आपला माणूस : वामनावतार!

183

>> रजनीश राणे

नाटककार वामन तावडे मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील बिनीचे शिलेदार होते. ते खरे तर एका वेगळय़ा वाटेवरील लेखक होते. आजूबाजूला घडणाऱया घटनांचा, स्पंदनांचा तो एक टीपकागद होता. मराठी रंगभूमीवरील हा ‘वामनावतार’ आता काळाच्या पडद्याआड गेला. रंगभूमीचा ‘इमला’ आता सुना सुना झाला हेच खरे!

चार महिन्यांपूर्वी रवींद्र नाटय़ मंदिराच्या व्हीआयपी कक्षात प्रसाद कांबळीसोबत गप्पा मारत बसलो होतो. रंगमंचावर व्यावसायिक नाटय़ स्पर्धेतील ‘देवबाभळी’चा प्रयोग सुरू होता. दहा मिनिटांनी स्टेजबेल वाजली. पहिल्या अंकाचा पडदा पडला. आम्ही उठलो, बाहेर आलो. दरवाजा उघडला. समोरच डोक्यावर पांढरीशुभ्र गांधी टोपी, अंगात फिकट निळय़ा रंगाचे कडक इस्त्री केलेला फुलशर्ट आणि काटकुळ्या शरीराला साजेशी करडी पँट अशा वेशातील ‘वामन’मूर्ती समोर आली. नजरानजर होताच एक ओळखीचे हसणे झाले. या माणसाचा फार पूर्वीपासूनच धाक वाटायचा. म्हणजे आयएनटी, उन्मेषच्या एकांकिका स्पर्धा करायचो तेव्हापासून. हातातील परीक्षणाची कागदांची चाळवाचाळव करत त्यांनी जरा दरडावूनच विचारले, काय रे, नाटक एकदमच सोडून दिलेस. कर काहीतरी. नवीन नाटक लिही. आता नवं काही सापडत नाही रे… एवढं बोलून ते दरवाजाआड गुप्त झाले. वामन तावडे नावाच्या वादळाची ती फार वर्षांनंतर झालेली, पण शेवटची भेट. त्यानंतर परवा समजले हे वादळ शांत झालंय! 1970 नंतर किमान दशकभर मराठी रंगभूमी हा एकांकिका स्पर्धांचा काळ होता. गणेशोत्सव मंडळांपासून आयएनटीसारख्या मातब्बर संस्थेपर्यंत प्रत्येकानेच अशा स्पर्धांचे आयोजन करून लेखक, दिग्दर्शक, कलावंत घडवले होते. आतासारखा फास्टफूडचा जमाना नव्हता. जे काही घडत होते, बिघडत होते ते प्रोसेनियम थिएटरच्या मुशीतच. मराठी रंगभूमीसाठी खऱया अर्थाने तो सुवर्णकाळ होता. त्याच सुवर्णकाळातील बिनीचे शिलेदार होते नाटककार वामन तावडे. 1975 नंतर वास्तववादी नाटक लिहिणाऱया लेखकांमध्ये वामन तावडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. म्हणजे एकीकडे जेव्हा समूह नाटय़ाच्या नावाखाली रंगभूमीवर प्रयोग होत होते, तेव्हा वामन तावडे यांनी अतिशय ज्वलंत आणि वास्तववादी विषय हाताळून प्रेक्षकांनाच नव्हे तर रंगभूमीलाच जागे केले होते. प्रदीप राणे, प्रकाश बुद्धिसागर, भालचंद्र झा, उदय म्हैसकर, हर्ष शिवशरण यांच्या काळातील हा लेखक, पण त्यांचे लिखाण कालातीत होते. जुने-नवे असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता. म्हणूनच ते शिवाजी मंदिरातील एखाद्या व्यावसायिक प्रयोगालाही ते हजेरी लावायचे आणि सुनील देवळेकरसारख्या नवोदित लेखक-दिग्दर्शकाची एकांकिका पाहण्यासाठी रत्नागिरीही गाठायचे. एकांकिका संपल्यावर किंवा नाटकाचा पहिला अंक झाला की रंगपट गाठणे आणि दिग्दर्शक-कलावंतांचे कौतुक करणे, त्यांना काही सूचना करणे हे त्यांचे जणू कर्तव्यच होते. सगळय़ांशी संवाद साधणारे, पण कुणाशीच वाद न घालणारे असे हे व्यक्तिमत्त्व. वामनरावांनी खूप काही लिहिले नाही, मोजकेच लिहिले, पण प्रत्येक कलाकृती गाजली. चेंबूरमध्ये बालपण गेले. त्या काळात कामगार रंगभूमी जोरात होती आणि ती नाटके गणेशोत्सवात मुंबईभर दौरे करत फिरायची. वामनरावांचे नाटय़शिक्षण अशीच काही नाटके पाहताना सुरू झाले. त्यांनी नाटय़लेखनाचा पहिला प्रयोग केला ‘आशीर्वाद’ या एका दरोडेखोराच्या जीवनावर आधारित नाटकाने. मात्र हा प्रयोग फसणार हे ओळखून त्यांनी आपल्या नाटकाचे बाड फेकून दिले. नंतर मात्र त्यांची लेखणी बहरात आली. कन्स्ट्रक्शन, पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची राणी अशा आशयघन आणि वेगळय़ा विषयांवरील एकांकिका रंगभूमीवर आल्या. रंगभूमीला वामन तावडे यांची ताकद जाणवू लागली. वामन तावडे हे नाव तसे सुपरिचित झाले ‘छिन्न’ या नाटकामुळे. सदाशिव अमरापूर यांचे दिग्दर्शन, स्मिता पाटील, आशालता आणि दिलीप कुलकर्णी यांचा अभिनय, सगळी भट्टी जबरदस्त जमली होती. पण खरा यूएसपी होता तो वामन तावडे यांनी मांडलेला स्फोटक विषय. नाटक तुफान गाजले आणि जोडीला वामन तावडेसुद्धा. नंतरच्या काळात कन्स्ट्रक्शनचे दोन अंकी ‘इमला’ झाले, चौकोन, माऊली, कॅम्पस, जिप्सी असेही प्रयोग रंगले. वामन तावडे खरे तर एका वेगळय़ा वाटेवरील लेखक होते. आजूबाजूला घडणाऱया घटनांचा, स्पंदनांचा तो एक टीपकागद होता. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कलाकृतीस ‘काल्पनिक’ वेष्टनात गुंडाळून सादर करावे लागले नाही. त्यांच्यातील लेखक अलंकारिक आणि भल्याथोरल्या वाक्यांच्या मोहजालात अडकला नाही. जे होते ते स्वच्छ आणि पारदर्शी, त्यांच्यासारखेच. गेल्या काही वर्षांत हा वामनावतार विविध स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून आणि फेसबुकवर कार्यरत होता. नवं काही हाती सापडलं नव्हतं. मात्र फिक्स्ड डिपॉझिटच एवढं भारीभक्कम होतं की नवी गुंतवणूक करण्याची गरजच नव्हती.

मराठी रंगभूमीवरील हा ‘वामनावतार’ आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. रंगभूमीचा ‘इमला’ आता सुना सुना झाला हेच खरे!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या