्रकिनाऱ्य़ावर पोहोचण्यासाठी दोन तास पुरतात असे लक्षात आल्यामुळे गेल्या काही वर्षांत या भागातील पर्यटकांची संख्या वाढल्याने पर्यटन हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होऊ लागले. पूर्वी शेती-बागायती, पानांचे मळे, मासेमारी, मीठ उत्पादन या मुख्य व्यवसायाला कोंबडीपालन, गाई-म्हशी पालन पूरक व्यवसाय होता, पण आता शेतीत उत्पादनापेक्षा खर्च वाढल्याने शेतीबागायती अल्प फायदेशीर ठरू लागली. त्याच काळात पर्यटन व्यवसाय फोफावला आणि हाच मुख्य व्यवसाय होऊ लागला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक समविचारी व प्रतिष्ठत मंडळींनी एकत्र येऊन नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऑग्रिकल्चर ही संस्था सुरू केली.

पर्यटन, सागरी मार्गांचा विकास, शेती व फूड प्रोसेसिंगच्या(खाद्य पदार्थ प्रक्रिया) माध्यमातून ही संस्था मागील तीन वर्षांपासून या भागात काम करीत आहे. पर्यटनवाढीसाठी राज्य सरकारसोबत या संस्थेने पत्रव्यवहारही केला आहे. सरकारने मदत केलीही, पण पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता सरकारने या भागाकडे पुरसे लक्ष दिले नाही अशी चेंबरच्या पदाधिकाऱ्य़ांची भावना आहे.

या भागातील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बहुतांश हॉटेल ही मूळ स्थानिक मराठी माणसांच्या मालकीची आहेत. गावातील अनेक वाडय़ांमधील टुमदार घरांमध्ये न्याहारी निवास योजना सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होत आहे. राज्य सरकारने लक्ष दिल्यास किंवा निधी उपलब्ध करून दिल्यास या भागातील पर्यटन व्यवसायाची भरभराट होईल. त्यादृष्टीने राज्याच्या पर्यटन विभागाला योजनाही सादर केली आहे, पण पर्यटन विभागाने या भागातील पर्यटनवाढीचा विषय फारसा गांभीर्याने घेतलेला नाही. न्याहारी निवास योजनेचा फायदा घेऊन अनेकांनी घरांमध्ये खोल्या बांधून पर्यटकांना अल्प दरात राहण्याची व घरगुती पद्धतीचे अतिशय सुग्रास व पारंपरिक जेवण देण्यास सुरुवात केली आहे, पण या योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली. पाच खोल्यांचे घर असेल तरच न्याहारी निवास योजनेचा फायदा घेता येईल अशी अट आहे. पाचपेक्षा अधिक खोल्या बांधल्या तर या योजनेत सहभागी होता येत नाही, पण ग्रामस्थांच्या मते पाच खोल्या बांधून न्याहारी निवास योजना सुरू करणे व्यावसायिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यामुळे न्याहारी निवास योजनेची मर्यादा दहा ते बारा खोल्यांपर्यंत वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. त्यादृष्टीने पर्यटन विभागाकडे पाठपुरावाही सुरू आहे, पण त्याला अजून यश आलेले नाही. राज्य सरकारकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसला तरी ग्रामस्थांनी व हॉटेल व्यावसायिकांनी धीर सोडलेला नाही.

मागील दोन वर्षांपासून केळवा बीच फेस्टिव्हल आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. बोर्डीच्या समुद्रकिनाऱ्य़ावरील चिकू महोत्सवाच्या धर्तीवर केळवे बीच फेस्टिव्हल सुरू झाला आहे. आदिवासी नृत्य, पारंपरिक नृत्यांच्या जोडीला आधुनिक नृत्याच्या जोडीला पारंपरिक खाद्यपदार्थ व मांसाहारी जेवणाची जोड दिली जाते. या भागातील उकडहंडी हा प्रकार अफलातून आहे. त्यात शाकाहारी व मासांहारी असे दोन प्रकार आहेत. एका मडक्यात कोनफळ, वालपापडी, काकडी, शेंगा, मटार, गाजर व इतर भाज्या टाकल्या जातात. मडक्याचे तोंड एका विशिष्ट झाडाच्या पानांनी बंद करून ते मडके चुलीवर ठेवले जाते. वाफेवर शिजल्या जाणाऱया या उकडहंडीची चवच न्यारी लागते. मांसाहारी लोकांसाठी उकडहंडीत चिकन किंवा बोंबील टाकले जातात. हा प्रकार बोंबलाची पोतेंडी म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय चुलीवरचे मटन, भाकरी, गावठी कोंबडी, रवळीची रोटी, अळूवडी असा सरंजामही असतो. समुद्रकिनारा असल्यामुळे कोळंबीपासून सुरमई असे माशांचे असंख्य प्रकार जेवणात असतात. सातपाटीच्या पापलेटची चव जगावेगळी आहे. त्यामुळे पर्यटकांची चंगळच असते. खाद्य महोत्सव, समुद्री पर्यटन, तलाव व खाडय़ांमध्ये कोकण- केरळच्या धर्तीवर बॅकवॉटर सुरू केल्यास मुंबईजवळचे कोकण अशी नवीन संकल्पना पर्यटनाच्या नकाशावर येईल.
n [email protected]