
>> संदीप विचारे
पुण्याहून साठ कि.मी. असलेल्या वेल्हे गावात तोरणा उभा आहे. पुणे-सातारा हमरस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्याच्या पुढे नसरापूरचा फाटा आपल्याला वेल्हे गावात घेऊन जातो. वेह्याच्या वेशीवर प्राचीन श्री शिवशंकराचे व पुरातन मारुतीचे मंदिर आहे. जवळच मेंगाईदेवीचे नूतनीकरण केलेले मंदिर आहे. इथून पक्क्या गाडीरस्त्याने तोरणगडाचा पायथा जवळ करता येतो. येथे आपले वाहन वाहनतळावर उभे करून पायगाडीवर स्वार होऊन तोरणा सर करण्यास सुरुवात करावी.
महाराष्ट्र देशी पाच जुलमी सुलतानी सत्ता आपला अधिकार गाजवत होत्या. पुण्याजवळील मावळ प्रांत विजापूरच्या आदिलशहाच्या कब्जात होता. अशा भयावह परिस्थितीत मावळच्या दऱ्याखोऱ्यात शिवबा राजांनी स्वराज्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांना भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद मिळाले ते जिजाऊ माँसाहेबांचे.
आदिलशाही फौजेने विजयनगरच्या बलाढ्य हिंदू साम्राज्याचा चुराडा केला होता, मात्र शिवबा राजे आणि त्यांचे बालसवंगडी यांचा स्वराज्य स्थापनेचा निर्धार पक्का आणि ठाम होता. त्यांची आऊसाहेबांवर, तुळजाभवानीवर आणि सह्याद्रीवर नितांत श्रद्धा होती. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हे जाणून होते आणि एके दिवशी मसलत झाली. ठरलं! कानंदखोऱ्यातील आदिलशहाच्या ताब्यातील बेसाऊ, पण बुलंद किल्ला मटकवायचा. किल्ले तोरणगड. जिजाऊसाहेबांनी व त्यांच्या कारभाऱ्यांनी बारा मावळातले देशमुख आधीच वश करून ठेवले होते. तोरणगडावर कब्जा मिळवणं तशी सोपी कामगिरी होती, पण त्याचे परिणाम भयंकर होणार होते. आदिलशहाला विजापूरला ही बातमी कळल्यावर त्याची वक्रदृष्टी मावळावर पडणार होती, पण परिणामाला घाबरतील तर ते शिवबा राजे कसले!
मावळातील कानंदखोऱ्यातील तोरण्याच्या बिनी दरवाजावर भगवा झेंडा डौलाने फडपू लागला. बारा पिढय़ांची गुलामगिरी संपली. तोरणजाई प्रसन्न झाली. तोरण्यावरचे पहिले पाऊल स्वराज्य तोरण ठरले. त्याची सांगता श्रीशिवराज्याभिषेकाने झाली. स्वतंत्र हिंदवी राज्य हिंदूंचे सिंहासन रायगडावर महाराष्ट्रात निर्माण झाले. त्याची बिजे रोवली गेली तोरण्यावर!
पुण्याहून साठ कि.मी. असलेल्या वेल्हे गावात तोरणा उभा आहे. पुणे-सातारा हमरस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्याच्या पुढे नसरापूरचा फाटा आपल्याला वेल्हे गावात घेऊन जातो. वेह्याच्या वेशीवर प्राचीन श्री शिवशंकराचे व पुरातन मारुतीचे मंदिर आहे. जवळच मेंगाईदेवीचे नूतनीकरण केलेले मंदिर आहे. इथून पक्क्या गाडीरस्त्याने तोरणगडाचा पायथा जवळ करता येतो. येथे आपले वाहन वाहनतळावर उभे करून पायगाडीवर स्वार होऊन तोरणा सर करण्यास सुरुवात करावी.
शक्यतो सकाळच्या आल्हाददायक वातावरणात गड चढण्यास सुरुवात केली तर उन्हाचा त्रास जाणवत नाही. थोडे अंतर पार केल्यावर उजवीकडे गुंजवणी नदीच्या धरणाच्या जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. जे सतत गडावर पोहोचेपर्यंत आपली साथ देते. दोन टप्पे चढाईचे पार केले की उभा चढ लागतो. आधारासाठी लोखंडी रेलिंगची सोय आहे. हा टप्पा थोडा अवघड व दमछाक करणारा आहे. पण गड टप्प्यात आला या जाणिवेने सुखावणाराही आहे. शेवटच्या टप्प्यात रेलिंगचा आधार घेत उभ्या अंगावर येणाऱ्या पायऱ्या चढून आपण पहिल्या दरवाज्यातून गडावर प्रवेशतो. पुढे असलेला भक्कम बिनी दरवाजा आता आपल्याला खुणावत असतो. तो ओलांडून आपण गडावर दाखल होतो.
बिनी दरवाजाच्या मागे तोरणाजाई देवीचे ठाणे आहे. गडाची तटबंदी शाबूत असून ती नव्याने बांधून तिची उत्तम डागडुजी केली आहे. गडाचा पसारा मोठा आहे. तटावरून प्रथम झुंजार माचीचे दुरूनच दर्शन घ्यावे. माचीला तटबंदीचे शेला पागोटे चढवून झुंजार करण्यात आले आहे. माचीवर उतरण्यास लोखंडी शिडी आहे. नवख्या भटक्याने तिच्या वाटेला जाऊ नये. झुंजार माचीवरून मेंगाई व तोरणेश्वराच्या देवळात येऊन त्यांचे दर्शन घ्यावे व पश्चिमेकडे असलेल्या कोकण दरवाज्याकडे निघावे. इथून एक वाट खाली असलेल्या मेट पिलावरे गावात जाते. आपण बुधला माचीकडे निघावे. इथून राजगडाचे दर्शन होते. तोरण्यावर सापडलेले धन शिवबाराजांनी मुरूबदेवाच्या डोंगराला सजविण्यात खर्ची घातले आणि उभा राहिला अभेद्य बेलाग राजधानीचा गड हाच तो राजगड! बुधलामाचीच्या वाटेवर हत्ती माळ व भुयारी जागा आहे. राजगडावरून येणारे अनुभवी भटके इथूनच तोरण्यावर येतात. येथून कानंदखोऱयाचा उत्तम नजारा दिसतो. पुन्हा कोकणदरवाज्यातून माघारी येऊन डावीकडील तटबंदीने खोकड टाक्याजवळ यावे. त्याच्या काठावर असलेल्या सांगळेमामांकडून थंडगार लिंबू सरबत पिऊन आपली गडभटपंती पूर्ण करावी. गडावर लष्करखाना, दारूखाना, सदर, एक अज्ञात समाधी, विरगळ, हनुमान बुरूज असे इतर अवशेष आहेत.
वाहनतळापासून गडावर येण्यास दोन अडीच तास लागतात. गड भटकण्यास एक तास पुरतो. पायात उत्तम बूट, मजबूत पादत्राणे, ट्रक पॅण्ट, सैल विजार, स्त्रियांनी सलवार कमीज, डोक्यावर टोपी व पिण्याचे पाणी सोबत घेऊन गड चढाई करावी. स्थानिक गावकरी सुट्टीच्या दिवशी वाटेत पाणी, बिस्कीट यांची विक्री करण्यास बसलेले असतात.
ज्या किल्ल्याच्या विजयाने शिवबाराजे श्री शिवछत्रपती झाले, ज्यांनी महाराष्ट्राचाच नव्हे तर हिंदुस्थानचा इतिहास बदलला, ज्या तोरण्याच्या बिनी दरवाज्यावर हिंदुस्थानचा पहिला भगवा फडकला त्या तोरणागडास स्वतःस थोडी तोशीस देऊन आपल्या मुलाबाळांसह अवश्य भेट द्या! कारण तो आपला इतिहास, भूगोल आणि अभिमान आहे! सध्या गडावर मुक्कामास बंदी आहे. गडाचे दरवाजे सकाळी नऊला उघडतात आणि सायंकाळी पाचला बंद होतात. पुण्याहून भल्या पहाटे निघून आपण ही स्वराज्य तोरणयात्रा करू शकता. वेल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात जेवण्यासाठी व मुक्कामासाठी आता बरीच हॉटेल्स झाली आहेत. वेह्यात तोरणा विहार, गाडेआजींचे उत्तम नाश्ता मिळणारे मेंगाई देवळाजवळचे हॉटेल, भट्टीचे ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट ही त्यातली काही एक. चला तर, इतिहास घडवणाऱ्या, भूगोल बदलवणाऱया आणि शिवबांनी हिंदवी स्वराज्याचे ‘तोरण’ ज्या किल्ल्यावर बांधले त्या तोरणगडावर!



























































