प्राचीन ते अर्वाचीन, श्रीगणेशाचे शिल्प आणि चित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना बहुळकर 

गणपतीचा प्रथमावस्थेतील ओबडधोबड आकार हळूहळू सातव्या-आठव्या शतकात घाटदार, डौलदार होत गेला. त्याच्या डोक्यावर मुकुटासारखे लहानसे आभूषण दाखविले गेले. अंगावर एखादा दागिना चढवला गेला. हातापायांच्या बोटांचे नेटके शिल्पांकन दिसू लागले. विविध ठिकाणी असणाऱया काही लेण्यांमध्ये, स्तंभ सुशोभनासाठीही गणेशप्रतिमेचा उपयोग होऊ लागला. पुढील काळात जनमानसात गणेश दैवताचे महात्म्य वाढत गेले. शिल्प-चित्रकलाही अधिक प्रगल्भ होत गेली.

पूर्वीपासून आजपर्यंत असंख्य शिल्पकार-चित्रकारांनी आपापल्यापरीने व क्षमतेने या दैवताची वेगवेगळय़ा प्रकारे अभिव्यक्ती केली आहे. त्यासाठी चित्रकलेच्या साधनांसह विशिष्ट प्रकारच्या माती, पाषाण, काष्ठ, धातू अशा पारंपरिक माध्यमांबरोबरच अलीकडे फायबर, सिरॅमिक अशा माध्यमांतही निर्मिती केली जात आहे. पर्यावरण जागरूकतेमुळे कागदाच्या लगद्याचाही पुनर्वापर (Recycling) क्वचित होताना आढळत आहे. पूर्वीच्या काळातील कोरीव लेणी, मंदिरे यातील गणेशप्रतिमा निर्माण होण्यामागे प्रबळ धार्मिक श्रद्धा ही प्रेरणा होती. आजदेखील ही प्रतिमा श्रद्धेने साकार होत आहे, पण त्याचबरोबर तिच्या आकार वैशिष्टय़ांचा उपयोग करीत, कलात्मकतेवर भर देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. काही प्रतिमांमध्ये भरपूर तपशिलांसह अलंकृतता असते, तर कधी संपूर्ण प्रतिमा न साकारता त्यातील मुकुट, कान, सोंड, उदर हे किंवा यापैकी मोजकेच तपशील वापरत मोजक्याच रेषा-आकार-रंग यांद्वारे कलात्मक प्रतिमा साकार केलेली दिसते. अलीकडच्या काळात अशाप्रकारची गणेशचित्रणे मुख्यतः निमंत्रण पत्रिका, भेटकार्डे यावर तसेच शोभेसाठीही केलेली आढळतात.

गणेशाची प्राचीनतम प्रतिमा ते विकसित प्रतिमा
गणेशाची प्राचीनतम प्रतिमा टेराकोटा माध्यमात घडविली गेल्याची नोंद आहे. ही मूर्ती कोणतीही साधने किंवा हत्यारे न वापरता केवळ हातांनी घडविली गेली. ही मूर्ती सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची सातवाहनकालीन असल्याचे मानले जाते. काही अभ्यासकांच्या मते ती इसवी सनच्या पहिल्या किंवा दुसऱया शतकातील असावी, तर काहींचा अंदाज तिचा कालखंड इसवी सन पूर्व पहिले ते तिसरे शतक असावा. ही मूर्ती महाराष्ट्रातील धाराशीव जिल्हय़ातील ‘तेर’ येथील आहे. कलेच्या दृष्टीनेही हा आकार प्रथमावस्थेतील, ओबडधोबड, ठाशीव व एकसंध आहे. त्यात रेषा-आकार यांचा रेखीवपणा, नीटसपणा नाही. शरीरावर वस्त्र्ाs, अलंकार यांचे सूचक चित्रणही नाही. फक्त दोन हात आणि हातापायांची बोटे इतकेच दिसते. मात्र गणेशाची सोंड, पसरट कान व मोठे उदर ही ठळक वैशिष्टय़े त्यात आहेत.

गणेशाच्या उत्पत्तीची किंवा गणेशजन्माची दोन-तीन वेगवेगळी कथानके सर्वत्र रूढ आहेत. एका कथानकानुसार गणेश हे शंकर-पार्वतीचे अपत्य मानले जाते. कार्तिकेय हा त्याचा बंधू. या परिवाराच्या पोथ्यापुराणातील कथा शिल्प-चित्रकलेतही संक्रमित झाल्या. म्हणून महाराष्ट्रातील वेरूळ, घारापुरी (एलिफंटा गुंफा) इत्यादी अनेक ठिकाणी गणेशाच्या प्रतिमा आढळतात.

महाराष्ट्रात गणेश केवळ कोरीव लेणी, घरगुती देव्हारे यापुरताच सीमित नाही, तर घरांच्या व वाडय़ांच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूच्या आडव्या पट्टीवर किंवा दरवाजाजवळ विराजमान असलेला दिसतो. महाराष्ट्रातील संतपरंपरेने ग्रंथारंभी गणेशस्तवन केले आहे. राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेमुळे गणेशाची महती व लोकप्रियता वाढली.

वेरुळमधील शैव-वैष्णवपंथीय लेण्यांत विविध देवदेवतांचे व पुराणातील अनेक प्रसंगांचे शिल्पांकन आहे. त्यात गणेशप्रतिमाही आहेत. वेरुळच्या गुहा क्रमांक चौदामधील सप्तमातृकांसह असणारी गणेशप्रतिमा हे त्याचेच उदाहरण. सातव्या शतकातील ‘दशावतार’ गुहा, आठव्या शतकातील कैलास मंदिरातील गणेशप्रतिमा ही आणखी काही उदाहरणे!

‘तेर’च्या गणपतीचा प्रथमावस्थेतील ओबडधोबड आकार हळूहळू सातव्या-आठव्या शतकात घाटदार, डौलदार होत गेला. त्याच्या डोक्यावर मुकुटासारखे लहानसे आभूषण दाखविले गेले. अंगावर एखादा दागिना चढवला गेला. हातापायांच्या बोटांचे नेटके शिल्पांकन दिसू लागले. विविध ठिकाणी असणाऱया काही लेण्यांमध्ये, स्तंभ सुशोभनासाठीही गणेशप्रतिमेचा उपयोग होऊ लागला. पुढील काळात जनमानसात गणेश दैवताचे महात्म्य वाढत गेले. शिल्प-चित्रकलाही अधिक प्रगल्भ होत गेली. बाराव्या-तेराव्या शतकात कर्नाटकातील ‘हळेबीड’ ही होयसाळांची राजधानी होती. तेथील मंदिरात गणेश प्रतिमा पाषाणातील असूनही मुकुट हा रत्नजडित भासण्याइतका अप्रतिम केला गेला. डिझाइनचे इतर बारकावे, एकंदरीत आकाराचे सौष्ठव व गोडवा हे उत्तम कारागिरीबरोबरच कल्पकतेचीही साक्ष देतात.

काळाच्या ओघात अनेक बदल होत असतात. त्याचे पडसाद कलेवरही उमटतात. कोरीव लेणी, मंदिरे-शिल्पे तसेच त्यातील भित्तिचित्रे या प्रकारच्या भव्य कलाकृती निर्माण होण्याचा दीर्घकाळ ओसरला. त्यानंतर हिंदुस्थानी कलेच्या इतिहासातील ठळक टप्पा म्हणजे इसवी सनाच्या 10व्या व 12व्या शतकातील ‘लघुचित्र परंपरा’.

या लघुचित्र परंपरेत जैन, राजस्थानी, मोंगल, पहाडी, कांग्रा, रजपूत अशा वेगवेगळय़ा शैली आहेत. लघुचित्रातील आकार रेखीव असतात. सपाट व तेजस्वी रंग देण्यावर भर असतो. मूळ चित्र आणि विषयावर भर देत इतरही अनेक दृक् तपशील त्यात असतात. आकारांना नाजूक, बारीक किनार असते. शिवाय प्रत्येक शैलीची आपापली वैशिष्टय़ेही आहेत. या परंपरेतही गणेशकथांच्या अनुषंगाने चित्रणे आहेत. ‘कांग्रा’ शैलीतील एका चित्रात बालगणेशाला वात्सल्याने न्हाऊ-माखू घालणारे शंकर-पार्वती आहेत. या बालरूपाला हात मात्र चार दाखविले आहेत. पार्श्वभूमीला हिमालयाच्या रांगा आहेत. ‘बसोली’ शैलीतील एका चित्रात मोठय़ा कमळावर बसलेल्या गणेशाचे चित्रण आहे. चेहरा एका बाजूला (प्रोफाइल) दिसल्याप्रमाणे व शरीर समोरून दाखविले आहे. ‘चंबा’ शैलीतील एका चित्रात कैलास पर्वताच्या शिखरावर शिव-पार्वती आहेत. पर्वताच्या पायथ्याशी रावण तो पर्वत हलविताना दिसतो व गणेश पर्वताच्या कडय़ावरून खाली बघत आहे.

यानंतर कलेच्या इतिहासातील ठळक टप्पा म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीतील हिंदुस्थानी कला व त्यातील स्थित्यंतरे. कलाकौशल्याचे रीतसर शिक्षण देण्यासाठी ब्रिटिशांनी मुंबईत मार्च 1857 मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्ची स्थापना केली. तेथे पाश्चात्य पद्धतीच्या ‘वास्तववादी कलेचे’ शिक्षण दिले जाऊ लागले. त्यात ‘यथ्यातथ्य’ म्हणजे ‘जसे’ दिसते ‘तसे’ चित्रे काढण्यावर भर असे. ही शैली मूळ हिंदुस्थानी शिल्प-चित्रकलेपेक्षा खूप वेगळी होती. या नव्या शिक्षणपद्धतीमुळे कलेचे विद्यार्थी पाश्चात्य मुशीत तयार होऊ लागले आणि त्यावर प्रभुत्वही मिळवू लागले.

या परंपरेतील आबालाल रहिमान हे एक महत्त्वाचे नाव (1856-1931) आहे. कलाशिक्षणानंतर त्यांची कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दरबारी राजचित्रकार म्हणून नेमणूक झाली. आबालालांनी ‘वास्तववादी शैलीत’ काढलेले गणेशाचे दुर्मिळ चित्र आहे. यात वास्तववादी शैलीतील, मनुष्याकृतीशी गणेशाचे असणारे साम्य उल्लेखनीय आहे. गणेशाच्या देहाला गोलाईचा आभास आहे. कटीच्या पितांबराला लयदार चुण्यांची नजाकत आहे. पार्श्वभूमी नाटकाच्या पडद्यांसारखी आहे.

प्रसिद्ध आधुनिक चित्रकार मकबुल फिदा हुसेन (1915-2011) यांनी 1960-70 च्या दशकात रामायण-महाभारतातील विविध घटनांशी संबंधित चित्रमालिका केली. त्या मालिकेत गणेशाची चित्रणे आहेत. आपली हजारो वर्षांची परंपरा असे मानते की, महाभारताचा इतिहास सांगण्याचे काम महर्षी व्यासांनी केले. त्यासाठी त्यांच्या लेखनिकाचे काम साक्षात गणपतीने केले ते हे चित्र ‘व्यास ऍण्ड गणेश’. ज्ञानदेवता गणेश व महर्षी व्यास एकाच इतिकर्तव्याने प्रेरित आहेत. असे यातून सहजतेने अभिव्यक्त झाले आहे. त्यासाठी त्यांच्या दोन शरीराकृतींचा एकात्म आकृतिबंध दाखविला आहे.
आबालाल रेहमान व हुसेन हे वेगवेगळय़ा काळातील मातब्बर कलावंत. त्यांनी काढलेल्या गणेश प्रतिमांद्वारे या देवताबद्दल भिन्नधर्मीय कलाकारांना वाटणारे आकर्षण व आत्मीयताच सिद्ध होते.

प्रसिद्ध चित्रकार इंद्र शर्मा, रघुवीर मुळगावकर, एस. एम. पंडित, पी. सरदार अशा चित्रकारांनी दिनदर्शिकेकरिता गणेशाची विविध रूपे साकारली, जी लोकप्रिय ठरून घरोघरी पोहोचली. प्रसिद्ध शिल्पकार विनायक करमरकर, सदाशिव साठे, नारायण सोनावडेकर, नाशिकचे मदन-अरुणा गर्गे गणेशोत्सवातील आपल्या घरच्या गणपतीची मूर्ती स्वहस्ते घडवीत गणपतीचे मूर्तिकाम करीत. शिल्पकलेकडे वळलेल्या कलाकारांचीही अनेक उदाहरणे आहेत. सहजपणे आठवलेली काही नावे म्हणजे जेमिनी राय, रघुवीर चिमुलकर, शक्ती बर्मन, सुभाष अवचट, सुहास बहुळकर, वासुदेव कामत इत्यादी.
या आगळय़ावेगळय़ा लवचीक आकारात कलावंतांना वेगवेगळय़ा शक्यता दिसल्या. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता म्हणून जसे श्रद्धेने त्याला स्वीकारले गेले, तसेच कलावंतांनी सादर केलेली त्याची विविध कलात्मक रूपेही, जनमानसाने कौतुकाने स्वीकारली. त्यामुळेच नर्तन करणारा, घोडय़ावरचा, मंचकावरचा किंवा इडलीसारखा चपटा असा त्याचा आकारही मान्यता पावला. धर्ममार्तंडांनीही कधी त्यावर आक्षेप घेतले नाहीत. असे हे सकलांच्या आत्मीयतेचे आणि श्रद्धेचे कलात्मक दैवत आहे. पूर्वीपासून आजपर्यंत कलेत गणेशाला असलेले स्थान अनन्यसाधारण आहे.

– [email protected]
(लेखिका सातत्याने कलाविषयक लिखाण करतात.)
(सौजन्य- बबनराव पाटील, वास्तुरहस्य प्रकाशन)