उर्जा सुरक्षेत चीनची आघाडी

290

>> सनत कोल्हटकर

रशिया आणि चीन या दोन्ही देशांतील हे ऊर्जा सहकार्य जागतिक राजकारणात लक्षवेधी ठरले आहे. बीजिंग आणि मास्को या दोन्हीही देशांतील विविध क्षेत्रांतील सहकार्य हे वॉशिंग्टनला आव्हान देतील असे शी जिनपिंग यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे होते. हॉंगकॉंग आणि तैवानमधील अमेरिकन हस्तक्षेपाने चीन आधीच अस्वस्थ आहे. या प्रकल्पामुळे चीनने त्याच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये आघाडी घेतली आहे हे खरे.

रशियाने 2004 मध्ये चीनच्या नेतृत्वाला चीनच्या भविष्यातील इंधनाच्या गरजेसाठी आणि नियमित पुरवठा होण्यासाठी इंधन वायुवाहिनी उभारण्याबद्दल सुचविले होते. अर्थात हा इंधनसाठा रशियाच्या ताब्यातील सैबेरियाच्या भूभागात होता आणि इंधनाची वाढती गरज होती ती चीनची. या प्रकल्पाला येणारा खर्च बघून चीनच्या नेतृत्वानेही सुरुवातीला माघार घेतली होती. रशियातील सैबेरियापासून चीनमधील ईशान्य भागातील ठिकाणापर्यंत ही इंधन वायुवाहिनी टाकण्याचा हा प्रस्ताव होता. पुढे 2014 मध्ये या दोन्ही नेत्यांत या करारावर स्वाक्षऱया झाल्या. मात्र प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च पोहोचला होता 400 अब्ज अमेरिकन डॉलर्स. प्रकल्पाची ही किंमत बघून हा किती महाकाय प्रकल्प असेल याची कल्पना येऊ शकेल. सैबेरियातून हे इंधन वायुवाहिनीतून प्रवाहित होत ईशान्य चीनमधील नियोजित ठिकाणी पोहोचेल. वाहिनीमुळे या इंधन वायूचा अखंड प्रवाह चालू होईल. चीनच्या ईशान्य भागात चीनला हा वायू साठवावा तर लागेलच, पण तो पुढेही चीनच्या अंतर्भागात वाहिन्यांमार्फतच न्यावा लागेल.

चीन आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार रशिया पुढील 30 वर्षे या इंधन वायूचा अखंड पुरवठा चीनला करणे अपेक्षित आहे. रशियाच्या ‘गेझप्रोम’ या तेल आणि वायू कंपनीसाठी या महाकाय प्रकल्पाचा करार हा एक मोठी गोष्ट होती. इ.सन 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून रशिया या वाहिनीतून वर्षाला 38 अब्ज क्युबिक मीटर्स एवढा इंधन वायूचा पुरवठा करणार आहे. रशिया आणि चीन या दोन्हीही देशांच्या सीमा भिडल्या असून या दोन्हीही देशांमध्ये जोरदार आर्थिक आणि राजकीय सहकार्य होताना दिसते आहे. रशियाकडूनही चीनला अनेक प्रकल्प – जसे की, ‘ 5 जी’ प्रकल्पाची संपूर्ण रशियात अंमलबजावणी असो – चीनच्या कंपन्यांकडेच दिले गेले आहेत.

रशिया ते चीनमध्ये टाकण्यात येणाऱया या इंधन वायुवाहिनीची एकूण लांबी आहे तब्बल 8100 किलोमीटर (5000 मैल). चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दोघांनी या वाहिनीच्या कामाचे उद्घाटन केले आणि या महाकाय प्रकल्पाच्या लिखित कराराचे हस्तांतरणही केले. या दोन्ही नेत्यांनी या वाहिनीचे ‘ध्वनिचित्रफिती’मार्फत ‘सिम्बॉलिक’ उद्घाटन केले. ‘गेझप्रोम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलेक्स मिलर यांनी याबद्दलची माहिती दिली. सैबेरियाची शक्ती (पॉवर ऑफ सैबेरिया) असेही या प्रकल्पाला संबोधले जाते. ऊर्जा क्षेत्रातील हा नुसता एक ‘आंतरराष्ट्रीय’ असा इंधन वायू पुरवठा करार नसून त्या प्रकल्पाकडे रशिया आणि चीन या दोघांतील सामरिक भागीदारीच्या रूपातूनही बघितले जाते आहे. 2 डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पातून सुरुवातीला कमी प्रमाणात वायू प्रवाहित केला जाईल. त्यानंतर त्या प्रकल्पातील काही गळतीसदृश किंवा इतर काही अडचणी उद्भवल्या तर त्यांची दुरुस्ती करून पुढील 4 वर्षांमध्ये म्हणजे साल 2024 पर्यंत या वाहिनीतून पूर्ण क्षमतेने प्रतिवर्ष 38 अब्ज क्युबिक मीटर्स इतका इंधन वायूचा पुरवठा होऊ शकेल. प्रश्न 8100 किलोमीटर लांबीच्या वाहिनीचा असल्याने इतका वेळ लागणे अपेक्षित आहे. एवढा महाकाय प्रकल्प असूनही या प्रकल्पातून प्रवाहित होणारा इंधन वायू हा चीनच्या इंधन वायूच्या गरजेपैकी फक्त 10 टक्के गरज भागवेल असे ‘स्टॅण्डर्ड एण्ड पुअर’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे. उत्तर सैबेरियातील ‘यमल’ या इंधन वायू प्रकल्पातून ‘टाकी’मधून हा वायू युरोपला पाठवला जातो, पण वाहिनीमुळे सलगपणे / अखंडपणे इंधन वायूचा पुरवठा करता येतो.

चीन आता कोळसा या प्रदूषणकारी अशा इंधनापासून दूर जाऊ पाहतो आहे. कार्बन उत्सर्जनामुळे चीन आधीच संत्रस्त असून तो देश अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे विविध शोध घेण्यात व्यस्त आहे. चीन सध्याच जगातील सौर ऊर्जेच्या उपकरणाच्या ‘पॅनल’ निर्मितीत अव्वल देश बनला आहे. किमान स्पर्धात्मक किंमत आणि वेगवान पुरवठा यामुळे चीनने जागतिक बाजारात या व्यवसायात याआधीच बाजी मारली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातच अमेरिकेच्या ‘एक्सॉन मोबिल’ या महाकाय तेल कंपनीने चीनबरोबर पुढील 20 वर्षांसाठी ‘द्रवीभूत इंधन वायू’ पुरवठा करण्यासाठी करार केला होता.
या रशिया ते चीन इंधन वायू प्रकल्पावर 10 हजार लोकांनी काम केले आहे. 130000 वायुवाहिन्या (पाइप्स ) या प्रकल्पासाठी वापरण्यात आले. रशिया आणि चीन या दोन्ही देशांतील हे ऊर्जा सहकार्य जागतिक राजकारणात लक्षवेधी ठरले आहे. बीजिंग आणि मास्को या दोन्हीही देशांतील विविध क्षेत्रांतील सहकार्य हे वॉशिंग्टनला आव्हान देतील असे शी जिनपिंग यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे होते. हॉंगकॉंग आणि तैवानमधील अमेरिकन हस्तक्षेपाने चीन आधीच अस्वस्थ आहे. या प्रकल्पामुळे चीनने त्याच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये आघाडी घेतली आहे हे खरे.

ऊर्जा सुरक्षेची जागतिक समीकरणे
जगातील अनेक देश, मग ते युरोपातील जर्मनी असो, ग्रीस असो किंवा मध्य रशियातील तुर्कस्तान, प्रत्येक देश येणाऱया काळासाठी आपापल्या देशाला इंधन वायू पुरवठा सुरळीत राहावा म्हणून जोरदार प्रयत्न करीत आहे. तुर्कस्तान आणि रशियातील ‘तुर्क स्ट्रीम’ हा 1100 किलोमीटर लांबीचा इंधन वायू प्रकल्पही नुकताच पूर्ण झाला असून त्याचे उद्घाटन पुढील महिन्यात होणार आहे. 1100 किलोमीटर लांबीच्या या इंधन वायुवाहिनीची 900 किलोमीटर लांबीची वाहिनी ही काळ्या समुद्राखालील पाण्यातून जाते. या वाहिनीमुळे तुर्कस्तानने त्याची स्वतःची भविष्यातील इंधन वायू पुरवठय़ाची गरज सुरक्षित केली आहे. रशिया आणि जर्मनीमध्येही ‘नॉर्ड स्ट्रीम’ हा असाच इंधन वायू प्रकल्प आकाराला येत आहे. या प्रकल्पाचेही 80 टक्के काम पूर्ण होत आले आहे. युरोपचे रशियाच्या भौगोलिक जवळिकीमुळे त्याच्या इंधन गरजेसाठी रशियावरील अवलंबित्व वाढतच जाणार आहे. अमेरिकेला हीच गोष्ट खुपताना दिसते आहे. रशियातील कोणतीही इंधन वाहिनी युक्रेनमधून जात नाही हे विशेष.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या