मंथन – तुर्कस्तानचे गायब 128 अब्ज अमेरिकन डॉलर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनतकुमार कोल्हटकर

अमेरिकेने तुर्कस्तानवर घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे तुर्कीचे चलन लिरा डॉलरच्या तुलनेत घसरण्यास सुरुवात झाली. मात्र तरीही तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्देगीन यांनी नागरिकांना तुर्किश चलनातच व्यवहार करण्याचा सल्ला दिला. लिराची घसरण वाचवण्यासाठी तुर्कस्तानच्या बँकेने त्यांच्या राखीव साठय़ातील 128 अब्ज डॉलर तेथील बाजारात आणले हे आता उघड झाले आहे. लिराची घसरण थांबवण्यासाठी एर्देगीन यांनी घेतलेल्या या तुघलकी निर्णयाचा आता तुर्कस्तानमध्ये जोरदार निषेध केला जात आहे.

गेली 2 वर्षे अमेरिकेने तुर्कस्तानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले होते. सुरुवातीला तुर्कीचे चलन असणारे ‘लिरा’ हे डॉलरच्या तुलनेत घरंगळण्यास सुरुवात झालेली होती. अमेरिकन डॉलरची तुर्कस्तानच्या बँकेत तूट वाढतच गेली होती. तुर्कस्तानचे सध्याचे अध्यक्ष एर्दोगेन यांनी तुर्कस्तानच्या नागरिकांना जास्तीत जास्त तुर्किश लिरा या चलनातच व्यवहार करण्याचा सल्ला दिलेला होता. याच काळात ‘कतार’नेही तुर्कस्तानला 2 अब्ज डॉलर्सची मदत केलेली होती. त्यानंतरही तुर्कस्तानने त्यांच्या लिराची घसरण कशी थांबवली होती त्याबद्दलचे गूढ आणि त्यानंतरची सुरस कथा आता पुढे आलेली आहे. तुर्कस्तानच्या बँकेने त्यांच्या राखीव साठय़ातील 128 अब्ज डॉलर्स तेथील बाजारात ओतले होते असे पुढे येत आहे. हे सर्व त्यांनी तुर्कस्तानच्या ‘लिरा’ चलनाला डॉलरच्या तुलनेत घसरत जाण्यापासून वाचविण्यासाठी केले होते. पण 128 अब्ज डॉलर्स ही प्रचंड रक्कम आहे. तुर्कस्तानच्या एर्दोगेन सरकारने घेतलेल्या या तुघलकी निर्णयाचा तुर्कस्तानमध्ये जोरदार निषेध केला जात आहे. या निर्णयाचा ‘लिरा’ची घसरण थांबविण्यासाठी आणि बँकांचे कर्जासाठी ठरविलेले व्याजदर रोखण्यासाठी किती उपयोग झाला याची शंकाच आहे.

तुर्कस्तानच्या नागरिकांनी आपापल्या घराबाहेर ‘128 अब्ज डॉलर्स गेले कुठे’ या आशयाचे फलक लावले आहेत. लोकांनी आपापल्या मास्कवरही याच आशयाचे लिखाण केलेले दिसत आहे. आता या घटनेला अजून इतरही काही बाजू आहेत, ज्यामुळे तुर्कस्तानचे लोक तेथील एर्दोगेन सरकारवर नाराज आहेत. एर्दोगेन यांनी त्यांच्या जावयाला म्हणजे ‘बेरात एल्बायरक’ याला तुर्कस्तानच्या अर्थमंत्रालयाचा कारभार सोपविलेला होता. त्याने गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता. मुरात युसाल हे तेथील सेंट्रल बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर होते. पण त्यांना एर्दोगेन यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना त्यांच्या पदावरून दूर केले होते. याच काळात एर्दोगेन यांनी तेथील सेंट्रल बँकेच्या प्रमुखपदी नासी एगबल याना नियुक्त केले होते. त्यांनी एर्दोगेन यांच्या 128 अब्ज डॉलरच्या वापराला पाठिंबा दिलेला होता. पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर त्यांनी बँकेच्या व्याजदरांमध्ये लगेचच वाढ केली होती. पण याचा ‘अगबाल’ याना एर्दोगेन यांनी पाच महिन्याच्या कार्यकाळानंतर गेल्या महिन्यात सेंट्रल बँकेच्या पदावरून दूर केले होते.

साल 2019 – 2020 या काळात तुर्कस्तानच्या बँकेने हे 128 अब्ज डॉलर्स तेथील बाजारात ओतले होते. एर्दोगेन दावा करतात की तुर्कस्तानची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण या घटनेमुळे तुर्कस्तानच्या बँकेकडे असणाऱया अमेरिकन डॉलर्सच्या राखीव साठय़ाला ओहोटी लागली आहे. याचा तुर्कस्तानला येणाऱया काळात मोठा फटका बसू शकेल. तेथील अर्थव्यवस्थेसमोरील जोखीम वाढलेली दिसून येईल. पण हे उघडकीस आल्यानंतरही एर्दोगेन यांची गुर्मी कमी झाल्याचे दिसत नाही. ते येथील विरोधी पक्षांना 128 अब्ज डॉलर्सचा हिशोब देण्यास बांधील नाही असे जाहीरपणे सांगतात.

जून 2017 मध्ये 1 अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 3.5 तुर्किश लिरा मिळत असत. आता सध्याचा डॉलरबरोबरील विनिमय दर हा ‘लिरा’ची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किती घसरण झालेली आहे ते दर्शवितो. सध्या 1 अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 8.40 तुर्किश लिरा मिळतात. येत्या काळात आता ही घसरण अजूनच वाढत जाताना दिसू शकेल.

या एप्रिलमध्ये तुर्कस्तानच्या या सेंट्रल बैकेकडील अमेरिकन डॉलर्सचा राखीव साठा 10 अब्ज डॉलर्सवर घसरलेला असल्याचे उघडकीस आले. गेल्या 18 वर्षांमधील हा सर्वात कमी असा डॉलर्सचा राखीव साठा आहे. त्याचे तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम यापुढील काळात पुढे येताना दिसून येतील. शेवटी सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही हेच खरे. 128 अब्ज डॉलरच्या तुर्कस्तानच्या बाजारातील उपलब्धतेमुळे तेथील बँकांना कर्जावरील व्याजदर नियंत्रणात ठेवता आलेले होते. पण यापुढील काळात एर्दोगेन सरकार काय करणार हा प्रश्न आहे. सध्याच्या कोरोना काळात डॉलरची अनुपलब्धता तुर्कस्तानला मोठा फटका देईल यात शंकाच नाही.

एर्दोगेन सरकारची दादागिरी एवढी की तेथील नागरिकांनी त्यांच्या घरावर ‘128 अब्ज डॉलरचा’ हिशोब मागणारे जे फलक झळकावले आहेत ते तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने खाली उतरविले जात आहेत. तेथील विरोधी पक्ष सरकारला हिशोब मागण्यापासून तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही असे सांगत आहेत. एर्दोगेन यांची मग्रुरी आणि मस्ती एवढी की त्यांनी ही रक्कम 128 अब्ज डॉलर्स नसून ती 165 अब्ज डॉलर्स आहे असे जाहीर केले. एवढेच नव्हे तर यापुढील काळातही गरज भासल्यास अशा प्रकारे रक्कम सरकारकडून वापरली जाईल असे जाहीर केले. तुर्कस्तानच्या या घटनाक्रमकडे जागतिक वित्त संस्थांचे लक्ष असेलच. पण अनेक परकीय गुंतवणूकदार आपापल्या तेथील गुंतवणुकीबद्दल हात आखडता घेतील.

– [email protected]