
>> रश्मी वारंग
बालपणीचा काळ सुखाचा अनुभवायला लावणाऱ्या अनेक गोष्टींमधली एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोड गोष्ट म्हणजे खाऊच्या गोळ्या. दुकानातल्या काचेच्या बरण्यांतून खुणावणाऱ्या मिट्टगोड गोळ्या. या गोळ्यांना इतिहास वगैरे असू शकतो याचा विचार आपण त्या वयात कधीच केलेला नसतो, पण तरीही बच्चेकंपनीच्या आणि मोठ्यांच्या आवडत्या गोळ्यांची, शुगर कँडीची ही गोष्ट.
औद्योगिक क्रांतीनंतर साखरेचे उत्पादन, मशीनची उपलब्धता यामुळे अगदी स्वस्तात, विविध आकारांत, स्वादात खाऊच्या गोळय़ा उपलब्ध होऊ लागल्या. हिंदुस्थानात आण्याच्या गोळ्या (एक– दोन आण्यात मिळणाऱया) आणि पाश्चिमात्य देशांत पेनी कँडी हे पहिले असे खाद्य ठरले जे छोटी मुलं स्वतः जाऊन विकत घेत होती. या गोळ्यांना बच्चेकंपनीत प्रचंड लोकप्रियता मिळाली.
साखरेचा शोध हा तुलनेने खूप अलीकडचा आहे. त्याआधी गोडासाठी मधाचा वापर अधिकतर केला जाई. हा घट्ट मध म्हणजे या गोळय़ांचं आद्यरूप. छोटय़ाशा काडीला मध गुंडाळून, सुकवून खाल्ला जाई. फळं, सुकामेवा जतन करण्यासाठी त्यांना मधात बुडवून सुकवले जाई. आपल्या आवडत्या लॉलीपॉपची प्रेरणाही तिथूनच मिळाली आहे.
या गोळय़ांना इंग्रजीत पँडी म्हटलं जातं. काही ठिकाणी स्वीट किंवा लॉली म्हणतात. गंमत म्हणजे कॅंडी या शब्दाचं मूळ चक्क संस्कृतमध्ये दडलेले आहे.
कॅंडी हा शब्द इंग्रजी भाषेत जुन्या फ्रेंच suger candy (‘शुगर कॅंडी’) वरून आला आहे. फ्रेंच शब्दाचं मूळ अरबी कांडी, पर्शियन कांड या शब्दात आहे आणि हे दोन्ही शब्द संस्कृत ‘खंड’ या शब्दापासून तयार झाले आहेत. शर्कराखंड यातील खंडचे कँडीशी असलेले नाते जग गोल आहे याची जाणीव करून देते.
प्राचीन काळापासून उष्णकटिबंधीय दक्षिण आणि आग्नेय आशियात ऊस पिकवला जातो. प्राचीन हिंदुस्थानात उसाचा रस उकळून साखरेचे कण, शर्करा तयार करण्याची कला अवगत होती. ही शर्करा खंड म्हणून खाल्ली जाई. ग्रीक आणि पर्शियन मंडळींना या कलेचे विलक्षण अप्रूप होते. हिंदुस्थानातील लोक मधमाश्यांशिवाय मध तयार करणारी खांडं उगवतात हे त्यांच्यासाठी आश्चर्य होते. ते तंत्र त्यांनी अवगत केले आणि नंतर साखरेचा जगभर प्रवास सुरू झाला.
औद्योगिक क्रांतीआधी गोळी म्हणजे औषधाची मात्रा होती. दुखणारा घसा, अपचन यावर वटिकारूपात उपचार केला जाई. शाही मेजवानीनंतर पाचक पदार्थ साखरेच्या पाकात गुंडाळून पाहुण्यांसमोर ठेवले जात. त्यानंतर जिभेच्या चोचल्यांसाठी साखरेच्या गोळय़ा बनवल्या जाऊ लागल्या. विशेष म्हणजे भविष्यात गरीबांच्या खिशाला परवडणाऱ्या या गोळय़ा सुरुवातीला श्रीमंतांची चैन होती. कारण साखर ही चैनीची महाग वस्तू होती. हे चित्र औद्योगिक क्रांतीनंतर बदलले.
या साखरेच्या गोळ्यांनी मधुमेह, दातांचं किडणं अशा व्याधीही मोठय़ा प्रमाणात आणल्या. 1959 साली स्वीडनमध्ये यासाठी एक प्रयोग केला गेला. ‘तुम्हाला हव्या त्या गोळय़ा खा, पण फक्त शनिवारी’ असा हा नियम होता. त्या गोळ्यांना ‘सॅटर्डे स्वीट’ असं नावही मिळालं.
आज चॉकलेटचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. शिवाय पालक मुलांच्या दातांच्या आरोग्याबद्दल दक्षही आहेत. त्यामुळे गोळय़ांची पूर्वीची लोकप्रियता डळमळली आहे, पण अनेकांना आजही संत्र्याच्या फोडीच्या आकारातील आणि रंगातील लिमलेट, पैशाच्या आकारातील मिंटी व्हाइट, रंगीबेरंगी पॉपिन्स, मँगोबाइट, पानपसंद, रोल अ कोला (ज्याला आपण रोलाकोला म्हणायचो) या आणि अशा अनेक गोळय़ा आठवत असतील. घरी आलेल्या पाहुण्यांनी उदार होऊन दिलेल्या पैशातील चाराणे, आठआणे चाचपडत दुकानात त्या गोळय़ांनी भरलेल्या रंगीबेरंगी बरण्यांसमोर उभं राहिल्यावर आपण एका जादुई दुनियेचा भाग व्हायचो. वरचं आवरण असलेल्या गोळय़ा आणि आवरण नसलेल्या गोळ्या असं सरळसोट विभाजन होतं. आपल्या खिशाच्या श्रीमंतीप्रमाणे त्या गोळय़ा हातात पडायच्या. वरचं आवरण जपून ठेवणारे महाभागही असायचे. त्या रंगीबेरंगी गोळ्यांमध्ये आपला आवडता रंग वाट्याला येणं म्हणजे केवढा मोठा आनंद. ती गोळी तोंडात ठेवायची आणि नंतर शाळेचा अखंड रस्ता एका आनंदी धुंदीत पार करायचा. साखरेचे प्रमाण, कॅलरीज यांची चिंता नसणारा तो काळ खरंच सुखाचा होता आणि त्या गोळय़ांसारखाच रंगीबेरंगी आणि आनंदीही.





























































