
>>>एस. ए. रेडकर
साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित एक नवे पुस्तक ‘सहज आणि अचूक इंग्रजी बोला’ इंग्रजी भाषेचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवते. ज्योती नांदेडकर यांनी लिहिलेले हे पुस्तक इंग्रजी बोलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वांचा विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारे आहे. विशेष म्हणजे या द्विभाषिक पुस्तकाची मांडणी अतिशय आकर्षक असून यामध्ये प्रसंगानुरूप सुंदर चित्रांचा चपखल वापर केलेला आहे.
जागतिक पातळीवर बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चिनी भाषा ही प्रथम क्रमांकावर असून त्या खालोखाल इंग्रजी ही भाषा बोलली जाते. आज जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणजेच वैश्विक खेडे असे संबोधले जाते. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे तसेच सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे सर्व विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व्यक्ती, व्यापारी किंवा विक्रेते सर्वांनाच इंग्रजी बोलता येणे आवश्यक झाले आहे.
आज सर्व वयोगटातल्या व्यक्तींना इंग्रजी बोलण्याचं महत्त्व पटलेलं आहे. त्यामुळे शाळा कॉलेजांमधून इंग्रजी अनिवार्य भाषा म्हणून शिकत असतानाही ‘स्पोकन इंग्लिश’च्या क्लासेसना गर्दी होताना दिसते. ‘एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका’ अशी आश्वासने देणाऱ्या क्लासेसमधून इंग्रजीच्या शिक्षणाचं खरंतर व्यावसायीकरण झालेलं दिसतंय. वेळ-पैसा-श्रम घालवूनही फारसं काही हाती येत नसल्याचाच अनेकांचा अनुभवदेखील आहे. अचूक आणि सहज इंग्रजी बोलण्यासाठी व्याकरण तसेच म्हणी/वाक्प्रचारांचा अभ्यास, इंग्रजीतील अभिजात साहित्याचे वाचन (विशेषतः लहान मुलांसाठी लिहिली गेलेली पुस्तके), इंग्रजी वर्तमानपत्रे, नियतकालिकांचे नियमित वाचन असे सर्वांगीण प्रयत्न करणे आवश्यक असते. वस्तुतः इंग्रजी बोलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाही आयत्या वेळी वापरता येतील अशा काही वाक्यांची निकड जाणवते. या पार्श्वभूमीवर प्रसंगानुरूप व्यक्त होण्यासाठी हे पुस्तक आपली जवळच्या मित्रासारखी मदत करते.
खरंतर इंग्रजी भाषा म्हणजे (ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार) जवळजवळ 1,71,476 शब्दांचा महासागर असून, या जागतिक भाषेमध्ये 47,166 इंग्रजी शब्द अप्रचलित म्हणजेच आता वापरात न येणारे आहेत. वास्तविक इतक्या अवाढव्य शब्दसंग्रहांपैकी यातल्या शंभरेक शब्दांचाच पुनःपुन्हा वापर करून इंग्रजीत संवाद साधला जातो. म्हणजेच चांगल्या रीतीने इंग्रजी बोलण्यासाठी फार मोठा शब्दसंग्रह पाठ करण्याची गरज नसते, तर हे शब्द परिणामकारकरीत्या वापरून संवाद आवश्यक असते.
खूप आनंदी असताना, निराश मनःस्थिती असताना, कुणाची मदत मागताना किंवा व्यावसायिक ठिकाणी बोलताना, नकार देताना किंवा थकून गेल्यानंतर, दिलगिरी व्यक्त करताना अशा 52 प्रसंगी संवाद साधण्याची इंग्रजी वाक्ये व त्यांचा मराठीतून अनुवाद अशी या पुस्तकाची सुटसुटीत रचना आहे. सफाईदार इंग्रजी बोलण्यासाठी आणि इंग्रजी भाषेतील गोडवा व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. ‘सहज आणि अचूक इंग्रजी बोला’ या पुस्तकातील नवीन धाटणीची वाक्ये वाचकांना इंग्रजीतून अधिक नेमकेपणानं बोलण्यासाठी मदत करतील. कुठलीही भाषा प्रभावीपणे बोलायची असेल तर आपल्याला त्यातली सुभाषिते, नवी शब्दकला, भाषिक प्रयोग यांची ओळख असायला हवी हे लक्षात घेऊनच हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे.
इंग्रजीत वापरल्या जाणाऱ्या नवनव्या अभिव्यक्ती, वाक्यांची माहिती वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक इंग्रजी वाक्याचा अर्थ मराठीतूनही दिलेला असल्यामुळे नवागत आणि शिकाऊ इंग्रजी बोलू इच्छिणाऱ्यालाही हे पुस्तक आपलेसे करते.
सहज आणि अचूक इंग्रजी बोला
लेखक : ज्योती नांदेडकर
किमत : 250/-
प्रकाशक : साकेत प्रकाशन प्रा. लि. पुणे





























































