
>> रश्मी वारंग
काही पदार्थ जन्माला कसे आले याचा शोध लागता लागत नाही, पण खाण्याच्या इतिहासात विशिष्ट गोष्टींना आहारात कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयोग झालेले दिसतात. या प्रयोगातील सर्वात चटकदार प्रयोग म्हणजे भेळ. या भेळची ही गोष्ट…
भेळपुरीच्या उगमाशी अनेक कथा जोडल्या आहेत. एक कथा सांगते की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील विठ्ठल नामक उपाहारगृहात पहिली भेळ बनवली गेली, तर काहींच्या मते उत्तर हिंदुस्थानींना याचे श्रेय जाते, पण बहुतांश मंडळींच्या मते चाट प्रकाराचा एक भाग असणारी भेळ गुजरातशी नाते सांगते. भेळेचा उगम कुठलाही असो, पण तिचे मुंबईच्या चौपाटीशी सूत जुळले आणि भेळ जगभरात पोहोचली.
आपला देश प्राचीन काळापासून तांदळाचा महत्त्वपूर्ण उत्पादक राहिला आहे. तांदळापासून बनलेल्या चुरमुऱयांवर प्रयोग करता करता सहज उपलब्ध पदार्थ त्यात मिसळून भेळ तयार झाली. प्रांतागणिक त्यात मिसळले जाणारे पदार्थही वेगवेगळे. यामुळे कसा गोंधळ झाला याची भेळेइतकीच खमंग गोष्ट सांगितली जाते.
ब्रिटिश काळातली ही घटना आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थानात आपली सत्ता प्रस्थापित केली. प्रशासकीय कामासाठी यानिमित्ताने अनेक ब्रिटिश आपल्याकडे आले. त्यातच होते ब्रिटिश शेफ विलियम हॅरॉल्ड. एक अनुभवी शेफ असलेल्या विलियम यांचे मध्य लंडनमध्ये उत्तम चाललेले रेस्तरॉ होते, पण ब्रिटिश आर्मीमधल्या उच्चपदस्थ अधिकाऱयाचे खासगी कुक म्हणून विलियम यांना हिंदुस्थानात पाठवले गेले. हिंदुस्थानी पदार्थांचे वैविध्य पाहून विलियम थक्क होत. एके दिवशी एक ब्रिटिश अधिकारी हॅरॉल्ड यांच्याकडे आला आणि त्याने हॅरॉल्ड यांना सांगितले की, त्यांनी एक चटपटीत पदार्थ चाखला असून त्यांना तो खूपच आवडला आहे, तर तो पदार्थ हॅरॉल्ड यांनी शिकून घ्यावा. सैनिकांना मोठय़ा प्रमाणात तो पदार्थ खायला दिला जाणार होता. हॅरॉल्ड यांना हे आव्हान वाटले. ते त्या गावातील अनेक मंडळींना भेटले आणि त्या पदार्थाची पाककृती विचारली, पण प्रत्येक वेळी चुरमुरे व बटाटा वगळता हॅरॉल्ड यांना नवीच कृती हाती लागली. संध्याकाळी त्या एकाच पदार्थाच्या विविध पाककृतींचे बाड घेऊन परतलेल्या हॅरॉल्ड यांना अधिकाऱयाने उत्सुकतेने पदार्थ शिकून झाला का? असे विचारले तेव्हा हॅरॉल्ड म्हणाले, मी नेमक्या पाककृतीबद्दल गोंधळून गेलो आहे. त्यामुळे आजसुद्धा आपल्याला फ्रेंच फ्राइजवरच अवलंबून रहावे लागेल असे दिसतेय. त्यावर चिडलेल्या अधिकाऱयाने आपल्या गनने हॅरॉल्ड यांच्यावर गोळी चालवली असे म्हणतात. बनवण्याच्या पद्धतीमधील विलियम हॅरॉल्ड यांना बुचकळय़ात टाकणारी ही पाककृती होती भेळेची.
दिवसभराच्या कामाने शिणलेल्या मनाला मरगळ झटकून टाकायला लावणारे काही हवे असते. तिखटगोड चटण्यांचा हात धरून भांडय़ातील चुरमुरे, कांदा, बटाटा, टोमॅटोसह फेर धरतात. शेंगदाणे, शेव आणि बरीच सजावट. कंटाळा घालवणाऱया भेळेचा हा चटकदारपणा हीच तीच परिपूर्ती.
विभिन्न नावे अन् चव
विविध प्रांतांत भेळ वेगवेगळय़ा नावाने ओळखली जाते. बंगालमध्ये ती जालमुरी असते, कन्नडमध्ये चुरुमुरी, बांगलादेशात वेलपुरी. जालमुरीचे वेगळेपण म्हणजे त्यात वापरले जाणारे मोहरी तेल आणि चनाचूर. शिवाय नेहमीच्या स्वरूपासोबतच पापड भेळ, स्वीट कॉर्न भेळ, कढई भेळ, कडधान्यांची भेळ, मॅक्सिकन भेळ, चायनीज भेळ हे आणि असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
– कॅलरीजच्या दृष्टिकोनातून पाहिले तर एका भेळपुरीतून 289 कॅलरीज मिळतात. त्यात 157 कार्बोहायड्रेट, 31 प्रथिने आणि बाकीचे फॅटस् असतात.
– भेळपुरी हिंदुस्थानातील आवडते स्ट्रीट फूड आहे. ती बनवायला झटपट आणि सहज आहे. आवडीनुसार तिखट, गोडपणा कमी-जास्त करण्याची मुभा भेळ देते. या लवचिकतेमुळेही ती अधिक लोकप्रिय ठरते.



























































