केवळ माझा सह्यकडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संदीप शशिकांत विचारे

सह्याद्रीचं अनवट रूप काही अंशी अवलोकायचं असेल तर श्री शिवछत्रपतींच्या दोन राजधान्यांमध्ये वसलेला मुलुख आणि सह्याद्रीच्या दऱयाखोऱया ओलांडायच्या असतील तर त्याकरिता नसरापूर-वेल्हे-मढय़ेघाट या मुलुखांची सह्ययात्रा करायलाच हवी!

साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला श्री शिवछत्रपतींनी मुक्त केले. यात त्यांना मोलाची साथ दिली मावळातील जिगरबाज मावळ्यांनी आणि सह्याद्रीनी! उत्तर-दक्षिणेत पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगावर घाट खाली कोकण अशा दुर्गम प्रदेशात महाराजांनी वसवली स्वराज्याची मुहूर्तमेढ. बारा मावळ. कोकण, समुद्र, सह्याद्री आणि शिवराय यांनी नवा इतिहास रचला आणि सह्याद्रीच्या मदतीने अस्मानी सुलतानीला आव्हान दिले. सह्याद्री परिक्रमातशी अवघडच! पण हा अनवट सह्याद्री काही अंशी अवलोकायचा असेल तर श्री शिवछत्रपतींच्या दोन राजधान्यांमध्ये वसलेला मुलुख आणि सह्याद्रीच्या दऱयाखोऱया ओलांडायच्या असतील तर त्या करिता नसरापूर-वेल्हे-मढय़ेघाट या मुलुखांची सह्ययात्रा करावी!

मुंबई-ठाणे-पुणे येथून पहाटे निघून खंडाळा. कात्रजचा सह्याद्री ओलांडून पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर येथे पोहोचायचे. नसरापूरहून शिरवळ-सातारा रस्त्यावरील उजवीकडील फाटा नसरापूर मार्गासनी – वेल्हे -भट्टी-पासलीमार्गे मढय़े घाटात पोहोचतो. पुणे-सातारा रस्ता सोडून नसरापूर गाव सोडले की उजवीकडील रस्ता बनेश्वर या निसर्गरम्य महादेवाच्या शिवालयाकडे जातो. सह्याद्रीचा अधिपती श्रीशंकर त्याचा आशीर्वाद घेऊन सह्ययात्रेला सुरुवात करायची. पुन्हा माघारी नसरापूरला येऊन वरील रस्त्यावरून वेह्याकडे प्रयाण करायचं. मार्गासनी ओलांडले की बारा मावळातील अस्सल शिवकालीन मुलुख सुरू होती. पाणे घाटाच्या पलीकडील मोसेखोऱयातील बाजी पासलकर, भुतोंडय़ाचे येसाजी कंक, शिळीमचे शिळीमकर अशी अस्सल शिवरत्ने डोळ्यासमोर येतात आणि डावीकडे दिसू लागतो गडांचा राजा राजियांचा गड राजगड… पुढे राजीयांना सुवर्णांकित करणारा तोरणा पायथ्याशी आहे वेल्हे गाव येथे पोटपूजा करून तोरणा डावीकडे ठेवत भट्टी गावाकडे निघायचे. वाटेतील गुंजवणी धरणाच्या जलाशयाच्या उत्तम नजारा डोळ्यात साठवत पासली गावात पोहोचायचे. केळद खिंड ओलांडली की उजवीकडचा रस्ता सिंगापूरला जातो. हो हो सिंगापूर without passport सिंगापूर! मोहरी-सिंगापूरच्या सायलिंग पठारावरून रायगड-लिंगाण्याचे गोमटे दूरदर्शन घडते. आपण केळद खिंड ओलांडून केळद गावात पोहोचायचे. येथून हाकेच्या अंतरावर आहे मढय़े घाट. मध्ये घाट खाली कोकणात महाडकडे उतरतो. सिंहगडावर धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांचे पार्थिव याच मढय़े घाटातून त्यांच्या गावी उमरठ येथे पालखीतून आणले होते. मढय़े घाटाच्या माथ्यावर थांबून हा इतिहास जागवत परतीच्या प्रवासाला लागावे. दूर मावळतीवर सूर्य अस्ताला आलेला असतो… आपन परतीच्या प्रवासाला लागलेलो असतो. डोळ्यासमोर आपण केलेली सह्ययात्रा तरळत असते. खाली कोकण वर घाट आणि सह्याद्रीच्या दऱयाखोऱया… निर्बीड अरण्य… दिल्लीपती औरंग्याला आणि अस्मानी सुलतानीला धडकी भरवणारा… पण राजीयांना अभय देणारा मुलुख. आपली सह्ययात्रा संपवून आपण नसरापूर ओलांडून पुणे-सातारा हमरस्त्याला लागलेला असतो. शहरी गजनजारापासून दूर मावळच्या दऱयाखोऱयात श्री शिवछत्रपतींच्या राजगड आणि रायगड या दोन राजधान्यांमधल्या सह्यमुलुख बघितल्याचा आनंद चेहऱयावर विलासत असतो.

भव्य हिमालय तुमचा अमुचा
केवळ माझा सह्यकडा
गौरी शंकर उभ्या जगाचा
मनात पूजीन रायगडा…

हे अनुभवायचे असेल तर एकदिवसाची ही सह्ययात्रा जरूर करा!

– [email protected]